Cow Agrowon
ॲग्रो विशेष

Deoni Cow Breed : दुग्धोत्पादन, शेतीकामासाठी उपयुक्त गोवंश : देवणी

Team Agrowon

डॉ. बालाजी हजारे, डॉ. प्राजक्ता जाधव

Cow Conservation : अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांत मानांकन सिद्ध करणारा दुहेरी गोवंश म्हणजे देवणी. दुग्धोत्पादन व शेतीकामामध्ये समान उपयुक्तता आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये कोरडा निकृष्ट चारा खाऊन ऊन वारा, पाऊस आणि थंडी सहन करणारा हा गोवंश आहे.

सतराव्या शतकापासून गीर जातीच्या जनावरांचे कळप गुजरातमधून मराठवाड्यात चाऱ्याच्या शोधात येत असत. तत्कालीन पशुपालक त्या काळात गीर आणि स्थानिक जनावरांचे संकर घडवून आणत असत.

त्यातून जन्मलेली वासरे आकर्षक बाह्य गुणांची असल्यामुळे शेतकऱ्यांना याबद्दल आवड निर्माण झाली. त्यातूनच देवणी गोवंशाची निर्मिती झाली. त्या काळात या गोवंशाला सुरती, डोंगरी असेही म्हटले जायचे.

देवणी गोवंशाचा अधिवास

डांगी, गीर आणि स्थानिक देशी गोवंशाच्या संकरातून देवणी गोवंश तयार झाला.

देवणी जातीचा अधिवास बालाघाटच्या पर्वत रांगा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यापासून नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यापर्यंत आहे. या भागातील बालाघाटच्या पठारावरील मुख्य मांजरा नदी व उपनद्या यांच्या खोऱ्यामध्ये हा गोवंश आढळतो.

देवणी गोवंशाचे मूळ उगमस्थान लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका आहे. या जातीची जनावरे संपूर्ण लातूर जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, लोहा आणि कंधार तालुक्यात, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात आढळतात. तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, भालकी या भागांत आढळतात.

आकारमानाची वैशिष्ट्ये

गाय

मध्यम आकार व आपोटशीर बांधा. मूळ रंग पांढरा आणि त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके असतात.

कातडीला देखणी चमक असते. त्वचा अत्यंत मऊ असते. कातडी शरीराला घट्ट चिकटलेली असते.

कपाळाची ठेवण भरदार असते. शिंगे मागाहून बाहेरच्या बाजूस येणारी बाकदार व दंडगोलाकृती असतात. शिंगांचा रंग काळा असतो. डोळे लांबट व अंडाकृती असतात. पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात.

कान मध्यभागी पसरट, टोकाला गोलाकार व मागे पडलेले असतात. नाकपुडी काळी पसरट व मध्यभागी फुगीर असते.

वशिंड पिळदार घट्ट, परंतु शरीराच्या एका बाजूस थोडे झुकलेले असते. मानेखालची पोळी शरीराला शोभेल अशी असते. मान लांब व रुंद असते. मागचे पाय शरीराच्या मानाने

किंचित उंच असतात, मांड्या पुष्टदार

असतात. पाठ मागच्या बाजूने वशिंडाकडे किंचित उतरती असते. त्यामुळे त्यांना शोभा येते.

बैल

नजरेत जरब असते, कायम रोखून बघण्याची सवय असते.

जड शेतीकाम, आणि ओढकामासाठी मजबूत भक्कम पायांचे सांधे या गुणांमुळे बैल लोकप्रिय आहेत. बैल शेती कामासाठी काटक असतात. जास्त तापमान सहन करू शकतात.

त्वचा मध्यम जाड, हालचाल होणारी असल्यामुळे माश्‍या, डास व इतर कीटकांपासून त्यांचे संरक्षण होते.

बैल वयाच्या २४ ते ३० महिन्यांपासून कामाला जुंपतात. बैल त्याच्या वयाच्या १२ वर्षांपर्यंत चांगले कार्यक्षम असतात. शुद्ध देवणी बैलाचे सरासरी वजन ५०० किलो ग्रॅम असते.

उत्पादन क्षमता

गाईमध्ये धष्टपुष्ट विकसित मोठी कास, काळ्या रंगाचे सारख्या अंतरावर चार सड असतात.

सरासरी पहिल्या माजाचे वय ३० ते ३५ महिने आहे. पहिल्या विण्याचे सरासरी वय ४० ते ४६ महिने असते.

शुद्ध गाय एका वेतात सरासरी ६०० ते ८०० लिटर दूध देते. म्हणजेच एका दिवसाला

दोन ते तीन लिटर दूध उत्पादन मिळते. दुधामध्ये फॅटचे प्रमाण सरासरी ४.५ टक्के

असते.

आयुष्यात सरासरी आठ ते दहा वासरे देते. गायीचे सरासरी वजन ४२० किलो आहे.

दूध,दही, ताक, तूप व इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी आहे.

शारीरिक गुणधर्म

देवणी जात गुजरातमधील गीर, खानदेशातील डांगी आणि स्थानिक देशी गोवंशाच्या संकरातून विकसित झालेली आहे. म्हणून या गोवंशाचे शरीर गीर सारखे, रंग डांगी जातीशी मिळता जुळता दिसतो. देवणी गोवंशामध्ये तीन प्रकारच्या उपजाती आहेत. हे तीन रंगांच्या फरकांमध्ये आढळते. शरीर मध्यम, विकसित डोके रुंद आणि किंचित बहिर्वक्र आहे. वानेरा आणि शेवरामध्ये डोक्याचा रंग काळा आणि पांढरा आणि बाळंक्या जातीमध्ये पूर्णपणे पांढरा असतो.

वानेरा

चेहऱ्याचा काही भाग काळ्या रंगाचा आणि संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाचे असते. यांची संख्या एकूण देवणीच्या संख्येमध्ये ४४ टक्के आहे.

बाळंक्या

शरीराच्या खालच्या बाजूला काळे डाग असलेला, स्वच्छ पांढरा शुभ्र रंग असतो. यांची संख्या एकूण संख्येच्या १० टक्के आहे.

शेवरा

अनियमित काळे डाग असलेले पांढरे शरीर, काळ्या-पांढरा (काळा बांडा) रंगाचा हा गोवंश आहे. यांची संख्या एकूण संख्येच्या ४६ टक्के आहे.

डॉ. बालाजी हजारे, ७०३८४६३०६६, (पशू अनुवंश व पशू प्रजनन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT