Radish Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Radish Farming : मुळा वाढीसाठी संतुलित खत व्यवस्थापनावर असतो भर

Radish Production : पूर्वी पारंपरिक जिरायती पिके घेत असत. मात्र गेल्या ३० वर्षांपासून भाजीपाला पिकांवर भर देत आहेत. द्राक्षाची फळबाग असून, त्याला जोड म्हणून टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर तसेच मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या घेतात.

मुकूंद पिंगळे

Radish Farming Fertilizers Management :

शेतकरी नियोजन : मुळा पीक

नाव : किरण अशोक पाळदे

पत्ता : शेवगे दारणा, ता.जि. नाशिक

एकूण शेती : ३ एकर

मुळा पीक : २० गुंठे

पूर्वी पारंपरिक जिरायती पिके घेत असत. मात्र गेल्या ३० वर्षांपासून भाजीपाला पिकांवर भर देत आहेत. द्राक्षाची फळबाग असून, त्याला जोड म्हणून टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर तसेच मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या घेतात. या सर्व पिकात प्रयोगशीलतेने काम करत गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यात किरण यांनी सातत्य राखले आहे.

त्यातही बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक पद्धतीत योग्य ते बदल करत असल्याने गेल्या काही वर्षांत मिळणाऱ्या फायद्यात वाढ झाली आहे. पूर्वी मुळा हे पीक त्यांच्याकडे कमी अधिक क्षेत्रावर असायचे. मात्र मध्यंतरी दर व अन्य काही अडचणींमुळे या पिकाच्या लागवडीमध्ये खंड पडला होता. आता गेल्या वर्षापासून मुळा हे पीक पुन्हा घेण्यास सुरुवात केली आहे.

लागवडपूर्व नियोजन :

लागवड करण्यापूर्वी शेत नांगरून, नंतर वखरणी करून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यामध्ये एकरी चार ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत वापरले जाते. तसेच भरखत म्हणून कुक्कुटखतामध्ये रायझोबिअम, ट्रायकोडर्मा यांचे मिश्रण मिसळून काही काळ सावलीमध्ये सूक्ष्मजीवांचे संवर्धन होण्यासाठी ठेवले जाते. त्यातील ओलावा व आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी हलके पाणी शिंपडले जाते. त्यानंतरच त्यांचा शेतामध्ये वापर केला जातो. यातील रायझोबियममुळे पिकाला नत्र मिळतो, तसेच ट्रायकोडर्मामुळे जमिनीतून येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणास मदत होते.

लागवड :

भर खते टाकल्यानंतर दोन फुटाची सरी पाडून घेतली जाते. त्यानंतर कुशल मजुरांमार्फत दोन इंच अंतरावर बियाणे टोकले जाते. २० गुंठे क्षेत्रासाठी साधारणतः ८०० ग्रॅम बियाणे लागते. बियाणे टोकल्यानंतर लगेच प्रवाही पद्धतीने सिंचन केले जाते. पुढे वाफसा पाहून प्रवाही पद्धतीने गरजेनुसार ४ ते ५ पाळ्या दिल्या जातात. या पिकामध्ये मुळे हे जमिनीत वाढत असल्याने माती भुसभुशीत राहणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे पाणीही अत्यंत काटेकोरपणे देणे गरजेचे असते. पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार आणि जमिनीच्या वाफसा टिकवून ठेवण्याइतपत पाणी दिले जाते. त्यामुळे कंदाची चांगली वाढ होते. निंदणी करून पीक तणरहित ठेवले जाते.

खत नियोजन :

मुळा लागवडी पश्‍चात पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे रंग, आकार यासंबंधी चांगले परिणाम मिळतात. लागवड केल्यानंतर पिकाच्या वाढीसाठी १५ दिवसांनंतर २४:२४:० ही पहिल्या टप्प्यात मात्रा दिली जाते. त्यानंतर ३० दिवसांचे लागवड झाल्यानंतर जोमदार वाढ व कंद आकार येण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १८:४६:०, तर तिसऱ्या टप्प्यात गरजेनुसार १०:२६:२६ या प्रमाणे पिकाच्या पोषणासाठी खतांचे व्यवस्थापन केले जाते. पोषण व वाढीसाठी चांगल्या दर्जाच्या समुद्री शैवालाचा वापर केला जातो.

कीड नियंत्रण :

लागवडीनंतर १२ दिवसांत कीडनाशकांची पहिली आळवणी केली जाते. त्यानंतर १७ व्या व २५ व्या दिवशी आंतरप्रवाही कीटकनाशकांची शिफारशीनुसार फवारणी केली जाते. त्यापुढे कोणतीही आंतरप्रवाही कीडनाशकाची फवारणी शक्यतो टाळली जाते. या नियोजनामुळे रासायनिक अवशेष काढणीदरम्यान येत नाहीत. जमिनीतून येणाऱ्या किडी, वायर वर्म आणि हुमणी यांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवले जाते.

आवश्यकतेनुसार शिफारशीत कीडनाशकाची फवारणी केली जाते. अलीकडे या दोन्ही हानिकारक घटकांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त सूत्रकृमींचाही वापर किरण करू लागले आहेत. पाने खाणारी अळी, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार फवारण्या घेतल्या जातात. बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर शिफारशीनुसार केला जातो. या रोगांचा प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी प्रामुख्याने पिकांची योग्य फेरपालट महत्त्वाची ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे एकाच शेतात सलग एका लागवड केली जात नाही.

काढणी व विक्री :

४५ दिवसांनंतर साधारणतः दोन टप्प्यांत काढणी केली जाते. पहिल्या काढणीवेळी मुळ्यांचा आकार पाहून काढले जातात. मुळे उपटताना ते तुटणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. उपटलेले मुळे पाल्यासह गोळा करून त्यास असलेली चिखल वा माती स्वच्छ करण्यासाठी एका ठिकाणी जमा केले जातात. त्यासाठी शेतालगत तयार केलेल्या पाण्याच्या कुंडीमध्ये मजुरांकडून स्वच्छ धुतले जातात.

या वेळीच डाग, वेडवाकडे, किंवा रोग- किडींचा प्रादुर्भाव असलेला मुळे वेगळे केले जातात. पुढे त्यांचा आकारानुसार वर्गीकरण केले जाते. एका गटातील ८ मुळ्यांची जुडी बांधली जाते. या प्रतवारीमुळे बाजारात आपला माल एकसारखा व उठून दिसतो. त्याला दर चांगले मिळण्यास मदत होते. नाशिक रोड, नाशिक, देवळाली या बाजारांत मुळ्यांची विक्री केली जाते.

संपर्क : किरण पाळदे, ९४०४५००५५१

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन

Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य

BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी

Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

SCROLL FOR NEXT