Bangladeshi Farmers Struggle
Bangladeshi Farmers Struggle Agrowon
ॲग्रो विशेष

Bangladesh Agriculture : बांगलादेशी शेतकऱ्यांचे जगण्यासाठी जीवतोड प्रयत्न

डॉ. नागेश टेकाळे

वातावरण बदलासाठी बांगलादेश आज जरी संवेदनशील झालेला असला तरी अद्याप हार मानलेली नाही. या राष्ट्रात आज शेतकऱ्यांना बदलत्या हवामानावर (Climate Change) मात करून शेतीतून उत्पादन (Agriculture Production) मिळवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचे अवलंबनही शेतकरी चांगल्या प्रकारे करत आहेत.

त्यातील एक भन्नाट कल्पना म्हणजे भातात वापरले जाणारे एकाआड एक पाणी देण्याची पद्धती. त्याला इंग्रजीमध्ये ‘Saving Water with Alternate Wetting Drying (AWD)’ तंत्रज्ञान म्हणतात. भात पीक सतत पाण्याखाली न ठेवता पाणी देऊन पुन्हा कोरडे होऊ देणे, पुन्हा पाणी देणे. भात पिकामध्ये ओलावा टिकवून ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या या पद्धतीचा अवलंब बांगलादेशी शेतकरी करत आहे.

कारण या राष्ट्राच्या ७६ टक्के शेतीमध्ये वर्षातून तीन वेळा भात पीक घेतले जाते. पावसाळ्यात मॉन्सूनचे पाणी असले तरी हिवाळा आणि उन्हाळ्यात भूजलावर आधारित शेती होते. या प्रचंड पाणी उपशामुळे विंधन विहिरी ४००-५०० फूट खोल गेल्या आहेत. त्यातच भूजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे विषारी परिणाम म्हणून आरोग्याच्या अनेक समस्या दिसत आहेत.

उदा. भात खाणाऱ्या लोकांमध्ये पोटदुखी, अंगदुखी, उलट्या, हगवण इ. हाच भूजलाचा उपसा कमी करण्यासाठी AWD पद्धतीनुसार भात शेतीत एकदा ५ सेंमी एवढे सिंचन करून घेतात, नंतर वाफसा येईपर्यंत थांबून पुन्हा सिंचन केले जाते. दोन सिंचनामधील अंतर दहा दिवसापर्यंत असू शकते. यामुळे उत्पादनात काहीही फरक पडत नाही.

पाणी कधी द्यावयाचे हे शेतकऱ्याला समजण्यासाठी शेतात प्लॅस्टिकचा ३० सें.मी लांबी आणि १५ सें.मी. व्यास असलेला छोटा पाइप मध्यवर्ती भागात जमिनीलगत (१५ सें.मी खोली पर्यंत) रोवतात. त्या पाइपवर सर्व बाजूंनी छिद्रे असल्याने जमिनीमध्ये जितके पाणी असते, तितकेच पाणी पाइपमध्ये असते. त्यात हात घालून ओल किती खोलीपर्यंत आहे, ते तपासता येते.

१५ सेंमीपेक्षा ओल खाली गेल्यास पुन्हा पाणी दिले जाते. यामुळे उत्पादनामध्ये कोणतीही घट न होता पाण्याची मोठी बचत होते. तसेच भात शेतीमधून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायू मिथेनचे प्रमाण कमी राहते. वातावरण बदलासाठी कर्ब आणि मिथेन वायू जास्त जबाबदार आहेत. हे दोन्हीही वायू शेतीक्षेत्रातून अधिक तयार होतात.

भातशेती पाण्याने भरलेली राहिल्यामुळे जमिनीत प्राणवायू राहत नाही. प्राणवायू विरहित कुजण्याची प्रक्रिया जिवाणूंकडून वेगाने होऊन मिथेन वायू तयार होतो. हा वायू कर्ब वायूच्या तुलनेत वातावरणात १० पट जास्त उष्णता पकडून ठेवतो. बांगलादेशामधील वर्षभराचे भात उत्पादन हे जगभरासाठी हानिकारक असलेल्या मिथेनची प्रचंड प्रमाणात निर्मिती उत्पत्ती करत होते. त्यावर AWD पद्धती उपयुक्त ठरत आहे.

चीन आणि जपानमधील अभ्यासामध्ये भात पिकास मध्यवर्ती वाढीच्या काळात पाण्याची ओढ दिली असता उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आले. त्याचेही प्रयोग बांगलादेशच्या उत्तर भागामध्ये (जिथे पाण्याचा उपसा जास्त असलेल्या) काही गावामध्ये करण्यात आले. पाणी कमी देऊनही उत्पादनामध्ये कोणतीही घट झाली नाही. भूजलाचा उपसा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मिथेन उत्सर्जन कमी झाले. आपल्याकडे पंजाबमध्येही काही भागात पाणी उपसा करून भातशेती केली जाते. येथेही आर्सेनिकची भीती आहेच. बांगलादेशातील असेच प्रयोग नक्कीच उपयोगी ठरतील.

क्षार सहनशील वाण

बांगलादेश येथील भात संशोधन केंद्राने क्षार सहनशील असे नवीन भात वाण विकसित केले आहेत. मात्र वातावरण बदलामध्ये क्षारता हीच समस्या राहिलेली नाही. त्यामुळे त्यांचा वातावरण बदलांसंदर्भात प्रभावीपणासंदर्भात बांगलादेश अभियांत्रिकी विद्यापीठामधील वातावरण बदलाचे अभ्यासक डॉ. सैफुल इस्लाम शंका व्यक्त करतात.

पुढे ते देशावरील समुद्राचा राग कमी करण्यासाठी समुद्रकिनारी खारफुटीची भक्कम भिंतच उभी करण्याचे सुचवितात. पाश्‍चिमात्य राष्ट्रांनी केलेल्या पर्यावरण हानीचे परिणाम आमच्या सारख्या गरीब राष्ट्राला भोगावे लागत असल्याचे पोटतिडकीने सांगतात. विकसित राष्ट्रांनी वातावरण बदलाच्या लढ्यासाठी राखून ठेवलेले १०० अब्ज डॉलरपैकी एक छदामही या गरीब देशांपर्यत पोचला नसल्याची खंत व्यक्त करतात. थोडक्यात “कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे” हे इथे सत्यात अवतरले आहे, हे निश्‍चित.

तरंगत्या शेतीची कल्पना...

बांगलादेशमध्ये नद्यांचे पसरलेले पात्र आणि नदीकाठची वाहून गेलेली शेती यावर मार्ग काढण्यासाठी येथे तरंगत्या शेतीची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. विशेष म्हणजे महिला यात आघाडीवर आहेत. येथे नद्यांना आलेले महापूर पूर्णपणे ओसरण्यास अनेक वेळा जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडतो. आख्खी शेतीच नदीच्या पाण्याखाली गेल्याने शेती कोठे करणार? विस्थापित गावकऱ्यांनी एकत्र येत नदीच्या पाण्यावर तरंगती शेती सुरू केली आहे.

बंगालच्या उपसागराने घेरलेल्या या राष्ट्रामध्ये भूप्रदेशावर समुद्राचे अतिक्रमण वाढत आहे. अनेक ठिकाणी शेत जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले आहे. एका बाजूला महापुराचे पाणी, वाहून जाणारी सुपीक माती आणि काही वाढलेली क्षारता यामुळे शेती करणेच कठीण झाले आहे. थोडक्यात वातावरण बदलामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दशकांपासून हे राष्ट्र जागतिक हवामान धोक्याच्या निर्देशांकामध्ये ७ व्या स्थानावर आहे. जमिनीतील क्षारतेवरही तरंगत्या शेतीतून मार्ग काढला जात आहे.

नदीपात्रात वाढलेली जलपर्णी आणि बांबू यांना एकत्रित करून घट्ट बांधल्यानंतर पाण्यावर तरंगणारा तराफा तयार होतो. भातासोबत काही शेतकरी या तराफ्यावर गवार, पालक, मेथी, मिरची, दोडका, काकड्या अशी वेलवर्गीय पिकेही घेतात. हे शेतीचे तराफे पाण्याच्या उंचीप्रमाणे वर खाली होत असले तरी त्यावरील पिकांचे नुकसान होत नाही.

महिला वर्ग वर्षभर तराफे तयार करण्यात व्यस्त असतो. तर पुरुष त्या तराफ्यांना पाण्यामधून, पाणथळ जागेतून नदीपात्रात आणतात. तीन, चार वर्षे वापरल्यावर तराफ्यांचे पुन्हा खत तयार केले जाते. स्वमालकीचा तराफा ओळखण्याची शेतकऱ्यांची स्वत:ची विशिष्ट खूण असते. वातावरण बदलावर मात करण्यासाठी अशी नावीन्यपूर्ण शेती काही मोजक्या गावामध्येच केली जाते.

दुर्दैवाने शेत नदीखाली जात असल्याने अनेकांनी शेती सोडून खाडीमध्ये खेकडे पकडणे, बदक पालन असे दुय्यम व्यवसाय सुरू केले आहेत. याला ढाका शहरात उच्च दर मिळतो. बँकॉकमध्ये पाण्यामधील भाजीपाल्याचे तराफे हे पर्यटकांचे आकर्षण आहे, तर बांगलादेशात तो जगण्याचा पर्याय हाच प्रचंड मोठा विरोधाभास आहे.

...असा बांधतात तरंगता तराफा

तराफा कुटुंबाच्या गरजेनुसार हा एक ते चार गुंठे क्षेत्रापर्यंत तयार करतात.

प्रथम पोकळ बांबू आडवे उभे बांधून पसरट तराफा तयार करतात.

दोन बांबूंच्या मध्ये जलपर्णी वनस्पतीची ठेवतात. त्यावर लाकडाच्या लहान चिपा, भुसा, भाताचे तूस असे वजनास हलके जैविक साहित्य भरले जाते.

तराफ्यास चारही बाजूंनी बांबू उभे बांधून बंदिस्त करतात.

आतमध्ये सेंद्रिय पद्धतीने भात शेती, भाजीपाला उत्पादन घेतात. हे उत्पादन त्या शेतकरी कुटुंबापुरतेच मर्यादित असले तरी मोठी मदत होत.

अन्य देशांमध्ये जलपर्णीची वाढ भयंकर संकट मानले जात असताना बांगलादेशाच्या शेतकऱ्यांनी मात्र त्याचा चांगला उपयोग केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT