Buffalo Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Buffalo Farming: म्हैसपालनातून समृद्धीचा मार्ग: रोजगाराची नवी दिशा!

Dairy Business: म्हैसपालन हे नवउद्योजक व तरुणांसाठी एक फायदेशीर क्षेत्र ठरत आहे. दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांपासून मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे, तसेच ब्रॉयलर म्हैसपालनाच्या वाढत्या ट्रेंडमुळे मांस उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. पशुसंवर्धनास चालना देण्यासाठी ‘ब्रीड सोसायटी’सारख्या संघटना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

डॉ. अनिल भिकाने

रोजगाराच्या संधी

सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकाराचे उद्योग हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत, जे सकल राष्ट्रीय उत्पन्नात ३० टक्क्यांहून अधिक योगदान देतात. या उद्योगांचा निर्यातीत मोठा वाटा आहे. हे उद्योग रोजगाराचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. हे उद्योग लाखो उपजीविकांना आधार देतात. कृषी क्षेत्रापाठोपाठ हे क्षेत्र रोजगार पुरविण्याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दूध व्यवसाय करू पाहणाऱ्या नवयुवकांसाठी आणि उद्योजकांसाठी म्हैसपालन हा हुकमी मार्ग आहे. महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार पशुधन क्षेत्र ४.५ टक्के वार्षिक वृद्धिदर दर्शवीत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी संलग्न क्षेत्राचा १२ टक्के हिस्सा आहे. दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग ही म्हैसपालकांसाठी विपुल संधीचे क्षेत्र आहे.

म्हशींच्या दुधाप्रमाणेच मांस उत्पादन देखील महत्त्वाचे रोजगार क्षेत्र आहे. भारतात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब ही म्हशीच्या मांस उत्पादनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. २०२३-२४ या वर्षात भारतातून ३१,०१०.१० कोटी दशलक्ष किमतीचे १,२९५,६०३.१५ टन म्हशीचे मांस निर्यात झाले.भारत हा जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा म्हशीचे मांस निर्यात करणारा देश आहे. व्हिएतनाम, मलेशिया, इजिप्त, संयुक्त अमिराती आणि इराक हे मांसाचे प्रमुख खरेदीदार देश आहेत.

कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) अंतर्गत आजमितीस भारतात ७२ नोंदणीकृत वधगृहांसह मांस प्रक्रिया संयंत्रे, १२ मांस प्रक्रिया संयंत्रे आणि ५ स्वतंत्र वधस्तंभ कार्यरत आहेत. मासांसाठी म्हैसपालन (ब्रॉयलर म्हैसपालन) ही संकल्पना पुढे येत आहे. तीन महिन्याच्या वरील नर रेडके विकत घेऊन त्यांचे चांगले पोषण करून मांसोत्पादनासाठी म्हैसपालन व्यवसाय केला जाऊ शकतो.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत घटक महाविद्यालयामार्फत विविध विभागांद्वारे व्यावसायिक म्हैसपालन, दूध व्यवसाय आणि त्यायोगे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्या जातात.

संवर्धनाला द्या गती

लोकसहभागातून पशुसंवर्धन करण्यास ‘ब्रीड सोसायटी म्हणजेच पैदासकार संघटना’ हा एक आश्‍वासक सकारात्मक पर्याय आहे. वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या पशुधनावरुन एखाद्या भूभागाची प्रसिद्धी आणि ओळख ही त्या भागातील पशुपालकांसाठी अभिमानाचा विषय बनला आणि सहकार भावनेतून संबंधित पशुधनाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न झाले.अशा पद्धतीने लोकसहभागातून झालेल्या पशुधन संवर्धक संघटनेस आज आपण ‘ब्रीड सोसायटी’ या नावाने ओळखतो.

भारतात मुऱ्हा (पंजाब), चिलिका बफेलो प्रमोटर सोसायटी (ओडिशा), बन्नी पशू उच्चारक मालधारी संघटन (गुजरात) विविध जातींच्या अशा संघटना कार्यरत आहेत. रात्रीच्या समयी चराई करणाऱ्या गुजरात मधील प्रसिद्ध बन्नी जातीची ओळख बन्नी म्हैसपालक संघटनेच्या माध्यमातून झाली आहे. पशुधनाचे गुणवैशिष्ट्ये निवड पद्धतीने पैदास झाली तरच जोपासल्या जातात. याशिवाय प्रक्षेत्रावर संवर्धन म्हणजे पशुपालकाच्या पुढाकारातून प्रयोगशाळेच्या बाहेर झालेले संवर्धनाचे प्रयत्न. संवर्धन करण्यासाठी लोकसहभागाची अत्यंत गरज असते.

‘ब्रीड सोसायटी‘मध्ये संबंधित पशुधनावर संशोधनाचा अनुभव असलेले शास्त्रज्ञ आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक यांचा समावेश असतो. त्यामुळे एखाद्या भागातील जातिवंत पशुधनास असलेले धोके आणि त्यानुसार करावयाच्या उपाययोजना याबाबत पशुपालकांना समग्र माहितीचा लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केल्यास संबंधित पशुधनास जोपासण्याची प्रक्रिया सुलभ होते.

राष्ट्रीय म्हैस संशोधन केंद्र, हिस्सार या केंद्रीय संशोधन संस्थेमार्फत देशभरातील म्हशींच्या विविध उपयुक्ततेचा अभ्यास केला जातो. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नागपूर येथे नागपुरी म्हैस प्रक्षेत्र; शिरवळ (जि. सातारा) येथे पंढरपुरी म्हैस प्रक्षेत्र; परभणी येथे मराठवाडी म्हैस प्रक्षेत्र आणि अकोला येथे पूर्णाथडी म्हैस प्रक्षेत्र कार्यरत असून स्थानिक म्हशींचे संवर्धन व संशोधन कार्य सुरू आहे.

डॉ. अनिल भिकाने ९४२०२१४४५३

(संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT