
Kolhapur News : कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर आवक होणाऱ्या कोबीमुळे शिरोळ तालुक्यातील कोबीचा दर पडला आहे. एका कोबीचा उत्पादन खर्च पाच रुपये असताना दर चार रुपये मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अंदरबट्ट्यात आला आहे. दरम्यान तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी दर नसल्याने कोबी शेतातच गाडला आहे. तर अन्य कोबी उत्पादक शेतकरी कोबी शेतातून काढावा की गाडावा या विवंचनेत आहेत.
कोबी उत्पादक शेतकरी उत्पादनाला सुरुवात झाल्यापासून आर्थिक विवंचनेत आहेत. कोबीला चार पैसे चांगला भाव येईल या आशेने भरमसाट पैसे खर्च केले. मशागत, लावण, औषधे, पाणी, मजुरी, हमाली अशा अनेक टप्प्यांवर पैसे खर्च करूनदेखील शेतकऱ्यांच्या पदरात म्हणावा सादर पडला नाही.
शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कोबी काढण्याचा दरदेखील परवडत नसल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोबी शेतातच गाडला आहे. कोबीच्या एक गाड्याचा उत्पादन खर्च सरासरी पाच रुपये येतो तर सध्या चार रुपये दर मिळत असल्याने एक रुपये तोट्यातील व्यवहार शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
कर्नाटक सीमा भागातून मोठ्या प्रमाणावर कोबी शिरोळ तालुक्याच्या बाजारात दाखल होत आहे. याचाच परिणाम तालुक्यातील कोबीचा दर पडला आहे. कोबीच्या लागवडीपासूनच ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम पिकावर झाला होता. अशा स्थितीत पिके जगण्यासाठी खर्चिक कीटकनाशक फवारणी करावी लागली होती. करपा, कीड, बुरशी रोगाचा मोठा धोका पिकाला होता. यातूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचवले.
मात्र भावच नसल्याने कोबी काढावा की शेतात गाडावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. उत्पादन खर्च दूरच कोबी काढून मार्केटला नेण्याइतकाही दरही नसल्याने शेतकऱ्यांची ही द्विधा मनःस्थिती झाली आहे. यातूनच अनेक शेतकऱ्यांनी कोबी गाडून टाकला आहे. करपा रोगाने एकदा का कोबीच्या प्लॉटमध्ये शिरकाव केला तर त्याला वेळीच रोखणे गरजेचे असते.
अन्यथा पूर्ण प्लॉट रोगाला बळी पडतो, अशा स्थितीतूनही शेतकऱ्यांनी कोबी पीक सावरले होते. कोबीला एकरी सुमारे दीड लाख रुपये उत्पादन खर्च आहे. जवळपास ४० हजार रोपे एकरात बसतात. एक रुपयाचे रोप, पाच रुपये उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कोबी पीक परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.