Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२१-२२ मध्ये सुरू झाली. २०२२-२३ मध्ये देशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर होता. २०२३-२४ मध्ये द्वितीय क्रमांकावर होता. राज्यामध्ये मात्र दोन्ही वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून यंदाही आजवरच्या कार्य अहवालात देशात जिल्ह्याची आघाडी कायम आहे.
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थींना अन्न प्रक्रिया उद्योग करणाऱ्या बँक कर्ज मंजूर झाल्यानंतर एकूण खर्चाच्या ३५ टक्के अनुदान कमाल १० लाख मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थींना योजना अंमलबजावणीत साहाय्य करण्यासाठी जिल्ह्यात ३० जिल्हा संसाधन व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. जिल्हा संसाधन व्यक्तीच्या मदतीने प्रस्ताव पोर्टलवर प्राप्त होताच तत्काळ निर्णय घेऊन योग्य प्रस्तावास तांत्रिक मंजुरी देऊन प्रकरणे कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठविण्यात येतात.
बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योग कार्यान्वित झाल्यानंतर राज्यस्तराहून अनुदान वितरित करण्यात येते. तीन वर्षांनंतर हे अनुदान खाती जमा होते. त्यामुळे लाभार्थींचे प्रकल्प सातत्य व यश चांगले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास २७ प्रकारच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १८४० प्रकल्प प्रस्ताव सादर झाले. त्यामध्ये भाजीपाला निर्जनीकरणाचे ५०१, टोमॅटो मिर्जलीकरणाचे ४५७, कांदा निर्जनीकरणाचे ५९३, मका आधारित उत्पादनासाठीची ७२ मसाले, शेवया, पापड, वेफर्स निर्मितीचे ३३, दूध आधारित पदार्थांचे २९, तेलबिया आधारित पदार्थांचे १२, गहू आधारित पदार्थांचे १९, डाळवर्गीय पदार्थांचे ११, मसाले पदार्थांचे ३१ प्रकल्प प्रस्ताव सादर झाले.
सर्व १८४० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, सुमारे ४५ कोटी २३ लाख रुपयांचे हे प्रस्ताव आहेत. पस्तीस टक्के प्रमाणे या प्रकल्पांवर सुमारे १२ कोटी २९ लाख रुपये अनुदान रक्कम होते.
तालुकानिहाय लाभार्थी निवडीचा लक्षांक...
जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड या तालुक्यांना यंदाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रत्येकी ७५ लाभार्थीं तर फुलंब्रीसाठी ५३, सोयगाव, खुलताबादसाठी प्रत्येकी ५० वैयक्तिक लाभार्थी निवडीचा लक्ष्यांक देण्यात आला. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १३५ पैठणमध्ये ६, फुलंब्रीमध्ये १२, वैजापूरमध्ये ९, गंगापूरमध्ये १३, खुलताबादमध्ये २५, सिल्लोडमधून ४, कन्नडमधून दोन लाभार्थी निवडण्यात आले आहेत.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर, वैजापूरमधून प्रत्येकी एक गट लाभार्थी निवडीचा, सामाईक पायाभूत सुविधांमध्ये छत्रपती संभाजीनगर व वैजापूरमधून प्रत्येकी दोन, तर इतर तालुक्यांतील प्रत्येकी एक मिळून ११ लाभार्थी निवडीचा तर मार्केटिंग व ब्रॅण्डिंग विभाग स्तरावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून एक लाभार्थी निवडीचा लक्षांक देण्यात आला आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग विषयाची जबाबदारी सांभाळणारी क्षेत्र अधिकारी रामचंद्र फरसे यांनी दिली. यासाठी कृषी उपसंचालक दीपक गवळी यांचेही सहकार्य लाभत असल्याचे श्री. फरसे म्हणाले.
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठीच्या योजनेत जिल्हा तीन वर्षात देशात आघाडी ठेवून आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक उद्योजक पुढे येत आहेत. संसाधन व्यक्ती प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून कर्ज प्रकरण मंजुरीपर्यंतच्या अनेक बाबी हाताळण्यातही मदत करतात. त्यामुळे योजना अनेकांसाठी आशादायी ठरते आहे.
- प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
तीन वर्षांतील वैयक्तिक उद्योगातील लक्षांक व साध्य
वर्ष लक्ष्यांक साध्य
२०२१-२२ २२२ १०७
२०२२-२३ २२२ ७६१
२०२३-२४ ६२५ ७६६
२०२४-२५
(आतापर्यंत) ६०३ २०६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.