डॉ. सतीश निचळ, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. वर्षा टापरे, मंगेश दांडगे
सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक (Soybean Crop) झाले असून, दरवर्षी सुमारे ४२ ते ४४ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असते. लागवडीसाठी (Soybean Sowing) तितक्याच प्रमाणात बियाण्याची (Soybean Seed) गरज भासते. सध्या सोयाबीन पीक कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. विविध भागांत सातत्याने, (Soybean Harvesting) तर काही ठिकाणी अधून-मधून सुरू असलेल्या पावसामुळे कापणी व मळणीमध्ये अडचणी येत आहेत. यामुळे बियाण्यांची प्रत खालावण्याची शक्यता आहे.
सोयाबीन बियाण्याचे आवरण हे अत्यंत पातळ व नाजूक असते. त्यामुळे अन्य पिकाच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर खराब होऊ शकते. त्याचा उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. हवामानाचा अंदाज घेऊन सोयाबीनची कापणी व मळणी करावी. कापणी, मळणी, प्रक्रिया व साठवणुकीदरम्यान पुढील प्रकारे काळजी घेतल्यास बियाण्याची उगवणशक्ती चांगली ठेवता येईल.
कापणी करताना...
-कापणीवेळी पाऊस आल्यावर बियाण्यावर वाढणाऱ्या बुरशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळण्यासाठी पीक कापणीच्या अगोदर उभ्या पिकात कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी करावी. उभ्या पिकात बुरशीनाशकाची फवारणी शक्य नसल्यास गंजीवर (गंजी फोडून) फवारणी करावी.
-सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागल्यावर व शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट झाल्यानंतर पीक कापणी करावी. वाणाच्या परिपक्वता कालावधीनुसार (कमी/अधिक ३ दिवस), साधारणत: ८० ते ८५ टक्के शेंगा वाळल्यानंतर पिकाची कापणी करावी.
-कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ ते १७ टक्के असावे.
-पावसाचे वातावरण असल्यास किंवा वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास सोयाबीनची कापणी टाळावी.
-कापणी झाली असल्यास गंजी ताडपत्रीने व्यवस्थितपणे झाकावी. तसेच दुपारच्या वेळी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास ताडपत्री काढून गंजी फोडून सुकू द्यावी. त्यामुळे शेंगेतील दाणे कुजणार नाहीत.
-वाण व प्लॉटनिहाय वेगवेगळी कापणी व मळणी करावी.
-ओल्या झाडांची गंजी लावू नये. गंजीमध्ये ओले किंवा हिरवे झाडे ठेवू नये.
मळणी करताना...
-कापलेले पीक मळणी खळ्यावर आणून सुकू द्यावे. त्यामुळे दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १३ टक्क्यांपर्यंत येईल.
-मळणी करण्याची जागा व मळणी यंत्र स्वच्छ करून घ्यावे.
-विशेषतः मळणीवेळी अन्य कोणत्याही वाणाची भेसळ होणार नाही, याची काळजी घ्यावी.
-सोयाबीनची मळणी करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १३ टक्के असावे. मळणी यंत्राच्या ड्रमची गती ३५० ते ४०० फेरे प्रति मिनीट (आर. पी. एम.) या दरम्यान ठेवावी. त्यामुळे बियाण्याला इजा पोहोचणार नाही. उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होत नाही. मळणी यंत्राचे फेरे मोजण्यासाठी पॉकेट टॅकोमीटर बाजारात उपलब्ध आहे, त्याचा वापर करावा.
-मळणी करताना मळणी यंत्रामध्ये सोयाबीन लावण्याचा वेग एकसारखा असावा, त्यामुळे बियाण्याला मार लागणार नाही.
-जर मळणी करताना बियाण्याची फूट होत असेल, तर थ्रेशिंग ड्रममधील काही स्टड/नट कमी करावेत.
-तयार झालेले बियाणे ओलसर असल्यास सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आल्यास वाळवणे थांबवावे. बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास बियाणे जास्त तापमानात वाळवू नये, यामुळे उगवणक्षमता झपाट्याने कमी होते. बियाण्यात जास्त ओलावा असेल तर बियाणे उन्हात न वाळवता सावलीत हवेशीर जागी वाळवावे. बियाणे उन्हात वाळवतेवेळी पक्क्या फरशीवर न वाळवता पातळ ताडपत्रीवर वाळवावे.
बियाणे प्रक्रिया करताना...
-बियाणे प्रक्रियेदरम्यान जास्त तापमानापासून बियाणे वाचविण्याकरिता व बियाण्याला कमीत कमी इजा होण्याच्या दृष्टीने दरवर्षी बियाण्याची प्रक्रिया फेबुवारी महिन्यापर्यंत आटपावी.
-बियाणे प्रक्रिया करताना ‘इनक्लाइड बेल्ट कन्व्हेअर’चा उपयोग
करण्याची शिफारस विद्यापीठाद्वारे करण्यात आली आहे.
-बियाणे प्रक्रियेनंतर बियाण्याचा प्रातिनिधीक नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत परीक्षणाकरिता पाठवावा.
साठवणुकीदरम्यान घ्यावयाची काळजी :
१. बियाणे साठवणुकीपूर्वी बियाणे चाळणीने साफ करावे.
२. बियाणे साठवणीदरम्यान बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. ओलावा तपासण्यासाठी ओलावा मापक यंत्राचा (Moisture meter) वापर करावा.
३. सोयाबीन बियाणे नाजूक असल्यामुळे हाताळणी करताना पोते तीन फुटांपेक्षा जास्त उंचीवरून टाकू किंवा आदळू नये. पोत्यांची थप्पी पाच फुटांपेक्षा जास्त उंच लावू नये.
४. बियाणे साठवताना पोते भिंतीपासून कमीत कमी तीन फूट दूर व खाली लाकडी फळ्या किंवा प्लॅस्टिक ब्लॉग्सवर ठेवावे.
५. बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यासाठी वॉटर कूलरचा वापर करू नये. वॉटर कूलरमुळे बियाण्याची आर्द्रता वाढून बियाणे खराब होऊ शकते.
६. आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीडनाशकांची फवारणी करावी.
७. सोयाबीनचे बियाणे अतिशय नाजूक असते. थोड्यासुद्धा मारामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. विशेषतः सोयाबीनचे पोते वाहतुकीदरम्यान वरून खाली फेकले जाते, तेव्हा बियाण्याला आतून इजा होते. सोयाबीनचे बियाणे ५ फुटांपेक्षा जास्त उंचीवरून किंवा जोराने खाली टाकले तर बियाण्याची उगवणक्षमता घटते.
डॉ. सतीश निचळ, ९४२३४७३५५०
(वरिष्ठ सोयाबीन पैदासकार, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती, अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.