Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Management : वाढत्या थंडीत केळी बागेचे व्यवस्थापन

Banana Orchard Management : थंडीची चाहूल लागली असून दिवस व रात्रीच्या तापमानात घट होत आहे. केळी हे उष्णकटीबंधीय फळपीक असल्याने कमी तापमानास अत्यंत संवेदनशील आहे.

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पुजारी

थंडीची चाहूल लागली असून दिवस व रात्रीच्या तापमानात घट होत आहे. केळी हे उष्णकटीबंधीय फळपीक असल्याने कमी तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. विशेषतः तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास केळी पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांवर विपरीत परिणाम दिसून येतात.

सध्या जून लागवडीतील मृग बाग शाकीय वाढीच्या अवस्थेत, तर ऑक्टोबर लागवडीच्या कांदेबागेतील झाडे स्थिरावून जलद शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत. तापमान कमी होत जाईल, तसे नवीन पाने येण्याचा वेग मंदावतो.

त्यामुळे केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत लागवड केलेल्या केळी बागा घड तयार होणाच्या अवस्थेत आहेत. थंडीच्या काळात केळी पिकावर होणारे परिणाम टाळण्यासाठी बागेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कमी तापमानाचे होणारे परिणाम

  • केळीच्या झाडाला नवीन मुळ्या येण्याच्या आणि त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो. त्यांची क्रियाशीलता देखील कमी होते. त्यामुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता घटते.

  • कमी झालेल्या तापमानाचा पानांच्या निर्मिती व वाढीवर परिणाम होतो.

  • थंडीमुळे नवीन पानांची गुंडाळी उलगडल्यास वेळ लागतो. अनेक वेळा पानाच्या एका कडेजवळ म्हणजे उलगडणाऱ्या पुंगळीच्या बाहेरील बाजूवर चट्टे दिसून येतात.

  • मुळांद्वारे अन्नद्रव्ये शोषणाची क्षमता कमी झाल्यामुळे पाने एकमेकांजवळ येतात. त्यामुळे पानांचा खूप कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी, प्रकाश संश्‍लेषण क्रियेत बाधा येऊन झाडाची वाढ मंदावते. अन्नद्रव्यांचे शोषण व वहन योग्यरीत्या न झाल्याने पाने पिवळसर दिसू लागतात.

  • मुळांची घटलेली कार्यक्षमता आणि नवीन पाने येण्याचा मंदावलेला वेग यामुळे घड निसवण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये केळफूल बाहेर पडण्यास विलंब होतो.

  • झाडांची एकाचवेळी निसवण होत नाही. तीव्र थंडीच्या काळात घड सामान्यपणे न निघता झाडाचे खोड फोडून बाहेर निघतो. असा घड व्यवस्थित न पोसल्याने कमकुवत राहतो. अशा घडांना बाजारमूल्य नसते. कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहिल्यास बागेतील काही झाडे वांझ राहतात.

थंडीतील व्यवस्थापन

  • केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात.

  • पालाश या अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये. नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळावा.

  • थंडीच्या काळात केळीची पाने पिवळसर दिसत असली, तरी नत्राचा अतिरिक्त वापर करू नये. अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे करपा (सिगाटोका) रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता असते.

  • प्रति झाड ५०० ग्रॅम ते १ किलो निंबोळी पेंड पावडर जमिनीतून घ्यावी.

  • शक्यतो रात्री व पहाटेच्या वेळी सिंचन करावे.

  • केळीच्या खोडाभोवती सेंद्रिय पदार्थाचे जसे उसाचे पाचट, सोयाबीनचा भुस्सा यांचे आच्छादन करावे. निसवण सुरू असलेल्या बागेतील घडाच्या फण्या पूर्ण उमलल्यानंतर केळफूल कापावे. तसेच ८ ते ९ फण्या ठेवून शेवटच्या फण्या कापाव्यात.

  • घडाच्या योग्य वाढीसाठी व गुणवत्तेसाठी घडावर पोटॅशिअम सल्फेट (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळून दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी केळफूल व शेवटच्या फण्या काढल्यानंतर लगेच करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.

  • दुसरी फवारणी केल्यानंतर घड २ टक्के सच्छिद्रता असलेल्या १०० गेज जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकून घ्यावेत.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • जून लागवडीतील (मृगबाग) बागेस जमिनीतून खते देत असताना, ८२ ग्रॅम युरिया, ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणे प्रति झाड मात्रा द्यावी. ठिबक सिंचनातून खते देताना १३ किलो युरिया, ८.५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

  • ऑक्टोबर लागवडीच्या कांदेबागेस जमिनीतून खते देताना प्रति झाडास ८२ ग्रॅम युरिया, तर ठिबक सिंचनातून खते देताना प्रति एक हजार झाडांस ४.५ किलो युरिया, ६.५ ग्रॅम किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

करपा रोग नियंत्रण

  • अनुकूल हवामानामुळे या वर्षी केळी बागांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव काहीसा वाढलेला दिसून येत आहे.

  • नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल १ मिलि अधिक मिनरल ऑइल १ मिलि याप्रमाणे प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

(ॲग्रेस्को शिफारस)

फवारणी करताना पानाच्या वरील भागाबरोबरच खालचा भागही व्यवस्थित फवारणी द्रावणाने व्यापला जाईल या प्रमाणे फवारणी करावी.

.- डॉ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९ ४३१४६

(माजी उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?

Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’

Goat Health Care: शेळ्यांमधील फुप्फुसदाहाची लक्षणे अन् उपाययोजना

Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी

Indigenous Seeds Conservation: देशी बियाणे संवर्धनाचा घेतलाय वसा

SCROLL FOR NEXT