मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Agriculture Warehouse Technology : जागतिक बँक अर्थ साह्यित स्मार्ट प्रकल्पामध्ये गोदामांच्या डिजिटायझेशनकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत भारतातील गोदाम क्षेत्राशी निगडीत कंपन्या गोदाम व्यवस्थापनात कोणत्याही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत नव्हत्या. परंतु काळाची पावले ओळखून त्यांनी तंत्रज्ञान वापरास सुरुवात केली आहे.
सॅप आधारित ईआरपीसारख्या तंत्रज्ञानाचा खासगी आणि शासकीय क्षेत्रातील गोदाम कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या प्रणालीची सर्व भिस्त क्षेत्रीय स्तरावर कार्यरत त्यांच्या संगणक सहायकावर अवलंबून असते. गोदाम व्यवस्थापनातील सर्व कामकाज अजूनही कर्मचाऱ्याच्या गुणवत्तापूर्ण कामकाजावर अवलंबून आहे.
‘आरएफआयडी टॅग’चा वापर
एनसीडीईक्स हे मान्यताप्राप्त गोदामांमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञान लागू करणारे कमोडिटी एक्स्चेंज आहे. भारतातील या अग्रगण्य कमोडिटी एक्स्चेंजने कृषी क्षेत्राशी निगडीत गोदामांमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा वापर सुरू केला.
त्यापैकी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी २० जुलै २०१६ रोजी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्राशी निगडीत गोदाम व्यवस्थेमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) आधारित प्रणाली लागू करण्याचा हा पहिला आणि एकमेव प्रयत्न आहे;
एक्स्चेंजने गवार गमसाठी सर्व वितरण केंद्रांवर (जोधपूर, बिकानेर, नोखा, श्रीगंगानगर आणि दिसा) टप्प्याटप्प्याने आरएफआयडी टॅग सुरू करण्याची योजना आखली आहे. नंतर ही सुविधा सर्व गोदामांमध्ये वापरण्यात येईल.
कमोडिटी डेरिव्हेटिव्ह प्लॅटफॉर्मच्या बळकटीकरणासाठी गोदाम आणि शेतमाल वितरण व्यवस्थेशी निगडीत यंत्रणा मजबूत करण्यासाठी एक्स्चेंजने अनेक पावले उचलली आहेत.
एकात्मिक मॉडेल : अपना गोदाम
माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काही कंपन्या, स्टार्टअप यांचेमार्फत गोदाम व्यवसायात उत्तम कामगिरी करण्यात येत आहे. अपना गोदाम हे कृषी क्षेत्रातील त्यापैकीच एक स्टार्ट अप आहे. अशा प्रकारचे गोदाम व्यवसायातील मॉडेल शेतकरी कंपनी, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन या समुदाय आधारित संस्थांना गोदाम व्यवसाय उभारणीमध्ये उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक समुदाय आधारित संस्थेने अशा प्रकारच्या मॉडेलचा अभ्यास करून अनुकरण करण्यास हरकत नाही.
अपना गोदाम हे राजस्थान राज्यातील जयपूर येथील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप आहे. त्यांनी बंद कारखाने, जुने शेड आणि उपयोगात नसलेल्या इमारती अशा वास्तूंचे वैज्ञानिक गोदामांमध्ये रूपांतर केले. ही कंपनी गोदामाशी निगडीत सेवा, कमोडिटी फायनान्स आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे या सर्व सेवा त्यांनी तयार केलेल्या ॲप पोर्टलच्या साह्याने पुरविते.
हे स्टार्ट अप सहा राज्यांत काम करीत आहे. त्यांच्यामार्फत शेतीमालाचे उत्पादन होणाऱ्या क्षेत्राजवळ गोदाम उभारण्यात येत आहेत. सदर कंपनीची एक वित्त कंपनी आहे. यामार्फत कंपनीच्या गोदामांमध्ये साठवलेल्या वस्तूंसाठी शेतीमाल तारणाच्या उद्देशाने वित्त पुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत कंपनी फक्त राजस्थानमधूनच शेतमाल खरेदी करते आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात शेतीमालाचा पुरवठा करते.
अपना गोदाम मार्फत विविध शेतीमालाची खरेदी, साठवणूक, शेतमाल तारण, वित्तपुरवठा या सुविधा देण्यात येत आहेत. हरभरा, बार्ली, गवार, मोहरी यांसारख्या शेतीमालाची विक्री करण्यात येते. या स्टार्ट अप तर्फे फिजिटल वेअरहाउसिंग सिस्टीम तयार केली आहे.
या प्रकारात डिजिटल अनुभवांना भौतिक अनुभवांसोबत जोडले जाते. खरेदीदार व विक्रेता यांचा परस्पर संवादाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या शेतीमाल पुरवठा साखळीचे बळकटीकरण करणे, वादविरहित आणि शाश्वत पुरवठा साखळी निर्माण करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. यामुळे विक्रेता हा खरेदीदाराला फोन कॉल करू शकेल आणि अपना गोदामच्या आयव्हीआर प्रणालीद्वारे त्यांना ऑनलाइन व्यापार करता येईल.
शेतीमालाची खरेदी
अपना गोदाम कंपनीमार्फत थेट शेतकऱ्याच्या शेतातून शेतीमाल खरेदी करण्यात येतो. कंपनीच्या ॲपवर खरेदीदार त्यात दिलेल्या किमतीवर शेतमालाची आगाऊ मागणी नोंदवून खरेदी करू शकतात.
जेव्हा खरेदीदाराकडून शेतीमालाची मागणी नोंदविली जाते, तेव्हा शेतकऱ्याला अॅपवर सूचना मिळते. शेतकऱ्याला शेतीमालाची मिळालेली किंमत ही वाहतूक खर्च आणि बाजार फी सारख्या इतर कपातींचे समायोजन करूनच दिली जाते.
ही किंमत खरेदीदाराने शेतीमालाला दिलेल्या दराइतकीच असते. यालाच शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळालेली शेतीमालाची किंमत (टेक होम प्राइस) असे म्हणतात. शेतीमाल उत्पादनाची गुणवत्ता चाचणी शेतातून शेतीमाल बाहेर घेऊन जात असताना केली जाते.
शेतीमालाच्या गुणवत्ता चाचणीचे निकष त्याचक्षणी कळविले जातात. मोहरीसारख्या काही शेतीमालामध्ये आवश्यक असलेली रासायनिक चाचणी प्रयोगशाळेत नमुना पाठवून केली जाते. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी १ते २ दिवस लागतात.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कंपनीकडे लॉजिस्टिक सुविधा किंवा शेतीमालाची वाहतूक व हाताळणी विषयक सुविधा उपलब्ध आहे. याकरिता स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. खरेदीदाराकडून शेतीमाल खरेदीसाठी २ टक्के अतिरिक्त व्यवहार शुल्क घेतले जाते.
शेतीमाल साठवणूक
अपना गोदाम या कंपनीची राजस्थानमध्ये १४ गोदामे आहेत. ही सर्व भाड्याची गोदामे असून बंद अवस्थेतील कारखाना किंवा साठवणूक करण्यात येणाऱ्या जागेचे वैज्ञानिक गोदामामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. प्रत्येक गोदाम ५०० ते ५००० टन क्षमतेचे आहे.
अपना गोदाम कंपनीची एकूण साठवणूक क्षमता ४८,००० टनांपेक्षा अधिक आहे. या गोदामांची एकदा वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडे (WDRA) नोंदणी करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. अपना गोदाम कंपनीस वैयक्तिकरित्या आलेला अनुभव व त्याची काही प्रमुख कारणे आहेत:
वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत गोदामांच्या नोंदणीशुल्काची आणि व्यवहाराची जास्त किंमत. वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत गोदाम नोंदणीकृत असूनही बँका शेतीमाल तारण व्यवस्थापन कंपन्यांच्या व्यवस्थापकाशिवाय तारण कर्ज देण्यास तयार नाहीत.
खरेदीदार वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत गोदामांच्या व्यवस्थापनावर समाधानी नाहीत. वखार विकास व नियामक प्राधिकरण नोंदणीचे कोणतेही अतिरिक्त फायदे नसल्याचा अनुभव अपना गोदाम कंपनीस आला. परंतु प्रत्येक गोदाम व्यवस्थापन कंपनीस वरीलप्रमाणे अनुभव येईलच असे नाही. परिस्थितीनुरूप प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात.
जेव्हा खरेदीदार किंवा विक्रेता यांचा एनसीडीईएक्स किंवा एमसीएक्स या कमोडिटी एक्स्चेंजवर व्यापार करतो तेव्हाच अपना गोदाम कंपनीला वखार विकास व नियामक प्राधिकरण गोदाम नोंदणीकृत करणे आवश्यक असते परंतु असे क्वचितच घडते.
गोदाम पावती/शेतीमाल तारण सुविधा
अपना गोदाम कंपनीची स्वतंत्र वित्त शाखा असून या शाखेमार्फत शेतकरी, व्यापारी व प्रक्रियादार यांचेसाठी तारण वित्तपुरवठा सुविधा उपलब्ध आहे. शेतीमाल तारण कर्जाचे व्याजदर तारण कर्ज ते शेतीमालाचे मूल्य यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असते.
कंपनीमार्फत गहू, बार्ली आणि मोहरीसाठी साठवणूक खर्च १०० रुपये प्रति टन प्रति महिना आणि भुईमूग साठवणुकीकरिता १३० रुपये प्रति टन प्रति महिना आहे. साठवणुकीमधून मिळणारा महसूल गोदामाचा मालक आणि अपना गोदाम कंपनी यांच्यात समान ५० टक्क्यांच्या आधारावर वाटप केला जातो. परंतु साठवणूक करताना लागणारा सर्व खर्च अपना गोदामामार्फत करण्यात येतो.
गहू, बार्ली, हरभरा, भुईमूग या शेतमालाला त्याच्या एकूण मूल्याच्या ९० टक्के कर्ज १५ टक्के व्याजदराने किंवा ६० टक्के कर्ज १२ टक्के व्याजदराने दिले जाते. तसेच मोहरीच्या बाबतीत एकूण मूल्याच्या ७० टक्के कर्ज १२ टक्के व्याजदराने आणि गवारीच्या बाबतीत एकूण मूल्याच्या ४० टक्के कर्ज १२ टक्के व्याजदराने दिले जाते.
कृषी कायदा सुधारणांचा प्रभाव
कोविड-१९ निर्बंधांतर्गत मंडई आणि इतर बाजारपेठा बंद झाल्यामुळे, मोबाइल ॲपद्वारे ‘अपना गोदाम’ची विक्री वाढली होती. डिजिटल ॲप तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सर्रासपणे गेल्या १.५ वर्षांत ॲप वापरामध्ये ४०० टक्के वाढ झाली आहे.
शेतीमालाच्या किमतीतील अस्थिरता आणि किमतीच्या प्रसाराचे विश्लेषण दर्शविते की, गहू आणि मसूर या शेतमालाच्या बाबतीत शेतमाल किमतीतील अस्थिरता कमी होणे आणि गव्हाच्या किमतीतील घट कमी होणे या घटकांवर गोदामांची साठवणूक क्षमता परिणामकारक ठरू शकते असे निदर्शनास आले आहे.
तथापि धान्य उत्पादन आणि व साठवणुकीच्या प्रमाणात लक्षणीय विसंगती असून उत्पादनाच्या तुलनेत गोदामाची क्षमता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे अपना गोदाम कंपनीचे निरीक्षण आहे.
नवीन पद्धतीची साठवणूक जसे की हर्मेटिक स्टोअरेजच्या माध्यमातून लहान आकाराचे शेतीमालाचे लॉट आणि दर्जेदार साठवणूक समस्या यावर उपाय उपलब्ध आहेत, परंतु या तंत्रज्ञानाचा पुरेसा अवलंब झालेला नाही.
शासनामार्फत अशा साठवणूक प्रकारास व गोदामाचे डिजिटायझेशन यांना प्रोत्साहन दिल्यास त्याचा वापर वाढून हर्मेटिक स्टोअरेज व डिजिटायझेशनशी निगडीत तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध होऊ शकेल. साठवणुकीच्या बाबतीत साठवणुकीच्या एकात्मिक मॉडेल्सला प्रोत्साहन दिले तर शेतकरी वर्गाला अनेक सेवा देणे शक्य होणार आहे.
प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०,
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.