raju shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : खासदारकी-आमदारकी पेक्षा चळवळीचा मुकूट महत्वाचा; पराभवानंतर राजू शेट्टी घेणार बारामतीत कार्यकारणीची बैठक

Loksabha Election 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. हा पराभव त्यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : खासदारकी व आमदारकी पेक्षा शेतकरी व सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या रविवारी (ता.१६) आयोजित ऑनलाईन बैठकीत बोलत होते. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांसह शेट्टी यांचा देखील दारूण पराभव झाला. त्यावरून शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर शेट्टी यांनी आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. तर राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवा असा संदेश कार्यकर्त्यांना त्यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शेट्टी यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी शेट्टी यांनी लोकसभेतील अपयशानंतर स्वाभिमानीची राजकीय व चळवळीच्या ध्येय धोरणासंदर्भात चर्चा केली. सर्वच पदाधिकाऱ्यांनी इथून पुढे शेतकरी आंदोलन व चळवळीशी प्रतारणा न करता प्रामाणिकपणे काम करावे. स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पध्दतीने करावे अशा पध्दतीची भूमिका शेट्टी यांनी मांडली. शेट्टी यांच्या या भूमिकेला राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपला एकमुखी पाठिंबा दिला आहे. तसेच बारामती येथे २२ व २३ जून रोजी राज्य कार्यकारणीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच बैठकीत संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

सध्या राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून महागाईमुळे शेतकरी पिचला गेला आहे. त्यामुळे कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस, द्राक्ष, संत्रा, डाळींब, धान, मका उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे शेतकरी हवालदील झाला असताना मात्र दुसरीकडे सरकारमधील नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत.

त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे व आंदोलने करून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवायचे ठरले आहे. त्याप्रमाणे आता शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील व संदीप जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रश्नावर राज्यभर दौरे सुरू करण्यात येणार आहेत.

तसेच विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, अमरावती, बुलढाणा, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विधानसभेच्या जागांबाबत सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्याचे ठरवण्यात आले आहे. तर विधानसभेला पुर्ण ताकदीने उमेदवार देण्याची चर्चा झाली. यावेळेस राज्यातील सर्व राज्य कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.

दरम्यान इचलकरंजी शहराला शुध्द व मुबलक पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. पाणीप्रश्न निकाली लावण्याबाबतचा अहवाल टाळाटाळ न करता मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा अशीही मागणी शनिवारी (ता.१५) शेट्टी यांनी केली. यानंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी संबधित यंत्रणेला पुन्हा तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र १५ दिवसात अहवाल न दिल्यास तो पावसामुळे पुन्हा दुर्लक्षीत होऊ शकतो असेही बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT