शेतकरी ः विशाल किशोर महाजन
गाव ः नायगाव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र ः ४० एकर
केळीखालील क्षेत्र ः १५ एकर (२० हजार केळी झाडे)
माझी नायगाव (ता.मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे तापी नदीच्या लाभक्षेत्रात ४० एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून बेवडसाठी तूर, हळद, आले ही पिके घेतो. सुमारे १५ एकरावर नवती केळी लागवड आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ङतिसंवर्धित रोपांची ६ बाय ५ फूट अंतरावर लागवड केली. संपूर्ण लागवड गादी वाफ्यावर केली आहे. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने सर्व बाबींचे नियोजन केले जाते.
व्यवस्थापनातील बाबी
सध्या पीक आठ महिने कालावधीचे झाले आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर अचानक ढगाळ हवामान होत आहे. ढगाळ हवामान आणि अधिक तापमान अशा हवामान स्थितीमुळे केळी पिकांत विविध समस्या येण्याची शक्यता असते. त्यासाठी खत आणि सिंचनाचे कोटेकोर व्यवस्थापन करणे आवश्यक असते. बागेतील झाडांचे उष्ण लहरींपासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती हिरव्या रंगाचे नेट लावण्याचे काम सुरु आहे. शेडनेट बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला लावली जाईल. बऱ्याच वेळा केळी पीक शेताच्या मध्यभागी असल्यास, नैसर्गिक वारारोधक म्हणजेच शेवरी किंवा संकरित उंच वाढणाऱ्या गवताची लागवड करणे शक्य होत नाही. अशावेळी हिरव्या शेडनेटचा वापर फायदेशीर ठरतो. दर चार दिवसांनी १ हजार रोपांना युरिया ४ किलो, पोटॅश १० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ५०० ग्रॅम प्रमाणे ड्रीपद्वारे खत मात्रा दिली जाते. पीक निसवत असल्याने खत व्यवस्थापनात सातत्य राखले आहे. निसवण काळात पिकास पोटॅशची योग्य मात्रा मिळणे गरजेचे असते. सध्या तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे सिंचनाकडे विशेष लक्ष देत आहे. दररोज पावणेतीन तास ठिबक संच सुरू केला जातो. सिंचनासाठी सिंगल लॅटरलचा वापर केला आहे. सध्या १४ टक्के निसवण झाली आहे. निसवण ८० टक्के पूर्ण होईपर्यंत युरिया, पोटॅशचा योग्य मात्रेत पुरवठा केला जाईल. कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे वेळोवेळी निरीक्षण करत आहे. निसवणीचे प्रमाण लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करतो. दर १५ दिवसांनी फुटवे काढले जातात. फुटवे अधिक वाढल्यास मुख्य झाडाची वाढ आणि विकासावर परिणाम होतो. तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे सिंचनाच्या कालावधीत वाढ केला जाईल. एप्रिलपासून रोज ३ तास सिंचन केले जाईल. वेळापत्रकानुसार खते दिली जातील. युरियाची मात्रा कमी दिली जाईल. सध्या प्रति एक हजार झाडांना ४ किलो युरिया देत आहे. रोगराईबाबत पिकाचे सतत निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन केले जाईल. निसवण पूर्ण झाल्यानंतर घडांना स्कर्टिंग बॅग लावल्या जातील. घडाच्या वजनामुळे झाड कोसळण्याची शक्यता असते. केळी झाड कोसळू नये यासाठी बांबूचा आधार दिला जातो. बांबूचा वापर टाळण्यासाठी निसवणीनंतर लगेच घडाच्या खालील बाजूस दोरी अडकवून बुंध्याला बांधले जाईल. - विशाल महाजन, ९२८४८४०४९९
(दुपारी दोन ते चार या वेळेत संपर्क साधावा.)