Development of High Milk Yielding Cows : अर्बाना कॅम्पेन (अमेरिका) येथील इलिनॉइज विद्यापीठातील कृषी, ग्राहक आणि पर्यावरणशास्त्र महाविद्यालयातील प्राणी शास्त्रज्ञांच्या गटाने टांझानियातील शेतकऱ्यांसाठी स्थानिक गाईंच्या जातीच्या तुलनेमध्ये २० पट अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाईंच्या विकासाला चालना दिली आहे. त्यांच्या या संशोधन आणि विकास प्रकल्पाची माहिती ‘ॲनिमल फ्रंटियर्स’मध्ये देण्यात आली आहे.
दूध उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध अशा होलस्टिन आणि जर्सी यांच्या संकरातून अनेक जातींचा विकास करण्यात आला आहे. मात्र या अधिक दूध देणाऱ्या जाती उष्णता आणि दुष्काळासाठी तितक्या सहनशील नाहीत. त्याचा फटका उष्ण कटिबंधीय देशामधील पशुपालकांना नेहमी बसतो.
अशा स्थितीमध्ये टांझानिया येथील उष्णता, दुष्काळ आणि रोग प्रतिकारक अशा स्थानिक गायर (Gyr) जातीशी संकर करण्यात आला. पाच पिढ्यांपर्यंत संकर केल्यानंतर सामान्य व्यवस्थापनामध्ये हीच गाय प्रति दिन १० लिटर इतके देण्याची क्षमता तयार झाली. पूर्वी ही गाय केवळ अर्धा लिटर दूध प्रति दिन देत असे.
अमेरिकेमध्ये संकर केल्यानंतर जन्मलेल्या पहिल्या कालवडीचे गर्भ घेऊन टांझानियामध्ये आणण्याची तयारी पूर्ण झाल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख आणि प्रो. मॅट व्हिलर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की होलस्टिन आणि गायर या संकरातून तयार झालेली उच्च उत्पादक गिरोलॅण्डोज ही जात ब्राझीलमध्ये सामान्य आहे.
मात्र तिथे मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य रोगांमुळे या गाईंची निर्यात अन्य देशांमध्ये करता येत नाही. त्यामुळे या जातीच्या आरोग्यपूर्ण गाईंची पैदास अमेरिकेमध्येच करून अन्य देशांमध्ये निर्यात करण्याचा आमचा मानस आहे.
व्हिलर यांच्या गटाने अर्ध्या होलस्टिन - गायर आणि जर्सी -गायर यांचे १०० गर्भ टांझानियातील दोन ठिकाणी मार्च महिन्यात स्थानिक गाईमध्ये भरण्यात आले. त्यांच्या कालवडीपासून पुढील पिढ्या घेत ५/८ होलस्टिन किंवा जर्सी आणि ३/८ स्थानिक गायर जातींची जनुके पुढे नेण्यात आली. ही जात गिरोलॅण्डो प्रमाणेच जर्सी आणि गायर यांचे शुद्ध पैदास होती. मात्र अद्याप या पैदाशीला काही अधिकृत असे नाव दिलेले नाही.
शुद्ध वंशावळीला खूप महत्त्व असते. त्यामुळे ५/८ होलस्टिन किंवा जर्सी आणि ३/८ स्थानिक गायर जातींची जनुके इथपर्यंत शुद्ध संकराची मात्रा मिळाल्यानंतर ते लॉक करण्यात आले. म्हणजेच या पुढे या जातीची पुढील सजातीय पैदाशीच्या वंशावळीमध्येही हेच जनुकीय गुणोत्तर येत राहील.
यामुळे या गायीमधील रोग आणि वातावरणाविषयीची सहनशीलता आणि दूध उत्पादनाचे गुणधर्म जसेच्या तसे पुढे जातील. अर्थात, विकसनशील देशामध्ये त्याची शुद्धता जपणे हे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही.
व्हिलर यांच्या गटामध्ये कार्यरत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने मोझेस ओले नेसेल्ले याविषयी काळजी व्यक्त करतात. त्यामुळे या पैदास आणि शुद्धतेच्या जपणुकीसाठी टांझानियातील लोकांसाठी पहिला ऑनलाइन कोर्स तयार करण्यात आला आहे.
गेल्या उन्हाळ्यामध्ये टांझानियातील १२ पदवीधरांनी लोकांनी तो पूर्ण केला आहे. याचा प्रसार करण्यासाठी टांझानियन सरकार या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे त्याचा विस्तार लोकांपर्यंत होण्यास मदत होईल, यात शंका नाही.
स्थानिक पशुपालकांकडून स्वीकार
इल्लिनॉइज विद्यापीठातील आफ्रिकन अभ्यास केंद्राचे संचालिका तेरेसा बार्नेस यांच्या सूचनेनुसार पुढील टप्प्यामध्ये स्थानिक मसाई पशुपालकांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्याविषयी व्हिलर म्हणाले, की आमच्या लक्षात एक बाब आली, ती म्हणजे काही मसाई जाती या मुख्यतः लहान लाल गायींना प्राधान्य देतात.
त्यामुळे प्रथम मोठ्या आणि काळ्या होलस्टिन जातींच्या गाईंची त्यांच्यामध्ये स्वीकार्हायता अत्यंत कमी होती. मात्र आता आपणही जर्शीच्या संकराकडे वळलो आहोत. त्याचा फायदा होईल, असे वाटते.
सुधारित गोवंशापासून पूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्यासाठी टांझानियन गो व्यवस्थापनातील काही बाबींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. उदा. भटके मसाई पशुपालक प्रति दिन सुमारे २५ मैलाच्या परिसरात चराई करतात. त्यामुळे गाईंची ऊर्जा फिरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो.
सर्वांसाठीच फायद्याचा प्रकल्प
अर्थात, हा प्रकल्प अजून प्राथमिक अवस्थेत असला तरी भविष्यातील वातावरण सहनशील पशुपालनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या टांझानियातील पशुपालकांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प राबवला जात आहे. ही जनावरे मेक्सिको, टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देतील.
मात्र भविष्यात वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये अमेरिका आणि तुलनेने शीत प्रदेशातील तापमानही वाढत जाणार आहे. अशा स्थितीमध्ये येथील पाळीव पशुपक्ष्यांमध्ये उष्ण कटिबंधीय स्थानिक पशुपक्ष्यांची जनुके आणून, ती स्थिर करण्यात यश आल्यास सर्वांनाच उष्णता, दुष्काळ आणि रोगांचा सामना करता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.