Vangaon News : यंदा पावसाने जिल्ह्यात वेळेत हजेरी लावली होती; परंतु मधल्या काळात माघार घेतल्याने बळीराजाने डोळे आकाशाकडे लावून धरले होते. अशा परिस्थितीत मेघराज पुन्हा शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आले. त्यानंतरच्या काळात नियमितपणे सुरू झाल्याने पेरलेल्या बियाण्यांची चांगली उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजाला आता आवणीचे वेध सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भातशेती हे खरीप हंगामातील एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. येथील शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. संसाराचा गाडा ओढण्यासाठी बळीराजा दिवस रात्र शेतामध्ये राबत असतो. मागील वर्षी निसर्गाच्या कोपामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. यंदा नुकसान भरपाई खरीप हंगामात भरून काढावी, यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघराजा पुन्हा बरसल्याने शेती बहरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवणीचे वेध लागले आहेत. सध्या भाताची रोपे २० ते २५ दिवसांची झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात करावी, असे डहाणूचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाचपुते यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, पालघर जिल्ह्यात सरासरी ८९.१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. महावेधच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी पाऊस ४११.९ मिमी इतका होतो. यावर्षी ३६७.२ मिमी (१०.८ टक्के कमी) पावसाची नोंद झाली आहे. एकंदरीत जिल्ह्यात भातशेतीच्या लागवडीसाठी चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी कामांना वेगाने सुरुवात करावी.डॉ. विलास जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.