Chandwad APMC
Chandwad APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Marigold Market : चांदवड : झेंडू पट्ट्यासह खरेदी-विक्रीचे केंद्र

मुकुंद पिंगळे

खरीप, ‘लेट’ व उन्हाळी अशा तिन्ही हंगामातील कांदा उत्पादनात (Onion Season Production) चांदवड तालुका (जि. नाशिक) आघाडीवर आहे. द्राक्ष, भाजीपाला उत्पादनातही सातत्य आहे. पंधरा वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांनी झेंडूच्या रूपाने फुलशेतीची कास धरली. पश्‍चिम भागात भरवीर, मंगरूळ परिसरात या लागवडी १०-२० हेक्टरच्या आसपास होत्या. श्रावण, गणेशोत्सव, दसरा, दिवाळीआदी सणांची बाजारपेठ ओळखून त्या विस्तारल्या. कमी कालावधीत आश्‍वासक उत्पन्न देऊ शकणारे झेंडूचे पीक (Marigold crop) कांद्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हक्काचे झाले. आजमितीला तालुक्यातील ३० हून अधिक गावे झेंडूचे शिवार झाली आहेत.

चांदवड भागातील झेंडू

कृषी विभागाच्या माहितीनुसार या पिकाखाली तालुक्यातील क्षेत्र सुमारे ४२२.६० हेक्टर आहे. रोपवाटिका व्यवसाय, झेंडू खरेदी-विक्री, वाहतूक याद्वारे रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. कृषी विभागाचेही मार्गदर्शन होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे सांगतात. बाजारपेठांची गरज ओळखून फुलांचा पिवळा व केशरी रंग, आकार, आकर्षकपणा, टिकवणक्षमता आदी गुणधर्म पाहून वाणांना प्राधान्य देण्यात येते. पिवळ्या रंगात मोठ्या तर केशरी रंगात मध्यम आकाराला प्राधान्यक्रम असतो. टप्प्याटप्प्याने येणाऱ्या सणांनुसार जूनपासूनच लागवडीच्या तारखा निश्‍चित होतात. घरगुती रोपनिर्मितीवर भर असतो. कोलकाता, पितांबर, अष्टगंधा आदी नावाने प्रचलित वाणांना पसंती असते. एकरी साडेतीन पासून ते साडेचार टनांपर्यंत व काही प्रसंगी पाच टनांपर्यंत उत्पादन हाती येते. एकरी उत्पादन खर्च सुमारे ४० ते ४५ हजार रुपये येतो. चालू वर्षी पाऊस व वातावरणीय बदलामुळे उत्पादनावर परिणाम होऊन दसऱ्याला आवक कमी राहिली. पावसाने खंड दिल्यानंतर लागवडी फुलांनी बहरून गेल्या. मात्र अलीकडे सततच्या पावसात मोठे नुकसान होऊन आवक मंदावली. त्यामुळे दरांत तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

चांदवड - झेंडूचे खरेदी- विक्री केंद्र

चांदवड भागातील शेतकऱ्यांना झेंडूसाठी जवळपासची हक्काची बाजारपेठ नव्हती. मुंबई, दादर, गुजरात अशा बाजारांत त्यांना जावे लागे. काही वेळा लूटमार, चोरी, गुंडगिरी आदी प्रसंगांनाही सामोरे जावे लागले. शिवाय या बाजारपेठांमध्ये मालविक्री व वेळेवर पैसे मिळण्याची शाश्‍वती नसायची.

या सर्व समस्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्षात घेतल्या. समितीचे तत्कालीन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे व संचालक मंडळाने ११ ऑक्टोबर २०१५ पासून जिल्ह्यातील झेंडू फुलांचे पहिले लिलाव सुरू केले. शेतकऱ्यांचा उत्साह व लागवडीतही वृद्धी झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षे

मागणीला फटका बसला. मात्र चालू वर्षी पुन्हा स्थिती उत्साहवर्धक आहे. प्रतवारी, पॅकिंग सुविधा व पॅकहाउस यासाठी शासकीय अनुदान उपलब्ध करून देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

झेंडूविक्री पद्धती (ठळक बाबी)

-नवरात्री उत्सवात शेवटचे तीन दिवस व दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या आधी तीन दिवस लिलाव. त्यासाठी भव्य कक्षाची व्यवस्था.

-नवरात्र, दिवाळी काळात ४० ते ५० च्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित

-खुल्या पद्धतीद्वारे लिलाव झाल्याने बाजारभाव मिळण्यासाठी स्पर्धा

अलीकडील वर्षांतील दर रु. (प्रति क्विंटल)

वर्ष...किमान...कमाल...सरासरी

२०२०-२१...२,०००...११,८००...६,४४२

२०२१-२२...९००...६,५००...२,६७१

२०२२-२३...१,२००...८,१५०...५,३८६

शेतकरी प्रातिनिधिक अनुभव :

देवगाव (ता. चांदवड) येथील सोमनाथ जाधव १२ वर्षांपासून झेंडू लागवड करतात.

दहा गुंठ्यांपासून त्यांनी सुरुवात केली. आज चार एकर क्षेत्र आहे. गणपती, दसरा, दिवाळी असे विक्रीचे नियोजन असते. मे महिन्यात घरगुती स्तरावर रोपे तयार केली जातात. दरवर्षी एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. यंदा अतिवृष्टी व खराब हवामानामुळे आवक कमी होऊन दर चांगले राहतील

असे त्यांना वाटते. सरासरी ५० रुपये प्रति किलो दर मिळाल्यास उत्पन्नवाढीसाठी मदत होते. काटेकोर व्यवस्थापन व नियोजन महत्त्वाचे असते. त्यानुसार पुढील हंगामासाठी भांडवल उपलब्ध होत असते.

सोमनाथ जाधव, ९८२२२३६८२१

गेल्या काही वर्षांत लागवडी व त्याचबरोबर उत्पादनही मर्यादित होते. त्या वेळी कल्याण, दादर, सुरत येथे शेतकऱ्यांना विक्रीसाठी जावे लागे. शेतकऱ्यांना फसवणुकीचे अनुभव यायचे. दरही समाधानकारक मिळण्याची शाश्‍वती नसायची. नाशिक विभागीय पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांच्या मार्गदर्शनातून चांदवड येथे झेंडू लिलाव सुरू झाले. शिवार खरेदीपेक्षा लिलावात स्पर्धा होऊन अधिक दर त्यामुळे मिळू लागला आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

-डॉ. आत्माराम कुंभार्डे,

माजी सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड

९४२२२५७०१०

पूर्वी शिवार खरेदी होती. मात्र खरेदी- विक्री केंद्र सुरू झाल्याने गुणवत्तेचा माल उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. प्रतवारीनुसार दर मिळतो. त्यामुळे आमचेही नुकसान, श्रम कमी होतात. बाजारपेठ प्रमुख मार्गावर असल्याने खरेदीदारांची येथे पसंती अधिक असते.

-सुनील जगताप, फूल व्यापारी व अडतदार, चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT