Deshi Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Deshi Seeds : शेडशाळमध्ये रुजतेय देशी बियाणे संवर्धनाची चळवळ

बचत गटातील महिलांचा पुढाकार, दत्त कारखान्याचे सहकार्य, ५४ प्रकारच्या देशी वाणांची जपणूक

Raj Chougule

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : ऊस व भाजीपाल्याचा लौकिक असणाऱ्या शिरोळ तालुक्यात आता देशी बियाणे (Deshi Seeds) संवर्धनाची चळवळ रुजत आहे. शेडशाळ (ता. शिरोळ) येथील १३० महिलांनी एकत्रित येऊन देशी वाणांच्या बियाण्यांची बँक (बीजबँक) तयार केली आहे. ‘स्व. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँक’ ( Patil Women's Foundation SeedBank) या नावाने ही बीजबँक मोठा आकार घेत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अखंडितपणे सुमारे ५४ प्रकारच्या देशी वाणांचे संवर्धन या महिलांनी एकत्रितपणे केले आहे. राज्यात ऊस उत्पादकांचे उत्पादन उच्चांकी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली या बँकेचे कामकाज सुरू आहे.

...अशी झाली सुरुवात
१९ नोव्हेंबर २०२० ला शेडशाळ शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., शेडशाळ या संस्थेचा २१वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात गणपतराव पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांना देशी वाण बीज बँकेबद्दल मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्ह्यामधील बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे उदाहरण देऊन त्यांच्या कार्याचा आढावा सांगितला. या कार्यक्रमानंतर देशी बियाणे संवर्धनाची चळवळ सुरू झाली.

स्व. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँक नावाखाली गोकूळ महिला बचत गटाच्या महिला एकत्र आल्या. शेतकरी समूह संस्थेचे सचिव आणि दत्त कारखान्याचे संचालक निजाम पाटील, रावसाहेब चौगुले यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्याकडून काही बियाण्यांचे संकलन केले. याचबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातूनही जिथून जिथून बिया मिळतील तिथून त्या खरेदी करण्यात आल्या.

एक ग्रॅमपासून खरेदी
एका ग्रॅमपासून बियाण्यांची खरेदी करण्यात आली. यासाठी हजारो रुपये देण्यात आले. दत्त कारखान्याने काही बिया बाहेरून मागवल्या. हे बियाणे रुजविण्यासाठी गटातील सदस्यांनी स्वतःची शेती देऊ केली. रूपाली सुरेश मेंगे यांनी स्वमालकीचा ३ गुंठ्यांचा प्लॉट दिला. यासह सात गुंठे क्षेत्रावर विविध प्रकारचे बियाणे रुजत आहे. बियाणे बँक ही संकल्पना नवीन असल्याने कृषी विभाग व अन्य काही जाणत्या तज्ज्ञांकडून लागवडीची माहिती घेण्यात आली.

कोणत्या भाज्या किती क्षेत्रात कशा पद्धतीने कराव्यात याबाबतचे धडे पंचायत समितीचे नीलेश डवरी, अप्पा पाटील कृषी विभागाच्या वैदेही पाटील यांनी दिले. गुरुप्रसाद कोरवी यांनी पाणी, तर बियाणे लागवडीनंतर त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दत्त कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, प्रयोगशाळा प्रमुख ए. एस. पाटील आदी तज्ज्ञांनी या महिलांच्या प्लॉटला सातत्याने भेटी देऊन पाणी व्यवस्थापन व सेंद्रिय औषध व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

महिलांची स्वयंफूर्तीने राबणूक
महिलांनी आपल्या वेळेनुसार या प्लॉटचे व्यवस्थापन केले. या प्लॉटशिवाय अनेक बचत गटातील महिलांनी स्वतःच्या परसबागेमध्ये ही काही बिया रुजवल्या. अनेक बियाणे नवीन व दुर्मीळ असल्याने त्याची खूपच काळजी घ्यावी लागली. गटातील महिला दररोज जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे बियाणे संवर्धनाची काळजी घेतात. गेल्या दोन वर्षांत फक्त बियाणे निर्मितीच करण्यात आली आहे. ग्रॅममध्ये घेतलेले बियाणे आता किलोत तयार झाले आहे. गाडग्यामध्ये राखेचा वापर करून ते आता सुरक्षित ठेवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळणार नाही असे बियाणेही या महिलांनी संवर्धित करून ठेवले आहे. गटाच्या अध्यक्ष शमशादबी पठाण, सचिव वैशाली संकपाळ यांच्यासह अन्य महिला बियाणे संवर्धनाच्या कामात पुढाकार घेत आहेत.


प्रसाराबरोबर बरोबर बियाणे संकलनही वाढवणार हे वाण विक्रीसाठी तयार असून, त्याची स्थानिक ठिकाणीच विक्री करण्यात येणार आहे. शेतकऱ्याने घेतलेल्या देशी बियाण्यांच्या तिप्पट बियाणे परत करायच्या हमीवरच बियाण्यांची विक्री त्याला करण्यात येईल. तालुक्यात देशी वाणांची लागवड व प्रसार असे दोन्ही उद्देश ठेवून ही चळवळ सुरू आहे.

चौकट हळद, राजमा, भोपळा, पिवळा मूग, आंबट चुका, श्रावण घेवडा, मेथी, लाल चवळी, पांढरी चवळी, पिवळी चवळी, पांढरा घोसावळ, हरभरा, गाजर, हिरवे मूग, नाचणी, सूर्यफूल, राजगिरा, तूर, उडीद, गवारी, भेंडी, दुधी, भोपळा, दोडका, शेपू, लाल तांदळी, काळा घोसावळ, हिरवी पापडी, पाटोदा, लाल अंबाडी, हिरवी अंबाडी, जवस, काळा वटाणा, चौरंगी, हिरवी भेंडी, काकडी, देशी लसूण आदी बियाणे आता या बँकेत जमा झाले आहे

नामशेष होणारे देशी बियाणे शिरोळ तालुक्यात संवर्धित करण्याचा प्रयत्न आम्ही महिला करीत आहोत. दत्त कारखान्यासह अन्य संस्थांनी आम्हाला मोठी मदत केल्याने आम्ही नक्की चळवळ यशस्वी करून दाखवू. अल्पावधीतच आम्ही अनेक किलो बियाण्यांची साठवण केली आहे. - शमशादबी पठाण, अध्यक्ष, स्व. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, महिला बीज बँक ९१७२३५५२५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT