Agriculture Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse : शास्त्रीय पद्धतीने गोदामांची उभारणी

Team Agrowon

Agriculture Warehouse Scheme :

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

केंद्र शासनामार्फत गोदाम व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाकरीता गोदाम उभारणीच्यादृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु त्या पुरेशा नसल्याचे सर्व शासकीय योजनांच्या अभ्यासावरून दिसून येते. लाभार्थ्यांना गोदाम उभारणी सारख्या खर्चिक मार्गावर जाताना समाधानकारक आणि सर्वसमावेशक योजना उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. सर्व निकषांबाबत वेगवेगळ्या योजनांमध्ये शिथिलता उपलब्ध आहेत, परंतु एकाच योजनेमध्ये या निकषांबाबत शिथिलता नसल्याने लाभार्थी वर्ग नाखुश आहे. काही चांगल्या योजना उपलब्ध असतील तर त्यात पुरेसा लक्षांक उपलब्ध नसल्याने लकी ड्रॉ सारख्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो.

त्यातही बँक कर्ज मिळाले नाही तर लकी ड्रॉ द्वारे झालेली निवड व तांत्रिक मान्यतेसाठी केलेला आटापिटा, व्यवसाय आराखडा व गोदामाचे एस्टिमेट व प्लॅन बनविण्याचा खर्च वाया जातो. यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर गोदाम उभारणीबाबत सर्वसमावेशक योजना तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. एवढे सर्व असूनही लाभार्थी वर्ग चिकाटीने सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करून गोदाम उभारणीची तयारी करतो. किमान १०० वर्ष टिकेल असे बांधकाम करताना गोदाम उभारणीसाठी जागेची निवड फार महत्त्वाची असते. गोदाम उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, भारतीय अन्न महामंडळ तसेच वखार विकास व नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळात कार्यरत वरिष्ठ सनदी अभियंता, स्मार्ट व मॅग्नेट प्रकल्पातील अधिकारी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले व त्यांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेले काही महत्त्वाचे निकष पाळणे अत्यंत आवश्यक असते.

जमीन निवड :

गोदाम उभारणीसाठी जमिनीचा आकार आयताकार असावा. जमिनीची लांबी आणि रुंदी किमान ७० बाय ४२ मीटर असावी. उभारणीकरिता गोदामाच्या क्षमतेनुसार महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने जागेबाबत काही परिमाणे दिली आहेत. उदा. १०८० टन क्षमतेच्या गोदाम उभारणीसाठी किमान १३ गुंठे जागा आवश्यक आहे. अशाच प्रकारे २५० टन, ५०० टन, ९०० टन, १५०० टन आणि १८०० टन क्षमतेच्या गोदामांना जागेबाबत निकष ठरविण्यात आले आहेत.

गोदाम उभारणीची जागा शक्यतो सपाट असावी व डोंगराळ भागात नसावी. गोदाम उभारणीची जागा ओढ्याशेजारी अथवा नदीशेजारी नसावी.

गोदामाच्या जागेतून कोणत्याही प्रकारच्या वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह नसावा.

गोदाम उभारणीची जमीन धरणाच्या अथवा नदीच्या पाण्यात बुडणारी नसावी. नदीला येणारा पूर १० अथवा १५ वर्षांच्या अंतराने येणारा असला तरीही अशा जागेची निवड करू नये. गोदामाची जागा शक्यतो रस्त्याच्या बाजूला असावी अथवा अंतर्गत रस्त्याची सुविधा असेल अशाच जागेची निवड करावी. गोदामाची जमीन वर्ग २ वर्गीकरणातील नसावी, त्यावर कोणतेही आरक्षण नसेल याची पुरेपूर काळजी घ्यावी.

माती परीक्षण :

गोदाम उभारणीसाठी काळ्या व सुपीक शेतजमिनीचा शक्यतो वापर करू नये. परंतु पर्याय नसल्यास अभियंत्याच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली गोदामाच्या पायाच्या बांधणीचे नियोजन करावे.

गोदाम उभारणीसाठी शक्यतो टणक मुरूम असलेली जमीन असावी. गोदामासाठी रस्ते व पाया तयार करताना व्यवस्थित मातीचे परीक्षण करून योग्य खोलीचा अंदाज घेऊनच पायाभरणी करावी.

परिसरातील इतर स्रोत :

रस्ते :

गोदाम उभारणी करण्यापूर्वी नजीकच्या भागात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, इतर रस्ते, विमानतळ, रेल्वेमार्ग, बंदर यांचे व्यवस्थित जाळे असणे आवश्यक आहे. शहरी किंवा ग्रामीण भागातील मोठी गावे असणाऱ्या भागात रस्त्यानजीक असणाऱ्या जागेची निवड करावी.

रेल्वे स्थानक जवळ असेल तर रेल्वेद्वारे वाहतूक होणाऱ्या वस्तूंची आवक जावक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या ज्या बाजूने होते त्या बाजूला गोदाम उभारणीची जागा असावी. जर जागा विरुद्ध बाजूला असेल तर त्या जागेजवळून जाणारा पूल असावा जेणेकरून मालाची वाहतूक करणे सोईस्कर होऊ शकेल.

रेल्वे स्थानकाजवळ गोदाम उभारायचे असेल तर शक्यतो गोदाम उभारणीची जागा एकूण प्रस्तावित जागेपेक्षा जास्तीत जास्त मोठी असावी.

वीजपुरवठा :

गोदाम उभारणीपासून नजीकच्या भागात थ्री फेज वीज जोडणी आवश्यक आहे. जेणेकरून गोदामाचे डिजिटायझेशन करणे, माल स्वयंचलित पद्धतीने कन्वेयर बेल्टच्या साह्याने चढविणे व उतरविणे, मालाच्या पोत्यांची थप्पी लावणे, इलेक्ट्रिकच्या साह्याने चालविण्यात येणाऱ्या रेल्वेचा वापर इत्यादीच्या दृष्टीने थ्री फेज वीज जोडणी आवश्यकता असते.

थ्री फेज वीज जोडणीची उपलब्धता नजीकच्या भागात नसेल व सदर कनेक्शन दूरवरून आणावे लगत असेल तर तारा व इलेक्ट्रिक खांबांचा खर्च गोदाम उभारणीच्या खर्चात धरावा.

गोदाम उभारणीच्या जागेतून किंवा जागेपासून किमान १०० मीटरवर उच्च दाबाच्या विजेचे खांब किंवा उच्च विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा नसावी.

पाण्याची उपलब्धता :

गोदाम उभारणी शक्यतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर करावे. जेणेकरून पिण्यासाठी किंवा औषध धुरळणी किंवा फवारणीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जागा उपलब्ध न झाल्यास ज्या ठिकाणी गोदाम उभारणी करणार आहे, त्या ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी योग्य असणे आवश्यक आहे. जेणेकरून विहीर अथवा कूपनलिका घेऊन त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होऊ शकते.

वरीलपैकी दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध नसतील तर बाहेरून पाणी आणण्याचा खर्च प्रकल्पात गृहीत धरावा.

कूपनलिकेचे पाणी उपलब्ध असेल तर ते आरोग्य, बांधकाम करण्यासाठी योग्य असल्याची पाणी परीक्षण करून खात्री करून घ्यावी.

गोदाम उभारणी खर्चाचे नियोजन :

गोदाम उभारणीसाठी निवडलेली जागा उंच सखल भागात असेल आणि सपाट नसेल तर अशा जागेचा विकसित करण्याचा खर्च सुद्धा प्रकल्प किमतीमध्ये गृहीत धरावा. जागा विकसित करण्याच्या खर्चामध्ये अंतर्गत रस्ते व कंपाउंड भिंत याबाबतची तरतूद करावी. जर गोदाम उभारणीची जागा काळ्या जमिनीवर असेल तर त्यावरील काळी माती काढून जो पर्यंत मुरूम लागत नाही तोपर्यंत पाया घेण्यासाठी जमिनीचे खोदकाम करणे जरुरीचे असते. त्यानंतर त्यात मुरूम भरणे गरजेचे असते. यासाठी मुरूम किती अंतरावरून आणणार हे अंतर नमूद करावे. हे अंतर ५ किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेणे किंवा त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखड्यामध्ये मुरूम आणण्याचा खर्च व शासनाची रॉयल्टी भरणे गरजेचे असते. जर गोदाम उभारणीच्या जागेपासून जवळपास वजन काटा नसेल तर किमान ४० टन इलेक्ट्रॉनिक वजन काटा उभारणे आवश्यक आहे. याकरिता आवश्यक तो खर्च प्रकल्प किमतीत गृहीत धरणे गरजेचे आहे. गोदामाजवळ ४० टन क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा ः गोदामात ठेवण्यात येणाऱ्या मालाचे योग्य वजन करण्याच्या अनुषंगाने व पुन्हा तोच माल परत करताना योग्य वजन घेण्यासाठी वजन पावती महत्त्वाची असते. याकरिता जवळपासच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक वजन काटा उपलब्ध नसेल तर गोदामाच्या प्रवेशदाराजवळ किमान ४० टन क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा उभारणे आवश्यक आहे.

गोदाम उभारणीचे प्रत्यक्ष स्थान गोदामातील शेतीमाल अथवा अन्य प्रकारच्या मालाची वाहतूक सुलभ, जलदगतीने, सुरक्षितरीत्या व कमी खर्चात होण्याच्या अनुषंगाने गोदामाचे ठिकाण रेल्वे स्टेशन, विमानतळ व समुद्रमार्गाने होणाऱ्या वाहतुकीच्या टर्मिनलपासून जवळ असावे. गोदाम उभारणीची जागा वाहतुकीमुळे होणारी गर्दी व झोपडपट्टी विकसित होणे वगैरे सारख्या अडचणी टाळण्याच्या अनुषंगाने शहरापासून शक्यतो दूर अथवा शहराबाहेर असावी. जर शहरामध्ये गोदाम उभे केले असेल तर त्या भागाचे शहरीकरण लवकर होते. अशा वेळेस मोठा पाऊस झाल्यास गोदाम परीसरातील मोकळ्या जागेत पाणी साठून गोदामाच्या बांधकामास धोका निर्माण होऊ शकतो. - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT