Hybrid Seed : संकरित बियाणे

१ ९६० च्या दशकात भारत सरकारने अमेरिकेतील  रॉकेफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने भारतात गहू, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांची सुधारित आणि संकरित वाणे आणली. आणि तेव्हापासून भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली.
Hybrid Seed
Hybrid SeedAgrowon

१९६० च्या दशकात भारत सरकारने अमेरिकेतील रॉकेफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने भारतात गहू (Wheat), मका, ज्वारी आणि बाजरी (Pearl Millet) या पिकांची सुधारित आणि संकरित वाणे (Hybrid Seed) आणली. आणि तेव्हापासून भारतात हरित क्रांतीची (Green Revolution) सुरुवात झाली. त्या काळी भारतातील प्रचलित समाजवादी अर्थव्यवस्थेनुसार महत्त्वाचे सर्व उद्योगधंदे, म्हणजे कोळसाखाणी, दळणवळण, वीजनिर्मिती इ. सरकारनेच चालवायचे असे धोरण होते.

Hybrid Seed
Seeds : दर्जेदार बीयाणे देते उत्पादनाची शाश्वती

त्यामुळे ह्या नव्या वाणांचे बियाणे निर्माण करून ते विकण्यासाठी नॅशनल सीड्स् कॉर्पोरेशन या नावाने एक सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली होतीच. तसेच रॉकेफेलर फाउंडेशनच्या प्रोत्साहनाने भारतात काही खासगी कंपन्यांनीही सुधारित आणि संकरित वाणांचे बीजोत्पादन व विक्री सुरू केली होती. सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे बनबिहारी निंबकर यांनी सन १९६४ साली स्थापन केलेली निंबकर सीड्स् ही कंपनीसुद्धा त्यातलीच एक होती. निंबकर हे माझ्या थोरल्या बहिणीचे यजमान.

Hybrid Seed
Soybean Seed : ‘आगामी खरिपासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवा’

मी १९६४ मध्ये कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात वनस्पति‍शास्त्राचा प्रमुख म्हणून रुजू झालो. त्यावेळी मी सायबर्नेटिक्स नामक एका तात्त्विक विषयावर संशोधन करीत होतो; पण एक वनस्पतिशास्त्रज्ञ या नात्याने भारतात नव्याने आलेल्या या सुधारित आणि संकरित वाणांबद्दल मला कुतूहल होते. मी कधी फलटणला गेलो की या विषयावर निंबकरांशी चर्चाही करीत असे. नव्या सुधारित आणि संकरीत वाणांमुळे देशातील धान्योत्पादनात वाढ झाली यात शंकाच नव्हती. पण अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी या वाणांना रासायनिक खते, पीकसंरक्षक औषधे आणि रब्बी हंगामात पाणीही द्यावे लागायचे. शिवाय शेतकऱ्यांना संकरित बियाणे दरवर्षी नव्याने विकत घ्यावे लागते.

अशा विविध कारणांमुळे सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारचे कृषी खाते सुधारित व संकरित जातींना विरोध करायचे. ‘श्रीमंत शेतकऱ्यांचे खेळ’’ अशी त्यांची हेटाळणी करायचे. याचा परिणाम असा झाला की बीजोत्पादनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात निंबकरांना सरकारी कषी खात्याची काहीच मदत होत नसे. म्हणून निंबकरांनी १९६६ साली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना एक प्रस्ताव दिला.

Hybrid Seed
Soybean Seed : केवळ बीजोत्पादनासाठी घ्या उन्हाळी सोयाबीन

निंबकरांना शिवाजी विद्यापीठाने बीजोत्पादनात मदत करावी आणि त्याचा खर्च निंबकरांकडून घ्यावा, असा हा प्रस्ताव होता. पण एका व्यापारी कंपनीसाठी विद्यापीठाने काम करावे ही कल्पना त्या काळच्या सरकारी धोरणात बसत नसल्याने हा प्रस्ताव फेटाळला गेला. यावर निंबकरांनी मलाच निंबकर सीड्स या कंपनीत संशोधनप्रमुख म्हणून येण्याचे आमंत्रण दिले. मी ते स्वीकारले आणि सन १९६७ पासून निंबकरांकडे कामाला लागलो. कंपनीत माझ्याबरोबर काम करणारे चारही सहकारी हे कृषी पदवीधर होते; पण त्यांचे शिक्षण माझ्या प्रमाणेच हरितक्रांतीच्या अगोदरच झालेले होते.

दोन भिन्न जातींच्या वनस्पतींचा संकर केल्याने संकरित बीज निर्माण होते. वनस्पतींच्या फुलांमधले पूंकेसर आणि स्त्रीकेसर हे सर्वसाधारणपणे एकाच फुलात असतात. ज्या दोन जातींचा संकर करावयाचा त्यांपैकी एका जातीच्या फुलातले पूंकेसर नष्ट केले तर त्या फुलांचे स्वपरागीकरण टाळता येते. मक्याच्या बाबतीत हे काम फार सोपे असते; कारण मक्याची नर फुले मक्याच्या शेंड्याला येणाऱ्या तुऱ्यात असतात तर मादीफुले खोडावर पर्णसंभाराखाली असलेल्या कणसात असतात.

त्यामुळे परागनिर्मितीपूर्वी मक्याचा तुरा खुडला की त्याचे स्वपरागीकरण टळते. फक्त मादीफुले असलेल्या वनस्पतीच्या ओळीशेजारी परागकण निर्माण करू शकणाऱ्या नर वनस्पतीची ओळ लावली की मादी फुलांचे परागीकरण शेजारच्या ओळीतल्या नर वनस्पतीच्या परागकणांनी आपोआप होते. पुढे जननशास्त्रातील काही हिकमतींचा वापर करून पूंकेसर निर्माण करण्याची क्षमता नसलेल्या जाती मुद्दाम निर्माण करण्यात आल्या. त्यांना मादीवाण असे म्हणतात.

धान्यपिकांमध्ये परागीकरण वाऱ्याने केले जाते तर द्विदल पिकांमध्ये हे काम मुख्यतः मधमाश्या करतात. मादीवाणात जे बी भरते ते संकरित बीज असते. सध्या भारतात मका, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ या चार धान्यांची आणि कपाशी, तूर, सूर्यफूल, करडी, भेंडी, वांगे, कोबी, फुलकोबी, टोमॅटो, टरबूज, काकडी इ. या वनस्पतींचेही संकरित बीज मिळू लागले आहे. विशेष काळजी घेतल्यास शुद्ध वाणेसुद्धा चांगले उत्पन्न देतात पण प्रतिकूल परिस्थितीत ती टिकाव धरू शकत नाहीत. १९७२ च्या दुष्काळात स्थानिक ज्वारीची पिके वाळून गेली पण संकरित ज्वारीने मात्र चांगले उत्पन्न दिले.

या दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा संकरित पिकांबद्दलचा आकस नाहीसा झाला. प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरून राहण्याचा गुणधर्म आपल्या संकरित वाणात आणायचा असेल तर संकरासाठी वापरलेली दोन वाणे ही वेगवेगळ्या भोगोलिक विभागातली असावीत, असा एक संकेत आहे. भारतातल्याच दोन जातींचा संकर केल्यास निर्माण होणारे संकरित वाण फारसे चांगले उत्पन्न देत नाही. पण आपल्या सुदैवाने ज्वारी आणि बाजरी या दोन्ही पिकांची लागवड आफ्रिका खंडातही केली जाते. त्यामुळे या दोन्ही धान्यपिकांमध्ये आपण भारतीय आणि आफ्रिकी वाणांचा संकर करून प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पन्न देणारी संकरित वाणे निर्माण करू शकलो.

आपल्या देशात तयार झालेली संकरित वाणे केवळ भारतातच नाही जर जगात सर्वत्र चांगले उत्पन्न देतात, असे आढळून आले आहे. आपल्या देशात प्रचलित असलेली अखिल भारतीय समन्वयित चाचणी हे याचे एक कारण आहे. भारतात कोणीही नवे वाण विकसित केले की त्याची भारतातल्या सुमारे ३० ते ४० संशोधनकेंद्रांत चाचणी केली जाते आणि या चाचणीत त्या वाणाने दिलेले सरासरी उत्पन्न जर सरस दिसले तरच त्या वाणाला सार्वत्रिक लागवडीची परवानगी मिळते. आपला देश प्रचंड मोठा असून त्यात ऋतुमान, पाऊसमान, तापमान, मातीचे प्रकार इ. घटकांमध्ये खूप वैविध्य आढळते. त्यामुळे या समन्वयित चाचण्यांमध्ये जे वाण चांगले ठरते ते जगात इतर ठिकाणीही यशस्वी ठरते.

हरितक्रांतीमुळे संकरित बियाणे निर्माण करणे आणि विकणे हाही एक मोठा उद्योग बनला आहे. पूर्वी शेतकरी आपल्या घरचेच बी वापरत असे, कारण तो शुद्ध वाणेच वापरत असे. याउलट संकरित वाणांचे बीज दरवर्षी नव्याने घ्यावे लागते; कारण संकरित वाणांचे सद्गुण एका पिढीपुरतेच मर्यादित राहतात.

वनस्पतिशास्त्र शिकणाऱ्यांना कदाचित हे माहिती असेल की काही वनस्पतींमधले बी त्याच वनस्पतीच्या शाकीय पेशिकांपासून बनलेले असते आणि त्यामुळे आपल्या मातृवनस्पतीचे गुण नव्या पिढीत जसेच्या तसे उतरतात. बऱ्याच गवतांमध्ये हा गुणधर्म आढळतो. त्याला ॲपोमिक्सिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. जर जनुकीय अभियांत्रिकीने संकरित वाणांमध्ये हा गुणधर्म आणता आला तर लक्षावधी टन संकरित बीज दरवर्षी नव्याने निर्माण करण्यासाठी लागणारी जमीन, रासायनिक खते, पाणी आणि मनुष्यबळाचा अपव्यय टाळणे शक्य होईल.

: ९८८१३०९६२३,

(लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्‍वस्त आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com