Kolhapur News : यंदा उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी गाठल्याने याचा फटका पशुधनास बसला आहे. यावर्षी तीव्र उन्हामुळे माणसांच्या अंगाची लाही लाही होत असताना जनावरांनाही या तीव्र उष्णतेचा फटका बसत आहे. दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
वृक्षतोड झाल्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे जनावरांसह माणसांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तीव्र उकाड्यामुळे जनावरांना जीव कासावीस होत आहे. काही ठिकाणी जनावरांना जीव गमवावा लागत आहे.
गायींना अनेक ठिकाणी पंख्याचे अथवा बाहेर झाडाखाली मांडव उभारून उन्हाच्या काहिलीपासून संरक्षण केले जात आहे. भुदरगड तालुक्यातील कुर, मिणचे, हेदवडेसह परिसरात जनावरांच्या दगावण्याच्या घटना वाढल्या आहेत. तीव्र उष्णतेमुळे गायी, म्हशींना धाप लागण्याचे प्रकार घडत आहेत.
दिवसभर गोठ्यात बांधून असणारी जनावरे उष्माघाताला बळी पडत आहेत. शेतकऱ्यांनी दिवसभर जनावरे झाडाखाली बांधावीत, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात तीव्र उन्हामुळे दूध उत्पादनात ३० टक्के घट होत असून पशुपालकांना आर्थिक फटका बसत आहे.
उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळ्यात जनावरांना मिळेल ते खाद्य दिले जाते. रवंथ न केल्यास अपचनासारखे आजार होतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन दूध उत्पादनात घट दिसते.
जनावरांना दिवसभरात तीन ते चारवेळा चारा द्यावा. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. डी. मेटांगळे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.