Pune News : वाढत्या उष्णतेने लाहीलाही होत असताना जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. अनेक तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. याशिवाय पंधरा धरणे कोरडी पडल्याने नागरिकांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून टॅंकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून एप्रिल महिन्याच्या मध्यावर जवळपास निम्मी धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणांत अवघा १४ टक्के म्हणजेच २७.८३ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामुळे चालू महिना आणि जून महिन्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे. धरणातील पाण्याची मागणी आणखी वाढणार असून मागील महिन्यापासून पाण्यासाठी नागरिकांची वणवण वाढली आहे. .
जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांसाठी होतो. गेल्या महिन्यापासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे त्यातील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे.
गेल्या वर्षी याच काळात या धरणांत एकूण ४६.५८ टीएमसी म्हणजेच २३ टक्के एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाणीसाठ्यात जवळपास आठ टक्केने घट झाली आहे. टेमघर, कासारसाई, वडिवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडली आहेत.
नाझरे धरणातील मृत साठाही संपला आहे. सध्या खडकवासला, चासकमान, वीर, डिंभे या धरणांतून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याची नागरिक मागणी करू लागले आहेत.
एक टीएमसीपेक्षा कमी पाणी असलेली धरणे :
टेमघर, कासारसाई, कळमोडी, वडिवळे, शेटफळ, गुंजवणी, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.