डॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे
Prevention of Snail Infestation : मागील काही वर्षांपासून गोगलगाय किडीचा राज्यातील बहुतांश भागात प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही बहुभक्षी कीड असून सुमारे ५०० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते. या गोगलगायी आकर्षक वाटत असल्यातरी पिकांचे मोठे नुकसान करतात. बहुतांश लोक कुतूहलापोटी या गोगलगायी गोळा करतात. मात्र यामुळे अनावधाने गोगलगायींचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होतो. गोगलगायी व्यवस्थापनासाठी गावपातळीवर सामूहिकरीत्या प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होते.
ओळख
शंखी गोगलगायी या गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाचे असतात.
पाठीवर एक ते दीड इंच आकाराचे गोलाकार टणक कवच असते.
शंखी गोगलगाय सरपटत चालत चिकट स्त्राव सोडतात. या चिकट स्रावामुळे त्यांना सरपटत सरकत चालणे शक्य होते. हा स्त्राव वाळल्यावर शेतातील किंवा सभोवतालच्या रस्त्यावर चकाकणारा पांढरट पट्टा दिसून येतो. यावरून गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.
खाद्य
गोगलगायी विविध पिकांवर उपजीविका करणारी बहुभक्षी कीड आहे.
जमिनीवर पडलेली पिवळी पाने, फुले, फळे, शेणखत, शेण तसेच कुजलेला काडी कचऱ्यावर उपजीविका करतात.
ही कीड प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सक्रिय राहून पिकांचे नुकसान करते. दिवसा गोगलगायी पालापाचोळा, दगड, गवतामध्ये, जमिनीलगत खोडाभोवती किंवा भिंतीवर लपून बसतात.
रोप अवस्थेतील पिकाची पाने खाऊन फस्त करतात.
पोषक हवामान
कमी तापमान (२० ते ३२ अंश सेल्सिअस), सततचा पाऊस, ढगाळ वातावरण तसेच अति जास्त सापेक्ष आर्द्रता या बाबी गोगलगायींसाठी पोषक ठरतात.
गोगलगाय जीवनक्रम
गोगलगायी अत्यंत लहान ते मोठ्या आकाराच्या असू शकतात. पूर्ण वाढ झालेल्या शंखी गोगलगायीची लांबी १५ ते १७.५ सेंमी असू शकते.
झाडाच्या खोडाजवळ किंवा मुळाजवळ भुसभुशीत मातीमध्ये ५ सेंमी खोल छिद्र करून त्यात गोगलगायी अंडी घालतात.
एका वेळेला एक मादी सरासरी ८० ते १०० अंडी घालते.
अंडी साबुदाण्यासारखी पांढरी गोलाकार असतात.
अंडी अवस्था सरासरी १७ दिवसांची असते. १७ दिवसांनंतर अंड्यामधून पिल्ले बाहेर पडतात.
पिलांची संपूर्ण वाढ होण्यासाठी ८ ते १२ महिने इतका कालावधी लागतो. तसेच प्रौढ गोगलगायींचे आयुष्यमान तीन ते पाच वर्षांचे असते.
गोगलगायी अति थंड किंवा अति उष्ण तापमानामध्ये आपल्या कवचाचे तोंड पातळ आवरणाने बंद करून सुप्तावस्थेत जातात.
एकात्मिक व्यवस्थापन
शेताचे बांध, शेताचा परिसर स्वच्छ ठेवावा.
गोगलगायींच्या लपून बसण्याच्या जागा शोधून साफ कराव्यात.
शेतामध्ये तुषार सिंचनाऐवजी ठिबक सिंचन वापरावे. जेणेकरून जमिनीत अतिरिक्त ओलावा व सापेक्ष आर्द्रता वाढणार नाही.
झाडाच्या खोडाजवळ किंवा गवताच्या ढिगाखाली असलेली गोगालगायींची अंडी शोधून नष्ट करावीत.
गोगलगायींसाठी सापळा म्हणून १ ते १.५ फूट लांबीच्या दोन लाकडी पाट्यांना रिपा ठोकून बोर्ड तयार करावेत. असे बोर्ड प्रादुर्भावग्रस्त भागात ठिकठिकाणी ठेवावेत. बोर्डाच्या रिपा खालच्या बाजूने राहतील अशा पद्धतीने ठेवावेत.
प्रादुर्भावग्रस्त फळबागांमध्ये झाडाच्या खोडावर पातळ टीन पत्रे ४ ते ५ इंच रुंदीच्या पट्ट्या कापून त्या रुंदीला मध्यभागी काटकोनामध्ये मोडाव्यात आणि खोडांच्या घेरानुसार लांबीला कापून खोडावर) लावावेत. त्यामुळे गोगलगायींना झाडावर चढण्यास अडथळा निर्माण होतो.
फळ झाडांच्या खोडावर दरवर्षी बोर्डो पेस्ट लावावे. बोर्डो पेस्ट सर्व साधारणपणे एक ते दोन वर्षांपर्यंत प्रभावी ठरू शकते.
शेताच्या बांधानजीक चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा मारावा. जेणेकरून गोगलगायी मरतील किंवा तिथून पळ काढतील.
मोठ्या आकाराच्या गोगलगायी जमा करून प्लॅस्टिक पोत्यात भरून त्यात चुन्याची पावडर किंवा मीठ टाकून अशी पोती बांधाजवळ ठेवावीत.
रासायनिक नियंत्रण
मेटाअल्डीहाइड (२.५ टक्के भुकटी) २ किलो प्रति एकर या प्रमाणे पिकावर किंवा झाडांवर धुरळणी करावी. धुरळणी करताना अंगरक्षक पोशाख, हातमोजे, मास्क तसेच डोक्यामध्ये टोपी या साधनांचा वापर करावा.
गोगलगायींसाठी सापळा
गोणपाट किंवा गवताचे ढीग गूळ आणि पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळच्या वेळी शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. जेणेकरून त्याकडे गोगलगायी आकर्षित होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी गोणपाट किंवा गवताच्या ढिगाखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात किंवा कपडे धुण्याच्या पावडरच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
१५ टक्के मिठाच्या पाण्यात गोणपाट बुडवून प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये ठेवावीत. त्याकडे आकर्षित झालेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.डॉ. प्रमोद मगर, ७७५७० ८१८८५ (विषय विशेषज्ञ-कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.