Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

Karpa Disease : टॉमॅटो पिकामध्ये मुख्यत: मर, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जिवाणूजन्य करपा या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
Tomato Disease
Tomato DiseaseAgrowon

राहुल वडघुले

Tomato Crop Disease Control : महाराष्ट्रात टॉमॅटो या फळभाजी पिकाची मोठ्या क्षेत्रात लागवड होते. प्रामुख्याने नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांत टोमॅटो खालील क्षेत्र जास्त असते. टॉमॅटो पिकामध्ये मुख्यत: मर, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जिवाणूजन्य करपा या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

या बरोबरच सध्या जीवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच भागात दिसून येत आहे. टॉमॅटो पिकातील लवकर येणारा करपा या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाने, फळे आणि फांद्यांवर दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने, फांद्या सुकतात. या रोगामुळे टॉमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

या रोगाचा नमुना आम्हाला वडाळीभोई (ता. चांदवड, जि. नाशिक) येथून मिळाला होता. डोळ्याना दिसणारी लक्षणे व सूक्ष्मदर्शकाखाली नमुन्याची तपासणी केली असता सदर रोग हा लवकर येणारा करपा असल्याचे स्पष्ट झाले.

Tomato Disease
Tomato Disease : टोमॅटो पिकातील रोग व्यवस्थापन

लक्षणे

प्रथम खालील जुन्या पानांवर रोगाची लक्षणे दिसतात.

पानांवर सुरुवातीला तुरळक तपकिरी ठिपके पडतात. त्यानंतर हे ठिपके मोठे होऊन एकमेकांमध्ये मिसळतात. ठिपके अर्धा इंच वाढू शकतात. हे ठिपके अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात. ठिपके जवळून पाहिले असता एकमेकांभोवती पडलेल्या वर्तुळाप्रमाणे हे दिसतात. यालाच इंग्लिशमध्ये concentric rings असे म्हणतात.

नवीन पानांवर देखील ठिपके दिसून येण्यास सुरुवात होते. हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते व गळून पडते.

याचा परिणाम फळांच्या पोषणावर व संरक्षणावर होतो.

रोगाची लक्षणे फळांवर देखील दिसतात. देठाजवळील भाग काळा पडतो, त्यात देखील वर्तुळे दिसतात.

खोडावर फांदी असलेल्या ठिकाणी देखील रोगाची लक्षणे दिसतात.

लवकर येणारा करपा रोगाची माहिती

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव : अल्टरनेरिया सोलानी (Alternaria solani) असे आहे.

आढळ : हा रोग देशातील सर्व टॉमॅटो उत्पादक राज्यांमध्ये आढळून येतो. यात महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाना, जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

नुकसान : रोगामुळे सुमारे ७० ते १०० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते.

अन्य यजमान पिके ः कांदा, बटाटा, वांगी, मिरची.

अनुकूल हवामान

या रोगाचे बीजाणू जमिनीमध्ये, शेतातील पिकांचे जुने अवशेष यावर जिवंत राहतात. हे बीजाणू जमिनीमध्ये अनेक दशकांपर्यंत जिवंत राहू शकतात.

साधारण ८५ ते ९० टक्के आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात रोगाची लागण होते. अशा वातावरणात अगदी २ तासांत बीजाणू अंकुरित होतात. आणि पुढील १२ तासांत रोगाचा पानांच्या आतील भागात प्रादुर्भाव होतो. त्यानंतर २ ते ४ दिवसांनी रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.

२५ अंश सेल्सिअस तापमानात जर वातावरणात आर्द्रता, धुके, पाऊस अशी हवामान स्थिती असल्यास पुन्हा रोगाचे नवीन बीजाणू तयार होतात.

Tomato Disease
Tomato Crop Disease : टोमॅटो पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक

नियंत्रणाचे उपाय

लागवडीवेळी दोन ओळींतील अंतर जास्त ठेवावे.

शेतामध्ये हवा खेळती असावी. जेणेकरून रोगाचे ‘इनोकुलम’ जास्त प्रमाणात शेतात राहणार नाही. तसेच पाने ओली राहणार नाहीत.

पीक फेरपालट करावी. टोमॅटो लागवडीनंतर किंवा त्याआधी वांगी, मिरची, बटाटा इत्यादी पिके घेऊ नयेत.

झाडांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी. खालील बाजूच्या २ ते ३ पानांच्या फांद्या काढून टाकाव्यात.

रोगाची लक्षणे दिसून येणारी पाने त्वरित तोडून नष्ट करावीत.

शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

शिफारस केलेल्या खालीलपैकी बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापर करावा.

शिफारस केलेली बुरशीनाशके (लेबलक्लेम युक्त)

कॅप्टन (५० टक्के डब्ल्यूपी)

कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी)

किटाझीन (४८ टक्के ईसी)

मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूजी)

मेटिराम (७० टक्के डब्ल्यूजी)

पारायरॅक्लोस्ट्रोबीन (२० टक्के डब्ल्यूजी)

अॅझॉक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे वेगवेगळे भाग अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्चिती करू शकतो.यामध्ये रोगाचे तंतू (Filament) लांब धाग्याप्रमाणे दिसून येतात. या तंतूवर काळसर रंगाचा छोटासा बीजाणू कोषदंड (Conidiophore) असतो. या कोषदंडावर लंब गोलाकार व कप्पे कप्पे असलेले बीजाणू (Conidia) असतात. हे या बुरशीचे अलैंगिक बीजाणू असतात. हे बीजाणू पुढील रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com