
एम.एस्सी. (कृषिशास्त्र) शिक्षण झाल्यानंतर पूनम संजय चातरमल यांची २०१४ मध्ये ‘एमपीएससी’मधून कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. विभागामध्ये कृषी अधिकारी पदासह विविध पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नियमित जाऊन मार्गदर्शन करणाऱ्या महिला अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बांधावर आणि वेळेवर मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. त्यासाठी सतत प्रवास, दगदग करावा लागतो. पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या बाबी सहजशक्य असल्या तरी महिला म्हणून काही सुरक्षिततेच्या समस्या उद्भवू शकतात. या साऱ्या बाबींचा धाडसाने सामना करत पूनम चातरमल या कृषी विस्ताराचे काम पार पाडत आहेत.
मूळ नांदेड जिल्ह्यातील रत्नाळी (ता. धर्माबाद) येथील पूनम चातरमल यांनी बी.एस्सी.चे (कृषी) शिक्षण कृषी महाविद्यालय, लातूर येथे पूर्ण केले. तर कृषिशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून घेतली.
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगांच्या माध्यमातून त्या २०१४ मध्ये कृषी अधिकारी झाल्या. पहिली तीन वर्षे उमरखेड (जि. यवतमाळ) येथे कृषी अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली. या काळात त्यांनी फळबाग मूल्यांकन, माहिती अधिकार, विस्तार, मृद्संधारण, फलोत्पादन व सांख्यिकी या विभागांत आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली.
तालुका कृषी अधिकारी पदाची जबाबदारी
२०१८ मध्ये नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून रुजू झाल्या. याच काळात त्यांना सहा महिने तालुका कृषी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा मुख्यालयी तालुका कृषी अधिकारी पदावर काम करणे अधिक जबाबदारीचे मानले जाते.
या काळात त्यांनी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विस्तार, सांख्यिकी, फलोत्पादन, आस्थापना इ. विभागात नावीन्यपूर्ण काम केले. याच काळात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीचे ६० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते.
अशा तीव्र प्रादुर्भावाच्या काळामध्ये कृषी शास्त्रज्ञांच्या समवेत पूनम चातरमल यांनी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जात शास्त्रीय माहिती पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे नांदेड तालुक्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बऱ्याच
प्रमाणात नियंत्रणात राखण्यात यश आले. या काळात आवश्यक त्या गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा बांधावर पोहोचविण्याचे काम केले. तसेच या काळात फळबाग मूल्यांकन प्रस्ताव अद्ययावत करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठीही त्यांची तळमळ दिसून आली.
सध्या त्या नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) ‘प्रकल्प विशेषज्ञ’ या पदावर कार्यरत आहेत. त्या ‘पोकरा’ अंतर्गत संनियंत्रण व पाठपुरावा करण्याचे काम यशस्वीपणे सांभाळत आहेत.
श्रीमती पूनम यांचे पती संजय चातरमल हे अर्धापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ‘मंडल कृषी अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत. पतिपत्नी दोघेही कृषी विभागात कार्यरत असल्यामुळे अनेक वेळा दोघांना वर्कलोड एकाचवेळी असतो.
अशा काळातही दोन लहान मुले, वृद्ध सासू-सासरे यांच्या सेवा सुश्रुषेसोबत घराच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी त्या घेत असतात. त्याच वेळी शासकीय कामकाजामध्ये अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून शासकीय योजनांची लक्ष्ये साध्य करावी लागतात.
अर्थात, प्रत्येक ‘वर्किंग वूमन’ समोरही आव्हाने असतात. एकाच वेळी दोन तीन पातळीवर चाललेली कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते, असे त्या सांगतात.
विविध पुरस्कार
श्रीमती पुनम चातरमल यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा-२०१८’ मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल ‘शांताई प्रतिष्ठान’कडून पुरस्काराने गौरविले आहे.
-‘नांदेड जिल्हा कृषी महोत्सव -२०२३’ मध्ये प्रशंसनीय कामगिरीबद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.