Tomato Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Crop Disease : टोमॅटो पिकातील ‘जिवाणूजन्य मर’

Team Agrowon

Bacterial Death Disease : महाराष्ट्रामध्ये टॉमॅटो हे महत्त्वाचे फळभाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. राज्यात प्रामुख्याने नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांत टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणत होते. टॉमॅटो पिकामध्ये मुख्यत: मर, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जिवाणूजन्य करपा या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव सर्वच भागात दिसून येतो. यासह सध्या जिवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव बहुतांशी भागांत दिसून येत आहे.

आज आपण टॉमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची माहिती घेऊया. हा रोग प्रामुख्याने शेंड्याकडे दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने, फांद्या सुकतात. टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.

या रोगाचा नमुना आम्हाला मडके जांब (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथून मिळाला होता. तसेच नंतर आंबे दिंडोरी (ता. दिंडोरी) व पिंपळद (ता. निफाड) या ठिकाणी देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला.

लक्षणे :

प्रथम लागवडीतील काही झाडांच्या नवीन फांद्या अचानक शेंड्याकडून सुकलेल्या दिसू लागतात. त्यानंतर लगेचच एक ते दोन दिवसांत संपूर्ण झाड सुकलेले व पिवळे दिसते. कालांतराने झाड मरून जाते.

झाडाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगांचे अनेक उंचवटे दिसतात. झाडाला जमिनीजवळ वरच्या बाजूला अनेक मुळे फुटलेली दिसतात. जमिनीमधील मुळे सडलेली दिसतात. खोड आतील भागामध्ये सडलेले तपकिरी रंगाचे दिसते.

रोगाची माहिती :

रोगाचे कारण : जिवाणूंच्या (Bacteria) प्रादुर्भावामुळे होतो.

रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूचे शास्त्रीय नाव ः रालस्टोनिया सोलानासिरम (Ralstonia solanacearum) असे आहे.

नुकसान : या रोगामुळे साधारणतः ९० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

अन्य यजमान पिके ः जवळपास २०० हून अधिक वनस्पतीवर हा रोग आढळून येतो. जसे की बटाटा, वांगी, मिरची, तंबाखू, झेंडू, सूर्यफूल, झेनिया इत्यादी.

अनुकूल हवामान :

या रोगाचे जिवाणू जमिनीमध्ये असतात. मुरमाची, हलक्या जमिनीत ८५ ते ९० टक्के आद्रता व २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व जमिनीमध्ये खूप ओलावा असेल तर या रोगाची लागण होते.

मुळांना कीटक, सूत्रकृमींनी केलेल्या जखमा किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या जखमेतून रोगाचे जिवाणू आत प्रवेश करतात. आणि पाणी वहन करणाऱ्या झायलम पेशीमध्ये वाढतात. त्यामुळे वरच्या बाजूला पाणी वहन करण्याची क्रिया थांबते. पाण्याच्या कमतरतेने झाड सुकायला लागते.

रोगनिश्‍चिती कशी करता येते :

पाण्यामध्ये जिवाणू बाहेर पडून वाहण्याची प्रक्रिया (उझिंग आऊट) दिसत असेल तर या रोगाची निश्‍चिती करता येते. त्यासाठी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या खोडाचा काप घेऊन तो पाण्यामध्ये पकडला तर खोडामधील जिवाणू पाण्यामध्ये दुधाप्रमाणे खाली येताना दिसतात.

नियंत्रणाचे उपाय :

हा रोग नियंत्रणात येणे अतिशय अवघड असते. त्यामुळे लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षम जातींची निवड करणे अत्यंत आवश्यक असते.

दोन ओळींतील अंतर जास्त ठेवावे.

शेतामध्ये वाफसा स्थिती चांगल्या प्रकारे ठेवावी.

पीक फेरपालट करावी. दुसरे किंवा आधीचे पीक हे सोलानासी वर्गीय नसावे. जसे की वांगी, मिरची, बटाटा इ.

रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या जमिनीत पुन्हा ३ वर्षे या पिकाची लागवड करणे टाळावे.

संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेली झाडे लगेच उपटून शेताबाहेर जाळून नष्ट करावीत.

उपटून काढलेल्या रोगग्रस्त झाडाच्या जवळची काही मातीदेखील अलगदपणे काढून शेताबाहेर नेऊन टाकावी.

रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT