Jowar Roti Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Jowar Bhakri : आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्रच खरा!

Team Agrowon

- मुकुंद कुलकर्णी

सोलापूरकरांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे भाकरी. महाराष्ट्राच्या या भागात जेवढे भाकरीचे वैविध्य पहायला मिळेल तेवढे दुसरीकडे मिळणार नाही. ज्वारीच्या पिठात पाणी घालून केलेली भाकरी, ही सर्वमान्य, सर्वांना आवडणारी भाकरी. दुधात ज्वारीचे पीठ मळून केलेल्या दशम्या, या विशेष करुन गुजराती, मारवाडी बांधवांना आवडणाऱ्या भाकऱ्या. पापडासारखी कडक, कडक भाकरी. तिचं नावंच कडक भाकरी. आजकाल हिला बिस्किट भाकरी ही म्हणतात! कडक भाकरी लिंगायत संप्रदायाची खासियत. गरीब-श्रीमंत, मालक-मजूर हा भेदभाव नक्की मिटवणारी , ती भाकरी! समतेचा संदेश देणारी अशी ही भाकरी!

भाकरीची सुरुवातीची अवस्था म्हणजे ज्वारी, त्याच्याही आधी हुरडा. शेतात डोलणाऱ्या , हिरव्यागार कणसातील ज्वारीचे पाचूसारखे हिरवेगार कोवळे मणी म्हणजे हुरडा. हुरडा हा प्रकार अप्रतिमच आहे शेतात डोलणाऱ्या कणसात दाटीवाटीने भरलेले दाणे म्हणजे हुरडा. अलिकडे हा हुरडा प्लॅस्टिकच्या हवाबंद पिशवीत विकत मिळतो. अलिकडे सुरत आदी गुजरातेतील काही भागात पिकणारा हुरडा ही मिळतो. सोलापुरी हुरड्याची सर मात्र त्याला नसते.

हुरडा ही चीज बंद प्लॅस्टिकच्या पिशवीतून घरी आणून भाजून खाण्याचा प्रकारच नव्हे. त्यासाठी तुम्हाला शेतातच जायला हवं. हुरड्यासाठी लावल्या जाणाऱ्या गुळभेंडी, कुचकुची अशा खास जाती आहेत. आमच्या गरीब, प्रगतीशील शेतकऱ्याच्या गावरान अतिथ्यशीलतेचे प्रतिक हुरडा. आजकाल विकतच्या हुरडा पार्टीज अरेंज केल्या जातात. ज्यांना दुसरा पर्याय नाही त्यांच्यासाठी हुरडा पार्टीचा फील अनुभवण्यासाठी या ठीक आहेत. पण स्वतःच्या किंवा जवळच्या मित्रमंडळींच्या शेतावर जाऊन हुरडा खाण्याची मजा त्यात नाही.

साधारण मकर संक्रांतीच्या आसपास हुरडा पार्टीचा सीझन असतो. कडाक्याची थंडी असते त्या दिवसात. शक्य असेल तर शेतातल्या चंद्रमौळी झोपडीत रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी हुरडा पार्टी हा केवळ अनुभवण्याचा विषय आहे. कॅंप फायर किंवा शेकोटीची मजा अनुभवता झगमगत्या चांदण्यात रात्रीच्या नीरव शांततेत जिवलग मित्रमंडळींच्या सोबत पहाटे उजाडेपर्यंत मारलेल्या गप्पा असे प्रकार ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी ही पर्वणीच असते! हा सर्व सरंजाम जिथे सिद्ध केला जातो त्याला आगटी म्हणतात. आगटी म्हणजे शेतजमीनीत खड्डा करुन त्यात पेटवलेली चूल. सकाळच्या चहापासून हुरडा, शेतातले खास गावरान जेवण या सर्व पाकसिद्धी तेथे विलक्षण रुचकर होतात. सुदैवाने आमचं बालपण या सर्व आठवणींनी समृद्ध आहे. या सर्व अफलातून रेसिपीज शेतात राबणाऱ्या काटक शेतकऱ्याच्या राकट हाताने विशेष चवदार होतात!

भाकरी जमायला हवी हेच खरं. गोल गरगरीत भाजताना पुरी सारखी फुगलेली खालचा थोडासा जाड बेस वरचा पातळ पण कुरकुरीत पापुद्रा दोन्ही पुर्णपणे अलग होणारी सर्कल्स. नुसतं साजूक तूप , मीठ आणि वर वर्णन केल्यासारखी गरमागरम पांढरीशुभ्र भाकरी तव्यावरून डायरेक्ट पानात हे सुख तर अनुभवायलाच हवं. भरल्या वांग्याची भाजी, झणझणीत लसणाची फोडणी दिलेलं पिठलं आणि घट्ट कवड्या पडलेलं अदमोरं दही, त्या अदमोऱ्या दह्याचं थोडीशी हिंगाची चिमुट लावलेलं सुंदर ताक, बरोबर शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी हे सुद्धा खास सोलापुरी वैशिष्ट्य. जिभेला चटका देणारी तिखट लवंगी मिरची. आहाहा काय फक्कड बेत! आणि ही चुलीवर भाजलेली असेल तर सोनेपे सुहागा. आजीच्या हातची चुलीवरची भाकरी फक्कडच असायची, त्याची किंमत तेंव्हा कळली नाही, आता कळतेय!

भाकरी मटनाबरोबर पण अप्रतिम लागते. जिभेला चटका देणारा झणझणीत मसालेदार मटनाचा शेरवा, मटनाचा किंवा कुठल्याही नॉनव्हेजच्या रश्श्याला सोलापूरकडे शेरवा म्हणतात. तर असा हा शेरवा आणि लुसलुशीत नरम भाकरी आहाहा! हा रस्सा मात्र पातळच हवा! चुलीवर शिजवलेलं मटन, मटनाचे चुलीवर भाजलेले कबाब, त्याला सोलापूरात शिक कबाब म्हणतात, तसेच मटनाच्या तुकड्यांचे लोणचे म्हणजे सोलापुरी भाषेत मटन आचार याची अप्रतिम चव अनुभवायला तुम्हाला सोलापुरात पेंटर चौक, विजापूर वेस या एरियात मुशाफिरी करावी लागेल. सावजी संप्रदाय तसेच तेलुगु भाषिकही यात एक्स्पर्ट आहेत. ही चव म्हणजे या सम हा!

सोलापूरकडे बायका कडक भाकरी हा अप्रतिम प्रकार करतात. सीमावर्ती भागात असल्यामुळे सोलापुरात मराठी, कन्नड, तेलुगु यांच्या संस्कृतीची सरमिसळ झाली आहे. आपापल्या वैशिष्ट्यांसह सोलापुरची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. पण कडक भाकरी या प्रकाराचा कॉपीराइट लिंगायत समाजाकडे जातो! पापडा सारखी पातळ आणि कुरकुरीत असते ही कडक भाकरी. नॉनव्हेज ग्रेव्ही बरोबर कुस्करून खाणे ही सोलापूरकर खवैयांची फेवरिट डिश आहे.

भाकरीत पुन्हा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी हे पोटभेद. कांदा, चटणी, ठेचा यासोबत तसेच भरली वांगी रंजक या सोबत भाकरी हवीच. घट्ट पिठलं लठ्ठ भाकरी हा तर खास मराठमोळा बेत, जोडीला बुक्की मारून फोडलेला कांदा, मिरचीचा ठेचा. बाजरीची भाकरी वरती तीळ पेरून, वर लोण्याचा गोळा हे काँबिनेशन बेष्टच. मकर संक्रातीच्या भोगीला इतर वेळी जे पुरणपोळीचे स्थान, ते बाजरीच्या भाकरीचे स्थान. अनेक भाज्यांची मिश्र भाजी, लोण्याचा गोळा, टोमॅटोचं सार, मुगाची खिचडी, भाजलेला अथवा तळलेला पापड असा खास बेत असतो त्या सुमारास. दूधात गूळ घालून बाजरीची भाकरी कुस्करून एकदा खाऊन बघाच! अशी एकदम ताजी किंवा एका दिवसाची शिळी बाजरीची भाकरी सुद्धा खूप मस्त लागते!

तांदळाची भाकरी हा खास कोकणी प्रकार. देशावर त्याचं एवढं अप्रूप नाही. तसंही चवीला तांदळापेक्षा ज्वारी, बाजरीची भाकरीच चांगली लागते. तांदळाच्या भाकरी पेक्षा आंबोळी छान लागते. जाळीदार अंबोळी हा प्रकार थोडासा धिरड्यासारखा वाटतो. आम्ही लहान असताना धिरडं गुळवणी बऱ्याच वेळा व्हायची, हा प्रकार अलिकडे कालबाह्य झाला आहे. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बरोबर अंबोळी मस्त लगते. फिश करी, अंबोळी, सोबत सोलकढीही मस्तच.

फक्त झणझणीत मसालेदार पदार्थांबरोबरच नाही, तर भाकरी गोडासोबतही छान लागते. दूध साखर, दूध गुळ आणि कुस्करलेली भाकरी मस्तच. एक दिवसाची शिळी भाकरी तर जास्तच गोड लागते. दुसऱ्या दिवसाची कांदा घालून फोडणी दिलेली भाकरी दह्यासोबत हा नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय आहे. थोडंस हिंग आणि मीठ घालून केलेली ताक भाकरी पण छानच. खंडोबाच्या नवरात्रात तर बाजरीची भाकरी महत्वाची. चंपाषष्ठी दिवशी खंडेरायाला भरीत रोडग्याचा नैवैद्य लागतो. शेतात राबणाऱ्या घरधन्याला टोपलीत भाजी भाकरी घेऊन जाणारी घरधनीण या दृश्यावाचून जुन्या मराठी चित्रपटांना पूर्णत्व नसायचे .

बाकी काही असलं तरी , आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा हा भाकरीचा चंद्रच खरा.

सुदैवाने आमच्या बेटर हाफ भाकरी बनवण्यात एक्स्पर्ट आहेत हे आमचे परम भाग्यच! तर असे हे संक्षिप्त भाकरी आख्यान सुफळ संपूर्ण !!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT