Indian Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Mangnale : अंधभक्ती वाईटचं, ती व्यक्तीची असो की, तंत्राची!

Indian Agriculture : मी परवा लिंबोळ्यांच्या संदर्भातील एक पोष्ट टाकली होती. त्यात लिंबोळ्यांची उपलब्धता व सेंद्रीय शेतीसाठी वापरली जाणारी खते, औषधे या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते.

Team Agrowon

महारुद्र मंगनाळे 

मी परवा लिंबोळ्यांच्या संदर्भातील एक पोष्ट टाकली होती. त्यात लिंबोळ्यांची उपलब्धता व सेंद्रीय शेतीसाठी वापरली जाणारी खते, औषधे या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. या पोष्टवर अनेकांनी उत्सफूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ३२ जणांनी पोष्ट शेअर केली. पण कोणीही माझ्या प्रश्नांची उत्तरं नेमकेपणानं दिली नाहीत. बहुतेकजण लिंबोळ्यामध्येच अडकले. त्यांच्यापैकी कोणालाही लिंबोळी व्यापाऱ्याचा नंबर किंवा त्याच्या खरेदी-विक्रीची ठिकाणं नेमकेपणाने सांगता आली नाहीत. याला अपवाद फक्त इरफान पठाण या मित्राचा. 

काही जणांनी माझ्या पोष्टवर मोबाईल नंबर दिले होते. दोघांनी नीम चं मंडी हे फेसबुक पेज बघायला सांगीतलं होतं. त्या पेजवर जाऊन बघितलं. त्या ग्रुपचा सदस्य झालो. तिथं काही फोन नंबर मिळाले. ते नोंदवले. आज सकाळपासून अनेकांशी बोललो. त्यातून माझ्या हाती मनोरंजक माहिती आली. सांगोला तालुक्यातील जवळा बाजार येथील संतोष काळे यांच्याशी बोललो.ते म्हणाले, अद्याप लिंबोळी खरेदी सुरू झालेली नाही. मी म्हटलं, गतवर्षीचा भाव सांगा. ते बोलले, सर्वसाधारण लिंबोळी(टरफलासह)  दहा-बारा रूपये.

वाळलेला माल असेल तर सतरा-अठरा रूपये किलो. ते बोलायला फार उत्सूक दिसले नाहीत. फेसबुकवर प्रभाकर मगदूम यांनी कॉल मी,म्हणून नंबर दिला होता. त्यांना फोन केला. त्यांनी दुसरा एक नंबर दिला. त्यावर फोन केला. सांगितलं पत्रकार आहे. लिंबोळी संदर्भात माहिती घेतोय. नंदकुमार पाटील त्यांचं नाव. सांगली जिल्ह्यात आष्टाजवळ त्यांचा लिंबोळीचा कारखाना आहे. ते बोलले, माझे बंधू डॉ.सतिश पाटील हे त्याचं काम बघतात.

त्यांचा नंबर देतो. त्यांनी दिलेल्या नंबरवर बोललो. माझी ओळख सांगितले. ते बोलले, मी आता घाईत आहे.नंतर बोलतो. सहा वाजेपर्यंत त्यांचा फोन आला नाही. मी ही केला नाही. दुसऱ्या नंबरवर फोन केला. किशोर अंबी त्यांचं नाव. शिरोळ तालुक्यात ते असतात. टरफलासहीत २० रूपये किलोने लिंबोळ्या घेतो असं सांगितलं. महाराष्ट्रातील पत्ता असलेल्या दोघांनी फोन उचलले नाहीत. मी परत केला नाही.

नीमचं मंडी या फेसबुक फेसबुक पेजवर मिळालेल्या फोनवर संपर्क केला.कैलास यादव हे नाव. त्यांनी मध्यप्रदेशातील कुठल्या तरी गावचं नाव सांगितलं. ते बोलले, मै निंबोळी नही, सुके नीमके पत्ते खरीदता हूं.मी विचारलं, क्या रेट है.उत्तर आलं, देड हजार रूपये क्विंटल. मी हसत म्हटलं,इस रेटमे तो मिनीमम मजुरीही नही मिल सकती..तो बोलला, लोग लाते है.. हम खरिदते है.. मजुरीकी चिंता मै क्यों करू. दयाशंकर शर्मा हे नाव असलेल्या नंबरवर कॉल केला. एका महिलेनं उचलला. तिला मी काय बोलतोय ते कळत नव्हतं. फोन बंद केला. मंजूर भूत्ता नावावर बोललो. ते राजस्थानमधील सियाकचे. ते बोलले, इधर तो निंबोळी कोई खरेदी नही करता...हमारे यहॉ निंबोळी और नीमपत्ता बहुत है. कोई अच्छी किमत देता है तो मै जितना होना उतना माल दूंगा.. मुझे खरीददार के फोन दिजीए! मी म्हटलं, मै वही ढूंढ रहा हूं. मुझे पता चला तो आपको बताऊंगा..

शेवटी मानवलोकच्या सेंद्रिय शेती प्रकल्पात कार्यरत मित्र इरफान शेख याला फोन केला. त्याने दिलेल्या फोन नंबरवर बोललो. त्यांनी त्यांच्याकडं लिंबोळी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं. नांदेडच्या एका मित्राला एक क्विंटल लिंबोळी हवी होती. त्यांना तो नंबर शेअर केला. सेंद्रिय शेती करणाऱ्या व उत्पादनाचं मार्केटिंग करणाऱ्या या शेतकऱ्याला मी आठवडाभरात भेटेन. प्रत्यक्ष पाहूनच मी त्याच्यावर लिहीनं.

मी परवापासून या लिंबोळ्यातच अडकलो होतो. या शोधात हे लक्षात आलं की, ज्यांना शेतीतील वा इतर मजुरी मिळत नाही, अशाच महिला, पुरूष लिंबोळ्या गोळा करतात. लिंबोळ्यांचा दहा,बारा,पंधरा रूपये किलोचा भाव लक्षात घेतला तर, एका महिलेला दिवसभराची मजुरी शंभर ते सव्वाशे रूपयेच पडते. मी रुद्रा हटवरील अनिता,पुष्पा मावशी यांच्याशी बोललो. त्यांचं म्हणणं असं की, एक महिला दिवसभरात जास्तीत ५ किलो लिंबोळी वेचू शकते. महिलेचा शेतीतील रोजगार २५० रूपये आहे.

मी त्यांना लिंबोळ्या वेचायला लावल्या तर, मला ती लिंबोळी ५० रूपये किलो पडेल. त्यामुळं मला रोजंदारीवर लिंबोळी वेचणं परवडणार नाही. कोणतीही महिला पंधरा-वीस रूपये किलोने लिंबोळी वेचायला तयार होणार नाही. म्हणजेच सेंद्रिय शेतीसाठी लागणारी लिंबोळी कोणाच्या तरी शोषणावर गोळा होते. निंबोळी अर्काचा भाव बघा आणि लिंबोळीचा भाव बघा. जे कोणी लिंबोळी गोळा करून दहा-बारा रूपये किलोने विकत आहेत, ती त्यांची मजबुरी आहे. ज्या लिंबाच्या झाडाचं, लिंबोळीचं सेंद्रीय शेतीत कौतुक होतयं, ती लिंबोळी गरीब माणसांना किमान पोट भरेल एवढीही मजूरी देऊ शकत नाही. हे वास्तव माझ्यासाठी भयंकर आहे.

नुसत्या एका लिंबोळीची ही अशी कथा आहे. मी माझ्या पोष्ट मधील इतर पाच-सहा प्रश्नांचं उत्तर अद्याप कोणीही दिलेलं नाही. सेंद्रिय शेतीच्या नावावर बुवाबाजी करणारे अनेक आहेत.काहीतर पद्मश्री झालेत.भंपक लोकांची संख्या अफाट आहे. मी विचारपूर्वक,पूर्ण तयारीने सेंद्रिय शेतीत उतरलोय. या शेतीला वैज्ञानिक अधिष्ठान देण्याची गरज आहे. दशपर्णी असो की, जीवामृत त्यात कोणते घटक असतात.

त्याची प्रयोगशाळेत तपासणी व्हायला हवी. कशाचे किती प्रमाण वापरायचे, यावर संशोधन व्हायला हवं. ते पुराव्यानिशी नीट मांडायला हवं. त्याचं डाक्युमेंटेशन केलं पाहिजे. हे शास्त्र म्हणून विकसित करायला हवं. तरच सेंद्रीय शेतीला भवितव्य निर्माण होईल. उगी उठसुठ विषमूक्त, विषमूक्त असं उदात्तीकरण करून हाती काही लागणार नाही. मी सेंद्रिय शेती करताना, वारंवार चिकित्सा करणार. चीरफाड करणार. त्यातून जे मला दिसेल ते मांडत राहणार! 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT