APJ Abdul Kalam Agrowon
ॲग्रो विशेष

APJ Abdul Kalam's Birth Anniversary : पुस्तकं माझे खरे सोबती

Team Agrowon

गंगा बाकले

gangabakle@gmail.com

Knowledge in Books :

कवी सफदर हाश्मी यांच्या पुस्तकाबाबतच्या काही ओळी खूपच मार्मिक, सूचक आहेत.

‘पुस्तकं सांगतात गोष्टी

युगायुगांच्या.

माणसांच्या जगाच्या,

वर्तमानाच्या-भूतकाळाच्या.

एकेका क्षणाच्या!

जिंकल्याच्या-हरल्याच्या,

प्रेमाच्या-कटुतेच्या!

तुम्ही नाही का ऐकणार

गोष्टी पुस्तकांच्या?

पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे,

पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे.

पुस्तकांची दुनिया न्यारी आहे,

ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे!’

या ओळी सांगून ते प्रश्न विचारतात की, ‘‘तुम्हांला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात?’’

मी तर पहिल्यापासूनच पुस्तकांच्या विश्वात रमणारी वाचनवेडी आहे. अशीच एक दिवस मी पुस्तक वाचत बसले असताना माझी मैत्रीण घरी आली. माझ्या पुस्तकांचा पसारा पाहून व मी पुस्तक वाचत आहे, हे पाहून तिला थोडेसे नवल वाटले. ती माझ्याकडे बघून हसली व मला म्हणाली, ‘‘आजचे युग हे ऑनलाइनचे आहे. बोलणे ऑनलाइन - संदेश ऑनलाइन - खरेदी ऑनलाइन - औषधी ऑनलाइन - इतकेच नाही तर; बारसे आणि लग्न सुद्धा ऑनलाइनच होत आहेत.

या ऑनलाइनच्या जमान्यामध्ये वर्तमानपत्र सुद्धा आपण ऑनलाइनच वाचतो आणि तू मात्र पुस्तकांचा पसारा करून बसली आहेस, तुला पुस्तक वाचताना पाहून थोडेसे मागच्याकाळात गेल्यासारखे वाटले. पुस्तकं पण ऑनलाइन वाचता येतात ना? मग हा पुस्तक खरेदी करून वाचनाचा अट्टहास कशासाठी?’’, असे हे तिचे बोलणे ऐकत मी मनातल्या मनात हसले आणि विचारही केला.

आजच्या जगात सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. पण प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचणे आणि ऑनलाइन पुस्तक वाचणे यामध्ये खूप फरक आहे. ‘आपण जेव्हा हातामध्ये पुस्तक घेऊन वाचतो, तेव्हा आपल्या सोबतीला कोणीतरी आहे, ज्याला आपण समजू शकतो’, अशी भावना आपल्या मनामध्ये तयार होते. एक खरा आधार आणि एक खरा सोबती जो आयुष्यभर आपल्याला साथ देतो, तो म्हणजे पुस्तक होय.

पुस्तकांच्या सहवासात राहणे यामध्ये निखळ प्रेम आहे. याची बरोबरी ऑनलाइनच्या वाचनाला किंवा ऑनलाइन पुस्तकात येऊ शकत नाही. भ्रमणध्वनीमुळे जग जवळ आले असेलही, पण एकमेकांची मने मात्र लांब गेलेली आहेत. वैचारिक आणि भावनिक माणसांना हा बदल आक्रसून टाकणारा आहे. माझ्यासारखे अनेकजण मात्र पुस्तकांच्या विश्वात राहून आनंदी, समाधानी आहेत.

अनेक थोर पुरुषांच्या विचारांच्या शिदोरीची राखण पुस्तकांनीच केलेली आहे. पुस्तकातील प्रत्येक अक्षर, शब्द, वाक्य आणि प्रत्येक पान आपल्याशी बोलत असते. पानापानांतून लेखक आणि वाचक यांची मैत्री घडत जाते. पुस्तक वाचनातून अनेकांचे आयुष्य बदललेले आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी थॉमस पेन यांचे ‘राइट्स ऑफ मॅन’ हे पुस्तक वाचले आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केळूसकर गुरुजींचे गौतम बुद्धाचे चरित्र वाचले आणि त्यांची वैचारिक जडणघडण पक्की झाली. क्रांतिकारक भगतसिंग फाशी देण्याच्या आदल्या दिवशी रात्री पुस्तक वाचण्यात दंग झालेले होते. ‘‘माझ्यासारखेच अनेक भगतसिंग पुस्तक वाचनातून घडणार आहेत’’, हे भगतसिंगांचे म्हणणे पंजाबच्या भूमीने सिद्ध केलेले आहे.

आपल्या शिवरायांचा इतिहास असाच जाज्वल्य आहे. आजही आणि उद्याही शिवचरित्रातील अनेक गोष्टी वाचताना आपल्या अंगावर काटा येतो. रक्त सळसळते. सांगायचा भाग असा की, पुस्तकांमध्ये रमणारी माणसं दुःखात न डगमगता जीवन सत्कारणी लावतात.

इतरांचे प्रेरणास्रोत होतात. यश आणि अपयशाच्या गोष्टी वाचत-वाचत बोध घेणारी माणसं पुस्तकांनी उभी केलेली असतात. ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक विद्यार्थी घडण्यासाठी महत्त्वाचे ठरलेले आहे. संस्कृतमध्ये पुस्तकांच्या संदर्भाने एक सुभाषित आहे. ते असे,

‘वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षणम्।

वार्धक्ये दु:खहरणं वाचनं तद् हितावहम्।।’

याचा अर्थ असा की, वाचनामुळे बालपणात ज्ञान मिळते, तरुणपणात व्यक्तिमत्त्व घडते, म्हातारपणात दुःख नाहीसे होते. असे वाचन सगळ्यांच्या हिताचे आहे. कवी इंद्रजित भालेराव यांच्या ‘गावाकडं’ या कवितासंग्रहातील सर्वच कविता विद्यार्थ्यांना आपल्या वाटतात. संग्रहातील,

‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता

माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता

कशी उन्हात तळतात माणसं

कशी मातीत मळतात माणसं

कशी खातात जीवाला खस्ता...’,

या ओळी विद्यार्थ्यांना जीवनजाणीव देतात.

जीवनात कार्यकारणभाव जागृत करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन उन्नत करणे, यासाठी पुस्तके मदतीचा हात पुढे करतात. वेध घेणे आणि मार्गक्रमण करणे, या गोष्टी तडीस नेण्यासाठी इतिहासावलोकन करून सजगपणे जगणारी पिढी आजही बघायला मिळते, ती केवळ पुस्तकांमुळेच! संस्कार आणि अपेक्षित वर्तन बदल घडविण्यासाठी मुलांचे वाचन आजही वाढविणे गरजेचे आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता मुरविण्यासाठी वाचनावर भर देण्यात येत आहे.

माझ्या शाळेतील आणि मी शिकवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाचनाची दीक्षा देऊन त्यांच्या आकलनास बळ देणारी पुस्तके मी उपलब्ध करून देते. पुस्तके वाचून स्वतःच्या शब्दांत मते नोंदवण्यास त्यांना मदत करते. वाचन आणि लेखन ही कौशल्ये विकसित होण्यासाठी हे बालवाचनकडू उपयोगाचे ठरते. वाचन संस्कृतीचा परिपोष अशा छोट्या-छोट्या उपक्रमांतून करता येतो. भले आणि बुरे काय आहे? हे लेकरांना समजते आणि लेकरं वाचनाचे वाटसरू होतात.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके विद्यार्थी आवडीने वाचतात. त्यांचे आत्मचरित्र ‘अग्निपंख’ अतिशय प्रेरणादायी आहे. कलाम यांनी बालपणात भावाला मदत करण्यासाठी आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण करताना आपला आर्थिक संघर्ष कमी करण्यासाठी वर्तमानपत्र विकण्याचे काम करून स्वकमाई केलेली आहे, हा जिद्दीचा प्रवास विद्यार्थ्यांना या पुस्तकामध्ये अनुभवता येतो. सामान्य कुटुंबातील प्रतिभावान माणूस ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून जागतिक दर्जाची असामान्य कार्ये पार पाडतो,

अशा अनेक गोष्टी या पुस्तक वाचनातून विद्यार्थ्यांच्या हाताला लागतात. त्यामुळे त्यांच्यासारखे खरे ‘अग्निवीर’ आणि ‘अग्निपथ’ या वाचनातूनच घडणार आहेत. आजच्या ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्ताने ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सलाम!

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT