APJ Kalam: 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन का साजरा केला जातो?

Reading Inspiration Day : भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्‍वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जावी याला विशेष औचित्य आहे.
APJ Kalam
APJ KalamAgrowon
Published on
Updated on

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्‍वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जावी याला विशेष औचित्य आहे. वाचन ही अशी सिद्धी आहे, की त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात.

अनुभवविश्‍व व्यापक होतं. जाणीवा समृद्ध होतात. जीवनाचं आणि भवतालाचं आकलन अधिक सखोल होतं. मनाची अव्याहत मशागत करणारा आणि जीवनानुभवाचं अनवट दर्शन घडवणारा पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही. भाषेचा अभिजात गोडवा आणि आशयगर्भ कस याची नीजखूण वाचनामुळेच खोलवर पटत जाते.

APJ Kalam
Rural Story : गोतावळा

वाचन, पुस्तकं, साहित्य, चित्रं, शिल्प, नृत्य, वादन आदी सगळा कलाव्यवहार हा संस्कृतीच्या पोटातूनच उगम पावतो आणि शेतीचा शोध लागल्यानंतरच या संस्कृतीचं बीज रोवलं गेलं. आजची औद्योगिक समाजरचना तीनेकशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्यापूर्वी दहा हजार वर्षे मानव शेतीच करत होता. त्याच्याहीआधी त्याच्या चार हजार पिढ्या शिकारी अवस्थेत होत्या. शेतीच्या शोधामुळे त्याचं जगणं आमूलाग्र बदललं.

माणसाने मारून खाण्याऐवजी पेरून खायला सुरूवात केली, हीच खरी संस्कृतीची सुरवात होय, असं सुंदर वाक्‍य "शिकार ते शेती' या पुस्तकाची ओळख करून देताना इंद्रजित भालेराव यांनी नमूद करून ठेवलं आहे. त्यामुळं संस्कृती, साहित्य, वाचन, पुस्तकं यांच्याशी शेतीचा आतड्याचा संबंध आहे, हे वेगळं सांगायला नको.

मराठीचा विचार केला तर शेती, ग्रामीण भवताल, कृषकाच्या आयुष्याची गाथा आदी विषयांना कवेत घेणारं साहित्याचं दालन समृद्ध आहे. "गाथा सप्तशती'पासून ते फ. म. शहाजिंदेंच्या "शेतकरी' या तीनशे पानी कवितेपर्यंत आणि जोतिराव फुल्यांच्या "शेतकऱ्याचा असूड'पासून ते कृष्णात खोतच्या "झडझिंबड' पर्यंत खमोठा पट आहे. भारतीय मिथ्यांचा अन्वयार्थ उलगडणाऱ्या विश्‍वनाथ खैरे यांनी "वेदांतली गाणी' या नावाने ऋचांचा केलेला अनुवाद हा ग्रामीण कवितांचा संग्रह आहे. त्यावरून मुळं किती खोलवर रुजली आहेत, याची खात्री पटावी.

APJ Kalam
Pratap Pawar : कष्टाविण फळ ना मिळते...!

"ऐसी कुणबीयाचे वाणी मढे झाकोनी करिती पेरणी' असं लिहिणारा तुकोबा आणि "शेतकऱ्यांचा असूड' उगारून शेतकऱ्यांच्या शोषणांचं गतिशास्त्र आणि कुणब्यांचं आयुष्य साहित्यातून मांडणारा जोतिबा यांचा वारसा पुढं चालविणारं सकस साहित्य प्रसवलं गेलं.

विठ्ठल रामजी शिंदे, भालचंद्र नेमाडे, र. वा. दिघे, "कुरूल' या तमीळ महाकाव्याचा अनुवाद करणारे साने गुरुजी, जात्यावरच्या ओव्यांची सृजनशील निर्मिती करणाऱ्या खेड्यांतल्या लाखो मायभगिनी यांच्यापासून ते इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, राजन गवस, प्रकाश होळकर, आनंद विंगकर, बालाजी मदन इंगळे, कल्पना दुधाळ, गणेश मरकड अशी कितीक नावे घ्यावीत! या साऱ्यांनी आपल्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे.

जग बदलत चाललंय तसा आपल्या जगण्याचा वेग आणि पैस ही विस्तारला आहे. पुस्तकांच्या कागदांप्रमाणेच टॅब, किंडल, मोबाईल यांच्या स्क्रीनवरच्या वाचनानेही स्वतंत्र "स्पेस' व्यापली आहे. पत्रकार, लेखक सुनील तांबे म्हणतात त्याप्रमाणे तपशिलातलं समाजचित्रण म्हणजे अभिजात कांदबरी, व्यक्तिमनाचं चित्रण म्हणजे कथा, या दोहोंचा मिलाफ म्हणजे नवकादंबरी, मत-मतांतरे म्हणजे कॉलम, भंकस करताना सीरिअस असणं म्हणजे ब्लॉग.

यात आता फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप यांची भर पडली आहे. "फॉरवर्डी' विनोद आणि टाइमपास मजकूर यांच्या पल्याड जाऊन अस्सल लेखन-वाचनानंदाचं मोठं "इर्जिक' घालण्याचे प्रयोगही तिथं होत आहेत.

पूर्वी शेतीतल्या ढोरकष्टांमुळे वेळेअभावी एक -दोन वाक्‍यांतून आभाळभर आशय मांडत व्यक्त होण्याची परंपरा रुजली. आज या नवमाध्यमांमध्येही अल्पाक्षरी अभिव्यक्तीलाच महत्त्व आले आहे. कलामांच्या जयंतीनिमित्ताने वाचनसंस्कृतीचा हा जागर अधिक उर्जस्वल होईल, अशी आशा करूया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com