Maharudra Mangnale : फळांचा राजा आंबा... आमचाही लाडका!

Mango Fruit : आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो, ते त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळं. एवढी वैविध्यपूर्णता दुसऱ्या कुठल्याच फळात आढळणार नाही. कुठल्याही फळाचा आकार, गंध आणि चव ठरलेली असते. पण आंबा याला अपवाद आहे.
Mango
MangoAgrowon

महारुद्र मंगनाळे 

Story of Mango : आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो,  ते त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळं. एवढी वैविध्यपूर्णता दुसऱ्या कुठल्याच फळात आढळणार नाही. कुठल्याही फळाचा आकार, गंध आणि चव ठरलेली असते. पण आंबा याला अपवाद आहे.

आकार, गंध आणि चवीवरून आंब्याचे शेकडो प्रकार असतील. विशेषतः गावरान आंब्यात हे वैविध्य दिसते. आकाराने छोटे, मध्यम, मोठे. गोल, लांबट, या दोन्ही प्रकारात न मोडणारे आंबे मी बघितलेत.

गंधामध्ये एकदम सुगंधित, शेप्या, तीव्र व गंध नसलेले आंबेही बघितलेत. चवीमध्ये गोडचिटूक, ज्याची ओळख साखऱ्या अशी असायची. बहुतांश आंबे मध्यम गोडी असलेले तर काही पिकल्यानंतरही आंबटच असणारे आंबे मी अनुभवलेत. गावरान आंब्याच्या विभागवार वेगवेगळ्या जाती आहेत. मराठवाड्यात आढळणारा आंबा विदर्भात, प.महाराष्ट्रात आढळणार नाही.कोकणातील आंबा इतरत्र दिसणार नाही.

लोणच्याचा आंबा वेगळाच असतो. आमच्याकडं त्याला खाराचा आंबा म्हणतात. काही गावरान आंबे भरपूर दिवस टिकतात तर काही आंबे पिकल्यावर चार दिवसातच विटतात. काहींचा रस पातळ असतो तर काहींचा घट्ट. रसाचे रंगही वेगवेगळे असतात. काही आंब्यांना चिक खूप असतं तर काहीना खूपच कमी.

काहींचं देठ खूप मजबूत असतं. वादळ-वाऱ्यातही आंबे पडत नाहीत. तर काही आंब्यांचा वाऱ्यासमोर टिकाव लागत नाही. एवढं  वैविध्य असणारं एक तरी फळ आहे का? गेल्या काही वर्षांत केशर आंब्यांची लागवड मराठवाड्यात बरीच वाढलीय. कलम लावल्यानंतर साधारण चवथ्या वर्षी फळं येतात. गावरान आंब्याला आठ-दहा वर्षे लागतात. केशरची निवड करण्यामागे हेच कारण आहे. शिवाय केशर आंबा गोडच असतो.

माती,लागवडीनुसार चवीत किंचीत फरक पडतो. ज्यांना फक्त केशरची चव माहिती आहे, त्यांना गावरान आंबा आवडणं अवघड आहे. केशर चिरून खाता येतो. त्याचा रसही होतो. कलम केलेल्या केशरच्या झाडाचं आयुष्य १५-२० वर्षे इतकंच असतं, असं म्हणतात. पण हा मुद्दा आजकाल कोणाला महत्त्वाचा वाटत नाही. गावरान आंबा मात्र पिढ्यानपिढ्या राहातो. शंभर वर्ष वयाचं आंब्याचं झाड मी बघितलयं. १९७२च्या दुष्काळापासून गावरान आंब्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली.

Mango
Mango : नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे कसे ओळखायचे?

मला बालपणापासूनच आंब्याची आवड आहे. शालेय आयुष्यात रसापेक्षा आंबा पिकवून खाणं आवडायचं. आंबा पाण्याने स्वच्छ धूवून तो पिकवायचा. तोंडावरचा जाड पडदा काढायचा. चीक बाहेर सोडायचं आणि मग आंबा चोखून खायचा. पाड असेल तर तो उलट दिशेने खायचा असतो. नाही तर चीक तोंडात जातं. आठवी-नववीपर्यंत तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास आजोळी जायचो. मामाच्या शेतात आंब्याची झाडं नव्हती.

पण ते भरपूर हिरवे आंबे घेत. हिश्याने झाडच घेत. त्यामुळं भर उन्हाळ्यात आंब्यांची दिवाळी असायची. शिरूरला आमच्या शेतातही चार गावरान आंब्यांची झाडं होती. ७२च्या दुष्काळात दोन वाळली. खाराचा म्हणून ओळखला जाणारा आंबा वहितीच्या रानातच होता. तो अडचणीचा ठरू लागल्याने तोडला. एक आंबा खासच होता. हिरव्या आंब्याची एक फोड खाणंही शक्य होत नसे. मात्र खायला गोड.रसाला खास.

याला खास सुगंध होता. बसमध्ये चार आंबे घेऊन बसलो तरी, सगळीकडं सुगंध पसरायचा. इतर प्रवासी अस्वस्थ होतं. त्याला कीड लागून तो आठ वर्षांपूर्वी तो वाळला. शेवटच्या वर्षीही त्याला भरपूर आंबे लागले होते. हा आंबा देठात नाजुक होता शिवाय पिकल्यावर चार दिवसच राहायचा. या आंब्याचा वंश आमच्याकडं नाही. सेवालय, आजोळ आणि मुलगी वीणाकडं या कोयीची झाडं आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा त्या झाडांना आंबे लागतील, तेव्हाच काय ते नक्की कळेल.

Mango
Mango Orchard Management : निर्यातयोग्य केसर आंबा उत्पादनासाठी करावयाची कामे

मी शेतीत राहायला आलो तेव्हा वडिलांनी लावलेला एकच आंबा होता. तो ही खाराचा म्हणून ओळखला जातो. मात्र पिकल्यावर तो गोड आहे. आंबा आकाराने छोटाच आहे. एखाद्या वर्षी त्याला खूपच आंबे लागतात तेव्हा आंब्यांचा आकार आणखी छोटा होतो. एका वर्षी त्याला तीन-चार हजार आंबे निघाले होते. मित्र-नातेवाईकांना वाटता वाटता थकून गेलो. आठ वर्षांपूर्वी वाळलेल्या आंब्याच्या झाडाखालील मारूती (शेंदूर लावलेला उभा दगड) आता या झाडाच्या बुंध्याला विसावलाय. त्यामुळं मी याचं नामकरण मारूतीचा आंबा असं केलयं.

२०१३ साली रुद्रा हटसमोरच्या जमिनीत फळझाडांची लागवड करण्याचा निर्णय झाला तेव्हा आंब्यांना झुकतं माप मिळणं साहजिक होतं. ही जमीन चुनखडीयुक्त असल्याने, इथं आंबा नीट येणार नाही, तो फार वाढणार नाही, मधेच तो वाळून जाईल, या सगळ्या शक्यता गृहीत धरून मी आंबा लावला. चवथ्या वर्षांपासून आम्ही केशर आंबे खातोय. आंब्याच्या हंगामात वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट ठरलेली असते.

नुकसान होतचं. तरीही खाण्यासाठी भरपूर आंबा निघतात. रस चपाती, धिरडी ,पुरी रस असं दिड-दोन महिने चालतं. आमची ही दिवाळी सुरू झाली की, पक्षी,खारूताई, मुंग्या आणि मधमाशा यांचीही मेजवानी सुरू होते. पक्षी भरपूर आंबे खातात. अर्थात ते त्यांचा हिस्सा घेतात. इवल्याशा चिवण्यांची आंबे खाण्याची धडपड बघण्यासारखी असते. चोंचीने टवके मारून त्या आधी टरफल काढतात आणि मग निवांत गर खात बसतात. खाण्याची सोय असल्याने बागेत विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. त्यांचा सकाळ-संध्याकाळचा गोंगाट ऐकण्यासारखा असतो.

केशर आंब्यासोबतच गावरान जातीची चार झाडं लावली होती. ती चांगली वाढलीत. यातील तिन्ही मोठी झाडं माझ्या अभ्यासिकेसमोर आहेत. त्यातील एकाला यावर्षी मोहोर लागूनही फळधारणा झाली नाही. इतर दोन आंब्यांना चांगली फळं लागलीत. दोन्ही झाडांखाली पाड पडतात. झोपेतून उठल्याबरोबर गबरूची या पाडांसाठी बागेत चक्कर असते. हर्ष आल्यापासून एकही दिवस रुद्रा हट सोडून गेला नाही. सुट्ट्या संपतील तेव्हा आंब्याचा हंगामही संपलेला असेल.

आंबे उतरवणं हे माझं आवडीचं काम. शालेय आयुष्यापासून हे काम करतोय. अवघड फांद्यावरील आंबे काढणं हे थ्रीलिंग असतं. परवा तो अनुभव घेतला. मी आणि नरेशने मारूतीचा अंबा उतरवला. आंबे उतरवताना पाड कोणता ते सहज लक्षात येतं. हे काम कौशल्याचं व रीस्की आहे. अनुभवामुळे रीस्क कमी होते. शरीराचं वजन एकाच फांदीवर न देता ते विभागणं. तोल सांभाळणं, फांद्या वाकवून आंबे आपल्या बाजुने ओढणं, ही मजा असते.

झाडाखालून बघणाऱ्याला असं वाटत राहातं की, आंबे काढणारा कधीही पडू शकतो. पण तसं होण्याचं कारण नसतं. आंब्याच्या फांद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या बऱ्यापैकी लवचिक असतात. फांदी एकदम काडकन अशी मोडत नाही. हा आनंद केशरच्या छोट्या झाडांवर घेता येत नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंबे, रस खाऊन दोन-तीन किलो वजन वाढलयं. हे वजन कमी करण्यासाठी पर्यटनाला निघालोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com