Processing Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Processing : फळ प्रक्रिया उद्योगातील आव्हाने आणि संधी

Processing Industry : कोकणपट्टीतील प्रक्रिया उद्योगांमध्ये वर्षातून फक्त ६० ते ९० दिवस फळांवर प्रक्रिया होते. या लघुउद्योगांना वर्षभर प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रगत तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, सरकारी धोरण आणि मदतीची गरज आहे.

Team Agrowon

Food Processing Industry : कोकणात काजू, आंबा, फणसाच्या सोबत जांभूळ, करवंद, कोकमासारखी पौष्टिक फळे आहेत. परंतु या फळांची टिकवण क्षमता कमी असल्याने नासाडी मोठ्या प्रमाणात होते. या फळांवर अनेक फळ प्रक्रिया उद्योग हंगामी स्वरूपात कार्यरत आहेत. हा व्यवसाय वर्षभर सुरू राहाण्यासाठी त्यांच्या मागण्या, अडचणी आणि आव्हानांचा शोध घेण्याची गरज आहे.

प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर नवीन अर्थव्यवस्था तयार होण्यास मदत होईल. यासाठी कोकणपट्ट्यातील लहान उष्णकटिबंधीय फळ/अन्न प्रक्रिया उद्योगांच्या संभाव्य आव्हानांच्या मूल्यमापनासाठी उद्योजकता संशोधन विकास केंद्राच्या निधी अंतर्गत अभ्यास प्रकल्प राबविण्यात आला. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था ही भारतातील उत्कर्ष उद्योजक वातावरणाला चालना देणारे संशोधन केंद्र आहे.

प्रकल्पाचे उद्दिष्ट

  • फळ प्रक्रिया उद्योगाची सद्यःस्थिती समजून घेणे. उद्योगाचा आकार, उलाढाल, कच्च्या मालाची उपलब्धता, खर्च-लाभ गुणोत्तर, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, कायदेशीर अनुपालन.

  • वाढ आणि शाश्वतता साध्य करण्यासाठी प्रमुख आव्हानांची ओळख.

  • फळ प्रक्रिया उद्योगाबाबत समस्या सोडवणे. सरकारकडे आवश्यक धोरण सुधारणा सुचविणे.

उद्योगाबद्दल पार्श्वभूमी

एकूण नोकऱ्यांमध्ये भारतीय कृषी क्षेत्राचे योगदान ४२ टक्के आहे, सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये १६ टक्के वाटा आहे, भौगोलिक क्षेत्राचा ६० टक्के भाग व्यापला आहे. अन्न प्रक्रिया उद्योग फळे ,भाज्या, मांस, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, सागरी उत्पादने, धान्य आणि ग्राहक अन्न यासह अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. महाराष्ट्राच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राने १३,००० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली आहे.

महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे फळ उत्पादक राज्य आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादक आणि प्रक्रिया उद्योग आहेत. फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, परंतु मोठ्या संख्येने उद्योग हे कुटीर, घरगुती आणि लघु-स्तरीय क्षेत्रात आहेत, ज्यांची वार्षिक क्षमता २५० टनांपर्यंत आहे. या लघुउद्योगात स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मिती आणि उपजीविका पूर्ण करण्याची क्षमता आहे.

महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर) आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद, जांभूळ इत्यादी उष्णकटिबंधीय फळांचे सर्वाधिक उत्पादन होते. या फळांवर प्रक्रिया उद्योग पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. ते लहान स्वरूपाचे आहेत. यामध्ये वर्षातून फक्त ६० ते ९० दिवस प्रक्रिया होते. या लघुउद्योगांना वर्षभर प्रभावीपणे चालविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रगत तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, सरकारी धोरण आणि मदत करून वर्षभर चालविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

कोकणातील जमीन, दमट हवामान फळांच्या वाढीसाठी चांगले आहे. त्यामुळे आंबा, नारळ, काजू, सुपारी लागवड मोठ्या प्रमाणात आहे. फणस, कोकम, जांभूळ, आवळा आणि करवंद यांसारख्या कमी वापरात असलेल्या आणि ऊर्जा कार्यक्षम फळांनी हा प्रदेश समृद्ध आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अभ्यास दौऱ्यामध्ये असे दिसून आले की, नोंदणीकृत सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या तुलनेत सिंधुदुर्गमध्ये कृषी उद्योग / प्रक्रिया उद्योगांची टक्केवारी २ टक्के आहे. रत्नागिरीमध्ये ती १ टक्यांच्या खाली आहे. कृषी प्रक्रियेवर आधारित अनेक कुटीर उद्योग नोंदणीकृत नाहीत आणि अल्प भांडवली गुंतवणुकीवर चालतात. लघुउद्योजकांसोबत खुल्या गट चर्चेत विविध मुद्दे मांडण्यात आले. जसे, की कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतूक सुविधा, शीतगृह, व्यवसायासाठी जमीन वाटप करताना येणाऱ्या अडचणी. या चर्चेनुसार आणि दुय्यम संकलित माहितीच्या आधारे रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांतील १०० लहान प्रमाणात कार्यरत असणाऱ्या अन्न प्रक्रिया उद्योगांची यादी केली. संभाव्य संधी आणि आव्हाने समजून घेण्यासाठी तपशीलवार प्रश्नावली तयार केली. या माहितीचे विश्लेषणकरून फळ प्रक्रिया उद्योगाच्या कार्यक्षमतेची एकूण परिस्थिती समजून घेतली.

सूक्ष्म उद्योगातील आव्हाने

एफएसआय नोंदणीचा अभाव, मानकीकरणाच्या अडचणी आहेत. आंबा, कोकम, फणस, करवंद, काजू, जांभूळ इत्यादी विविध फळे आणि त्यांची मूल्यवर्धित उत्पादने ही मोठ्या प्रमाणात पोषण देणारी असून कोकण प्रदेशाच्या औद्योगिक विकासात मोठी भूमिका बजावत आहेत.

प्रक्रियेच्या स्वरूपानुसार अन्न प्रक्रिया उद्योग प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय प्रक्रिया या तीन श्रेणींमध्ये विभागला जातो. उष्णकटिबंधीय फळ प्रक्रिया उद्योग प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रिया वर्गात मोडतो. या उद्योगांसमोर काढणी, प्रक्रिया आणि वितरणापर्यंत अनेक आव्हाने आहेत. कोकणची भौगोलिक रचना, असमान शेतजमीन, घनदाट जंगले आणि समुद्र किनारा यांचा परिणाम वाहतूक सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर होतो. शेती मुख्यतः नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाते. ज्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

प्रक्रिया उद्योगातील आव्हाने

वित्त सुलभता ः वित्तीय संस्थांबद्दल जागरूकतेचा अभाव. प्रक्रिया त्रासदायक आहे. तुलनेने जास्त व्याजदर.

कायदेशीर पालन/सरकारी योजना ः जागरूकतेचा अभाव. एक खिडकी योजनेची उपलब्धता नाही. मनुष्यबळाची कमतरता.

एनएबीएल मान्यताप्राप्त एफएसएसएआय मान्यताप्राप्त प्रयोगशाळा उपलब्ध नसल्यामुळे खूप खर्च करून अन्न पदार्थ तपासणीसाठी मुंबई, पुणे आणि इतर राज्यात पाठवावे लागतात.

कच्चा माल,अन्न प्रक्रिया कचरा व्यवस्थापन ः कच्च्या मालाच्या खात्रीशीर पुरवठ्याचा अभाव. बहुतेक अन्न प्रक्रियेनंतरचे घटक प्रक्रियेअभावी पुनर्वापर करता येत नाही.

ऊर्जा ः लोडशेडिंग समस्या असल्याने प्रक्रियेसाठी आधुनिक यंत्रांचा वापर शक्य होत नाही. लहान फळांच्या प्रक्रियेसाठी गॅस सिलिंडर महाग आहेत. लाकूडफाटा दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.

कामगार समस्या ः हंगामी उद्योगामुळे कामगारांना वर्षभर काम मिळत नाही. स्थिर उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळविण्यासाठी स्थानिक लोकसंख्येचे मोठ्या शहरांकडे स्थलांतर होते. इतर उद्योगांच्या तुलनेत रोजंदारी कमी आहे. त्यामुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची कमतरता आहे.

शीतगृह ः प्रारंभिक गुंतवणूक खूप जास्त आहे. लहान आकाराच्या शीतगृहाची आवश्यक आहे. वीज बचतीसाठी सौरऊर्जेवर चालणारे शीतगृह आवश्यक आहेत.

वाहतूक व्यवस्था ः रेफ्रिजरेटेड व्हॅन, खास डिझाइन केलेल्या रेल्वे वॅगन्सची आवश्यकता आहे. रस्त्याने कार्यक्षम वाहतुकीची उपलब्धता नसल्याने जास्त खर्च आहे. घरोघरी वाहतूक उपलब्ध नाही आणि कुरिअर शुल्क परवडणारे नाही.

विक्री आणि निर्यात सुविधा ः अंतिम उत्पादनासाठी कार्यक्षम बाजारपेठेचा अभाव आहे. मोठे उद्योजक आणि संघटित क्षेत्रातील स्पर्धा, विविध प्रकारचे कर / विक्रीकराचा उच्च दर. विपणन सहकारी संस्थांचा अभाव. निर्यातीच्या गुणवत्तेच्या निकषांबद्दल जागरूकतेचा अभाव तसेच निर्यात गुणवत्तेच्या मालाचा लाभ घेण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो.

कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपाययोजना

फळ उत्पादनाची वाढ, प्रक्रिया आणि विपणनाशी संबंधित विशिष्ट प्रशिक्षणाची गरज. आर्थिक क्रियाकलाप सुलभतेसाठी आणि कायदेशीर अनुपालन जागरूकता कार्यक्रम आणि संसाधन व्यक्तींची उपलब्धता आवश्यक.

प्रशिक्षणाची गरज

  • फळ प्रक्रियेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशिक्षण. उत्पादनानुसार पॅकेजिंग तंत्रज्ञान प्रशिक्षण.

  • लहान क्षमतेची यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण.

  • वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती, उद्योगाचा अंदाज घेण्यासाठी इनक्युबेशन सेंटर आवश्यक.

  • निर्यात संबंधित प्रशिक्षण.प्रदर्शने, ग्राहकांना थेट विक्री, ऑनलाइन विक्री व्यवस्थेबाबत जागरूकता.

  • तयार उत्पादनाची विक्री किंमत ठरवण्याचे प्रशिक्षण.फळातील आरोग्यदायी घटकांचे मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण.

  • व्यवसाय नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण.

धोरणात्मक शिफारशी

  • उत्पादन प्रक्षेत्रांमध्ये पायाभूत प्रक्रिया सुविधांची स्थापना आणि शीत साखळी उपलब्धतेची गरज.

  • कोकणपट्टीत एनएबीएल, अपेडा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेची उभारणी.

  • देशांतर्गत, निर्यात स्तरावर विक्री करण्यासाठी बाजारपेठेतील पायाभूत सुविधांची आवश्यकता.

  • नवीन प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यापूर्वी उत्पादन विकास आणि यंत्रसामग्रीच्या चाचण्या पूर्ण करण्यासाठी प्रयोगशाळेसह माहिती केंद्राची सुविधा.

  • फळांच्या मूल्यवर्धित उत्पादनांवर जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कमी करण्याची आवश्यकता.

  • कमी प्रक्रिया केलेल्या आणि उच्च प्रक्रिया केलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये जीएसटी टक्यांमध्ये फरक आहे. उच्च जीएसटीमुळे निव्वळ नफ्यातील टक्केवारी कमी होत आहे.

  • वीज, पाणी जोडणी परवाना, कर्ज, योजना जागरूकता आणि दस्तऐवज अद्ययावत करणे, एफएसएसएआय परवाना आणि आर्थिक योजना माहितीसाठी, माहिती प्रसारित करण्यासाठी ॲप किंवा एक खिडकी योजनेची आवश्यकता.

  • प्रक्रिया उद्योग वर्षभर चालवण्यासाठी हंगामात वेगवेगळी फळे शीतगृहात साठवून आणि मग प्रक्रिया करून उद्योगांना चालना देणे शक्य. यामुळे कामगार गावात टाकून राहतील.उद्योग वर्षभर सुरू झाल्याने तरुण वर्ग पुन्हा गावाकडे परतेल.

ketakibarve04@gmail.com

(लेखिका अन्न आणि फळ प्रक्रिया तज्ज्ञ आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT