राहुल वडघुले
Okra Farming : महाराष्ट्रामध्ये भेंडी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. भेंडी हे पीक कपाशी या कुळातील आहे. त्यामुळे कपाशी पिकाप्रमाणे भेंडीवर देखील मावा, पांढरी माशी, तुडतुडे अशा विविध किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचप्रमाणे भेंडी पिकावर येणारा मुख्य रोग म्हणजे भुरी रोग. हा रोग ओळखणे अतिशय सोपे असते. या रोगाविषयी आजच्या लेखामध्ये माहिती घेऊ.
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन अन्ननिर्मितीत बाधा येते. परिणामी, पानगळ होऊन नुकसान होते.
या रोगाचा नमुना आम्हाला पिंपळस (ता. निफाड, जि. नाशिक) येथून मिळाला होता. डोळ्यांना दिसणारी सोपी लक्षणे व सूक्ष्मदर्शकाखाली नमुन्याची तपासणी केली असता सदर रोग हा ‘भुरी’च असल्याचे स्पष्ट झाले.
रोगाची माहिती
रोगाचे नाव : भुरी (Powdery Mildew)
हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः इरीसिफी सायकोरयासिरम (Erysiphe cichoracearum) असे आहे.
आढळ ः हा रोग चीन, भारत, मेक्सिको इत्यादी भेंडी पिकविणाऱ्या देशात आढळतो.
नुकसान ः या रोगामुळे भेंडी पिकामध्ये साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.
अन्य यजमान पिके ः काकडीवर्गीय पिके.
लक्षणे
या रोगाची लक्षणे पाने, खोडावर दिसून येतात.
पानाच्या वरील बाजूला पांढऱ्या रंगाची छोटी गोलाकार लक्षणे दिसू लागतात. कालांतराने हे सर्व गोलाकार भाग एकमेकांमध्ये मिसळून संपूर्ण पान व्यापतात. संपूर्ण पानावर पांढऱ्या रंगाची पावडर पसरल्यासारखे दिसते. या पांढऱ्या रंगाच्या पावडरीमुळेच या रोगाला ‘पावडरी मिल्ड्यू’ असे म्हणतात.
या पावडरीसारख्या भागात रोगाचे असंख्य बीजाणू आणि तंतू असतात. शक्यतो झाडाच्या खालच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला दिसतो.
अनुकूल हवामान
हा रोग कोरड्या वातावरणात निर्माण होतो.
या रोगाचे बीजाणू काकडीवर्गीय पिके किंवा काही गवतवर्गीय वनस्पतींवर जिवंत राहतात. तेथून हे बीजाणू मुख्य पिकांवर येतात.
साधारणतः ५० ते ८० टक्के आर्द्रता व १६ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि कोरडे हवामान असल्यास रोगाची लागण होते.
सुरुवातीला जमिनीच्या जवळील पानांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर झपाट्याने रोगाचे बीजाणू रोगग्रस्त पानांवर तयार होतात. त्यांच्या मार्फत पुढे रोगाचा प्रसार होतो.
सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?
सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे तंतू व बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्चिती करू शकतो. या रोगाची बुरशी ही एक्टोफायटिक (Ectophytic) असते, म्हणजे बुरशीचे तंतू हे पिकाच्या फक्त पृष्ठभागावर असतात. हे तंतू पिकाच्या आतमध्ये प्रवेश करत नाहीत.
होस्टोरिया (Haustoria) नावाचा झाडाच्या मुळासारखा भाग तयार करून तो पानांच्या पेशीमध्ये जाऊन त्या ठिकाणी अन्नद्रव्याचे शोषण केले जाते. हे तंतू रंगहीन असतात. त्यावर कोनिडीओफोर (Conidiophore) तयार होतात. यामध्ये बीजाणू कोषदंडावर गोलाकार साखळी सारखे बीजाणू तयार झालेले दिसतात. या बीजाणूंना कोनिडिया असे म्हणतात.
नियंत्रणाचे उपाय
पीक फेरपालट करावी. दुसरे किंवा आधीचे पीक काकडीवर्गीय नसावे.
झाडाच्या खालील बाजूची २ ते ३ पाने काढून टाकावीत.
रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणारी पाने त्वरित तोडून नष्ट करावीत.
जैविक बुरशी जसे की ॲम्पेलोमायसेस क्विस्क्वालिसची (Ampelomyces quisqualis) फवारणी प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर घ्यावी. तसेच बॅसिलस सबटिलिसची (Bacillus subtilis) फवारणी घ्यावी.
पोटॅशिअम बायकार्बोनेटची फवारणी घेता येते.
शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.