Agriculture Department Officer
Agriculture Department Officer Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Officer : कृषी विभागातील सक्षम अधिकारी क्रांती चौधरी यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केले शेतीमाल विक्रीचे प्रारूप

मनोज कापडे

Nagar News : नगर जिल्हा परिषदेत (Nagar Zilha Parishad) कृषी अधिकारीपदी कार्यरत क्रांती रवींद्र चौधरी-मोरे यांनी स्वतंत्र ओळख तयार केली आहे. बायोगॅस विकास योजना, कार्यालयीन प्रशासन व्यवस्थेला मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

उदगीर तालुक्यातील (जि. लातूर) स्वातंत्र्यसेनानी मोहनअप्पा चौधरी यांच्या त्या नात. त्यामुळे आजोबांचे संस्कार व ग्रामीण विकासाची संकल्पना मनात खोलवर रुजलेली. मुलगी झाल्यास नाव क्रांती ठेवा अशी लेखी सूचनाच आजोबांची होती.

वडील डॉ. रवींद्र यांनी ती पाळली. त्यांनी ग्रामीण भागात निष्ठेने वैद्यकीय सेवा केली. क्रांती यांचा विवाह १९९८ मध्ये डॉ. सतीश मोरे यांच्याशी झाला. परभणी येथील कृषी विद्यापीठातून पदवी तर राहुरी येथील कृषी विद्यापीठातून जलसिंचन व्यवस्थापनात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

सन २००३ मध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून क्रांती नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झाल्या. पेण, उरण, नगर आदी भागांत नोकरी केली. प्रत्येक ठिकाणी कामाचा ठसा उमटवला. सन २००९ मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे कृषी विभागात अधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या.

कोविड काळातील प्रशंसनीय कार्य

सन २०१२ ते २०१९ पर्यंत उरण येथे महिला बचत गटांची बांधणी केली. सन २०२० मध्ये कोविडमध्ये उरण तालुक्यात लॉकडाउनमध्ये क्रांती यांनी शेतकरी आणि ग्रामीण महिलांचे व्हॉट्‍सॲप ग्रुप्स तयार केले. त्यातून शहरी ग्राहकांना थेट शेतीमाल विक्रीचे प्रारूप विकसित केले.

त्याद्वारे कोविडच्या पहिल्या वर्षी नऊ लाखांची, तर २०२१ मध्ये ७० लाख रुपयांच्या आंब्याची विक्री झाली. शेतकऱ्यांनी २५ लाखांचा भाजीपालाही थेट विकला. त्यातून त्यांचा नफा वाढला. ग्राहकांनाही वाजवी किमतीत खात्रीशीर माल घरपोच मिळाला. पुढे विविध जिल्ह्यांतील शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी येऊ लागला.

फार्म टू होम, होम टू फार्म, फॅमिली फार्मर आदी संकल्पना, विश्‍वासार्हता व पारदर्शकता ही सूत्री यशस्वी झाली. शासनाने या उपक्रमाला राज्यातील सर्वोत्कृष्ट नावीन्यपूर्ण बाब म्हणून गौरविले. या संकल्पनेचे नवी मुंबईत एक लाख ग्राहक तयार झाले. शेतकरी व बचत गट त्या माध्यमातून विक्री करीत आहेत.

शेतकऱ्यांना प्रेरणा

शहरी मागणी अभ्यासून शेतकऱ्यांना क्रांती यांनी विक्री व्यवस्थापनाचे धडे देत स्वावलंबी केले. त्या प्रेरणेतून अनेक ग्रामीण तरुणांनी विक्री व्यवसाय उभारले. आदिवासी शेतीमाल व रानभाज्या विक्रीसाठी मोठे दालन मिळाले.

राज्यभरातील व्हॉट्‍सॲप ग्रुपचे जिल्हानिहाय शेतकरी समन्वयक तयार केले. त्यातून अनुभव, उत्पादने, नावीन्यपूर्ण संकल्पनांचे आदानप्रदान झाले. आज असंख्य शेतकऱ्यांसह ६० बचत गट समूहात समाविष्ट आहेत. त्याचा लाभ कर्नाटक, तमिळनाडूचे शेतकरीही घेत आहेत. शेकडो ‘ऑनलाइन’ मार्गदर्शन व संवाद कार्यशाळा घेणाऱ्या क्रांती संवेदनशील कृषी अधिकारी ठरल्या.

विविध आघाड्यांवर कसरत

सकारात्मक दृष्टिकोनातून कामे करीत शेतकऱ्यांना होणारा फायदा हेच आत्मिक समाधान असल्याचे क्रांती सांगतात. नोकरी, मुलांचे शिक्षण, करिअर व शेतकरी सेवा अशी रोजची कसरत करताना चेहऱ्यावरचा आनंद त्या कायम ठेवतात.

मुलगी मैत्री पुण्यात संगणकशास्त्र शिक्षण घेत असून, उत्कृष्ट जलतरणपटू आहे. मुलगा प्रेम आठवीत शिकतो आहे. पती डॉ. सतीश जीवनातील आधारस्तंभ ठरले आहेत. कार्यालयीन वरिष्ठांचेही प्रोत्साहन असते.

सन्मान

- सन २०१९ मध्ये राज्य शासनाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या क्रांती प्रथम महिला अधिकारी ठरल्या.

- थेट शेतीमाल विक्री प्रारूपसाठी २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्याचा ‘टॉप इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट’ म्हणून गौरव.

-कोविड काळात उत्कृष्ट सेवेबद्दल कृषी आयुक्तांकडून तर आरोग्य सेवेला मदत केल्याबद्दल नवी मुंबई महापालिकेकडून गौरव

- रणरागिणी पुरस्कार (२०२१)

- पनवेल पंचायत समितीकडून गौरव

- उदगीरच्या संस्थेकडून सन्मान स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार.

संपर्क - क्रांती चौधरी-मोरे ९६५३१५९६७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

SCROLL FOR NEXT