A conversation with Sachin Kalantre, Managing Director of Mahabeez...
वाण निवड आणि उत्पादकतेविषयी काय सांगाल?
गेल्या काही वर्षांत पीक लागवडीमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे दिसून येत आहेत. दर तीन वर्षांत मॉन्सूनच्या पावसाची साखळी बदलते आहे. कधी पाऊस उशिरा येतो म्हणून पेरण्या लांबतात तर अनेकदा पावसात खंड पडतो. यामुळे मूग, उडदाच्या लागवडीवर परिणाम होऊन क्षेत्र घटत चालले आहे. यंदा पाऊस वेळेवर व चांगला येईल असा अंदाज हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे.
अशा स्थितीत नेमके कोणते वाण निवडावे आणि त्याची पेरणी कधी करावी, याबाबत शेतकरी कायम जागरूक दिसतो. शेतकऱ्यांना पीक, वाण, लागवड, व्यवस्थापन पद्धती अत्यंत चांगल्या पद्धतीने समजतात. मुळात पाऊस लांबला तर अशा परिस्थितीत नेमके कोणते वाण पेरावे याबाबत आपल्याकडे पीकवाण नाहीत. विभाग, जमिनीचा पोत, व्यवस्थापन अशा विविध मुद्यांवर एकाच पिकाचे वेगवेगळे उत्पादन राहू शकते. त्यामुळे सार्वत्रिकरीत्या निश्चित कुठला वाण किती उत्पादकता देईल हे सांगणे कठीण आहे. भागपरत्वे यात संभाव्य बदल राहू शकतात.
सध्या पीक लागवडीचा ट्रेंड काय दिसतो?
सध्याच्या हवामान बदलाच्या काळात शेतकरी प्रामुख्याने कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करीत आहे. आज खरिपात सोयाबीन तर रब्बीत
हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. शासनाच्या पुढाकारातून प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, नाचणी या हवामानास अनुकूल पौष्टिक तृणधान्ये पिकांच्या लागवडीमध्ये उल्लेखनीय वाढ झालेली आहे. केळी, आंबा, पपई आदी फळपिकांच्या लागवडीकडे ही शेतकरी प्राधान्याने वळत आहेत. यातही जमीन, पाऊसमान, सिंचनाच्या सोयी या बाबी परिणामकारक आहे.
बियाणे उपलब्धतेसाठी काय प्रयत्न होत आहेत?
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे खरीप हंगामाकरिता सातत्याने नवनवीन वाणांची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न असतो. विविध विद्यापीठांनी संशोधित केलेल्या पीक वाणांचे ब्रीडर सीड आता मोठ्या प्रमाणात मिळते आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या ही याबाबत विद्यापीठांना सूचना असल्याने ब्रीडर सीड प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. बियाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षीही मोठ्या प्रमाणात असे बियाणे उपलब्ध झाल्याने बीजोत्पादन कार्यक्रमात वाढ झालेली आहे. त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल.
या खरीप हंगामासाठी कोणते पिकवाण उपलब्ध करून दिले?
यंदाच्या खरिपासाठी महाबीजने सोयाबीनमध्ये पीडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया, फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा, एमएयुएस ६१२, एमएयुएस ६७१, जेएस २०-११६, जेएस २०-१९८, जेएस २०-२९, जेएस २०-९८, जेएस २०-९४, एमएसीएस १४६०, एमएसीएस १२८१, एनआरसी -१३० तर जुन्या वाणात जेएस ३३६, ९३०५ असे वाणही आहेत.
तुरीसारख्या पिकात पांढऱ्या तुरीचे गोदावरी, बीडीएन ७११, लाल तुरीचा ७१६, फुले १२ (राजेश्वरी), उडीद एकेव्ही १०-१, टीएयू-१, मूग पिकाचे फुले भारती, फुले उन्नती, उत्कर्ष, पीकेव्ही एम ८८०२, ज्वारी पिकात सीएचएस-९, महाबीज ७०४, भाग्यलक्ष्मी, महाबीज ७, तर भातामध्ये पीडीकेव्ही तिलक, को-५१, चंद्रा (एमटीयू ११५३) हे काही प्रमुख वाण उपलब्ध आहेत. यातील काही वाणांना शासनाच्या विविध योजनांतून लाभ देखील दिला जातो. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी शासनामार्फत ग्राम बीजोत्पादन योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आर्थिक अनुदान दिले जाते. मुख्यत्वे योजना वितरणांतर्गत राबविल्या जातात.
कुठली लागवड पद्धतफायदेशीर वाटते?
सध्याच्या काळात पीकवाण निवडीप्रमाणेच लागवडीचे तंत्रही महत्त्वाचे झाले आहे. पावसाच्या विस्कळीत साखळीत बीबीएफसारखी लागवड पद्धती फायदेशीर ठरत असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणातून दिसून आलेले आहे. या लागवड पद्धतीत बियाणे कमी लागते. पाण्याचा निचरासुद्धा होतो. पाऊस कमी-अधिक झाला तरी त्याचा पिकावर लगेच थेट परिणाम होत नाही. पिकाची ताण सहन करण्याची शक्ती वाढते.
टोकण पद्धतीचेही फायदेच आहेत. पारंपारिक लागवडीच्या तुलनेत या पद्धतीने एकरी बियाणे वापर कमी होतो. झाडांची संख्या हवी तेवढी ठेवता येते. पिकाची योग्य वाढ होऊन उत्पादकता वाढीस मदत होते. शिवाय पाण्याचेही व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होते. हवामान बदलाच्या काळात अशा लागवड पद्धती पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत निश्चितच उजव्या ठरत आहेत. त्यामुळे बीबीएफ, टोकण पद्धतीने लागवड करून चांगली उत्पादकता मिळविणे शक्य आहे.
बीजोत्पादन किती क्षेत्रावर होत आहे ?
यंदाच्या हंगामात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत महाबीजच्या बीजोत्पादनाचे नियोजन झालेले आहे. यात साहजिकच प्रामुख्याने सोयाबीन या वाणाचे क्षेत्र ३५ ते ४० हजार हेक्टरपर्यंत राहणार आहे. त्यासोबतच तूर, धान, नाचणी व इतर पिकांच्याही बीजोत्पादनाचे नियोजन झालेले आहे. राज्यातील बीजोत्पादक यासाठी नोंदणी करीत आहेत.
महाबीजचे या वर्षीचे बियाणे नियोजन कसे व किती आहे?
गेल्या काही वर्षांत बदललेल्या वातावरणाचा महाबीजच्या बीजोत्पादनालाही फटका बसला होता. मात्र आता ही स्थिती पूर्वपदावर आणण्यात आम्हाला यश आलेले आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात सोयाबीनसारख्या प्रमुख पिकांचे सुमारे ३ लाख १० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देता आले.
भाताचे ३२ हजार क्विंटल, उडीद ४५०० क्विंटल, मूग ८५० क्विंटल, तूर ५५०० क्विंटल, ज्वारी १२०० क्विंटल आणि बाजरीचे २०० ते ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नियोजित बियाण्यांपैकी सुमारे ६० टक्क्यांवर बियाणे बाजारात पोहोचले असून, धानाच्या बियाण्याची विक्रीही कोकणात बहुतांश प्रमाणात पूर्ण होत आली आहे. लवकरच इतर बियाण्यांचीही विक्री गती घेईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.