Cotton seed Varieties : लागवड पद्धतीनुसार कपाशी वाणाची निवड

Cotton cultivation Methods : कपाशीची लागवड करताना योग्य वाणाची निवड व जोडीला उत्तम व्यवस्थापन केल्यास एकरी उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
Cotton seed Varieties
Cotton seed VarietiesAgrowon
Published on
Updated on

-डॉ. राहुल फुके, डॉ. वाय. जी. प्रसाद

जमिनीचा प्रकार, विविध लागवड पद्धती, वाण परिपक्व होण्याचा काळ आदी गुणधर्म लक्षात घेऊन कापसाच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे. योग्य वाणाची निवड व जोडीला उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास कपाशीची एकरी उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

कपाशी हे खरीप हंगामातील राज्यातील महत्त्वाचे पीक आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान या पिकावर आधारित असते. कापसाचे एकूण उत्पादन वेगवेगळ्या बाबींवर आधारित असते. यामध्ये जमिनीचा प्रकार (खोल किंवा उथळ), ओलिताची उपलब्धता, वाणाची निवड, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि लागवड पद्धत यांचा समावेश असतो. यामध्ये योग्य वाणाची निवड ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कापसाच्या एकूण उत्पन्नात ३५ टक्क्यांपर्यंत बदल दिसू शकतो. भारतात विकले जाणाऱ्या कपाशीच्या बियाण्याची नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अन्य कापूस उत्पादक राज्यांमध्ये असलेल्या संशोधन केंद्रामध्ये तीन वर्षे प्रक्षेत्र चाचणी घेण्यात येते. त्यानंतर ते प्रमाणित केले जाते. 

योग्य वाण निवडावे 

 कपाशीच्या वाणांची विविध प्रकारांत चाचणी घेण्यात येते. यात कोरडवाहू (उथळ जमीन), ओलित (खोल जमीन), साधारण लागवड पद्धत (१२० × ४५ सेमी) व सघन लागवड पद्धत (९० × १५ सेमी) असे हे प्रकार आहेत. बियाणे विकत घेतेवेळेस शेतकऱ्यांना वाणांच्या गुणधर्मांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून चुकीचे वाण निवडणे टाळता येईल. बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून वाणांच्या गुणधर्मांची माहिती दिलेली असते. शेतकऱ्यांनीही आपल्या पूर्वअनुभवानुसार वाणांचे वर्गीकरण माहीत करून घ्यावे. 

वाणांचे प्रकार 

कपाशीच्या वाणांचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार वाणांच्या कालावधीनुसार व दुसरा प्रकार वाणांच्या वाढीच्या पद्धतीनुसार आहे. कालावधीमध्ये लवकर येणारे वाण हे जवळपास १४० ते १५० दिवसांत परिपक्व होतात. तर उशिरा येणारे वाण १८० ते २०० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसात जीवनमान पूर्ण करतात. झाडाच्या वाढीच्या पद्धतीनुसार आखूड वाढणारे व पसरट वाढणारे वाण असतात.

Cotton seed Varieties
Cotton Seed : राज्यात कापसाची १.७० कोटी पाकिटे उपलब्ध

आखूड वाढणारे वाण हे कोरडवाहू व हलक्या जमिनीत सघन लागवडपद्धतीत म्हणजेच एकरी झाडांची संख्या वाढविण्यासाठी शिफारस केले आहेत. तर पसरत वाढणारे वाण खोल व ओलिताच्या जमिनीत शिफारस केले आहेत. या दोन मुख्य प्रकारात प्रत्येक कंपनीचे दोन किंवा तीन वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोण्या एका वाणांचे बियाणे उपलब्ध नसल्यास पर्यायी वाण शेतकरी निवडू शकतो. तसेच वाण निवडताना विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये.

भारी व खोल जमिनीत घेण्यात येणारे वाण 

आपल्या शेतीचा प्रकार खोल असून ओलिताची व्यवस्था उपलब्ध असेल तरअशा जमिनीत मध्यम ते उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड करता येते. सर्वसाधारणपणे उशिरा येणारे वाण उंच वाढतात. त्यांच्या फळफांद्या व गळफांद्यांची लांबी जास्त असते. त्यामुळे अशा वाणांची लागवड ही १२० × ६० सेमी किंवा १२० × ४५ सेमी अंतरावर करावी. उशिरा येणाऱ्या वाणांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शकता जास्त असते. त्यामुळे अशा वाणांचीलागवड केल्यास या किडीच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

हलक्या व कोरडवाहू जमिनीसाठीचे वाण 

भारतातील एकूण कापूस उत्पादन क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्र हे कोरडवाहूप्रकारात येते. हलक्या व कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवडीच्या १२०दिवसानंतर जमिनीतील ओलावा संपून जातो. त्यामुळे अशा जमिनीत लवकरयेणारे वाण (१४० दिवसांत) निवडले पाहिजे. अशा जमिनीत उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड केल्यास बोंड परिपक्व होत असताना झाडाला पाण्याचा ताण बसतो. उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

तसेच लवकर येणाऱ्या वाणांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव येण्याच्या पूर्वीच बोंडे परिपक्व होतात व मोठे नुकसान टाळता येते. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात असे निर्दशनास आले आहे की विदर्भ व मराठवाड्यातील बऱ्याच कोरडवाहू उत्पादक शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीमध्ये उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड केली. त्यामुळे उत्पादनात खूपमोठ्या प्रमाणात घट झाली. महाराष्ट्रात कमी कापूस उत्पादन येण्यामध्ये हे महत्त्वाचेकारण आहे. हलक्या जमिनीत उत्पादन वाढविण्यासाठी सघन लागवड पद्धतीची शिफारस केली आहे, यामध्ये एकरी झाडांची संख्या वाढवून कमी जागेत व कमी वेळेत जास्त बोंड धारणा करून उत्पादन वाढवले जाऊ शकते.

सघन लागवड पद्धत  

केंद्रीय कापूस संशोधन संस्थाने कापसासाठी सघन लागवड प्रणाली विकसित केली आहे. यात कोरडवाहू शेतीत चांगले उत्पादन घेण्याची क्षमता आहे. कमी खोलीच्या काळ्या व लाल माती असणाऱ्या कोरडवाहू शेतीमध्ये ९० बाय १५ सेमी या अंतरावर सधन लागवड पद्धत अधिकयोग्य आहे. मध्यम खोल ते सुपीक काळ्या जमिनीत ९० बाय ३० सेमी अंतरावर मध्यम घनतेचा अवलंब केला जाऊ शकतो. या लागवड पद्धतीमध्ये पीक दाटू नये म्हणून क्लोरमेक्वाट क्लोराइड या वाढ नियंत्रकाच्या दोन किंवा तीन फवारण्या घेऊन झाडांची वाढ थांबवावी लागते. ही वाढ नियंत्रण न केल्यास बुरशीजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते. 

सघन लागवड प्रणालीसाठी या गुणधर्माचे असावेत वाण 

दोन झाडांतील व दोन ओळींतील अंतर कमी असल्यामुळे आखूड (कॉम्पॅक्ट) लहान फांद्या व ज्यामध्ये पहिल्या स्थानावर बोंडे धारण करण्याची चांगली क्षमता असते.

    सरळ वाढणारे, लहान पाने व कमी उंची असलेले. 

    कमी गळफांद्या असलेले, रसशोषक किडी व रोगांना सहनशील. 

    मध्यम-मोठ्या आकाराचे बोंड असलेले. (४ ग्रॅमहून अधिक)

    लवकर तसेच एकाचवेळी बोंड परिपक्व होणारे. यंत्राद्वारे वेचणी करण्यास अनुकूल. 

Cotton seed Varieties
Cotton Scheme : कापूस मूल्यसाखळीतील गैरव्यवहाराच्या माहितीसाठी आमदाराची वणवण

जमिनीचा प्रकार व पाण्याची उपलब्धतेनुसार वाण 

हलकी कमी खोलीची कोरडवाहू जमीन 

    लवकर येणारे (१४० ते १५० दिवसांत)

    आखूड- ज्याच्या फांद्यांची लांबी कमी असेल. 

    लागवड अंतर- ९० बाय ३० सेंमी किंवा ९० बाय १५ सेंमी. 

भारी जास्त खोल, ओलिताची जमीन 

    मध्यम ते उशिरा येणारे वाण (१८० ते २१० दिवस) 

    उंच पसरणारे, मोठ्या बोंडाचे वाण

    १२० बाय ४५ सेंमी किंवा १२० बाय ६० सेंमी अंतरावर लागवड.

बियाणे घेतेवेळेस घ्यावयाची दक्षता 

बियाणे ओळखीच्या दुकानातून पक्क्या बिलासहित घ्यावे. बिल व पॅकेट जतन करून ठेवावे.सध्या महाराष्ट्राच्या सीमेवरील भागांमध्ये एचटीबीटी बियाणे व त्याचप्रमाणे विविध नावांनुसार बीजी ३, बीजी ४ या नावाने बोगस बियाणे विकले जात आहे. बीजी वन आणि बीजी टू हे दोन प्रकार सोडून कोणत्याही बीजी वाणांना भारत सरकारची परवानगी नाही.

त्यामुळे असे बियाणे विकणे व त्यांची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. हे बियाणे काळ्या बाजारात विकले जाते. बऱ्याच वेळेस असे आढळून आले आहे की या बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते. अशा बियाण्यांची लागवड शेतकऱ्यांनी करू नये. कमी क्षेत्रामध्ये जास्त वाणांची लागवड करू नये.

-डॉ. राहुल फुके, ७८९३९३६१९६ 

ई-मेल - rahulphuke18@gmail.com

(लेखक केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे  वनस्पती प्रजनन शास्त्र, 

पीक सुधार विभागात कार्यरत आहेत.) 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com