Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : बदलत्या हवामानात संवर्धित शेती उत्तमच

१९६० मध्ये ‘बिना मशागत शेती’ यावर अमेरिकेत संशोधन सुरू झाले. १९७० मध्ये ही संकल्पना ब्राझील मध्ये पोहोचली. त्यावर शेतकरी व शात्रज्ञांनी संशोधन केले व ‘संवर्धित शेती’ ही नवीन शेतीची पद्धत विकसित झाली. पुढे ‘एफएओ’ने त्याचा पुरस्कार केला.

Team Agrowon

भा रतात ५५ टक्के तर महाराष्ट्रात ८० टक्के पिकाखालील (Crop) क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. अन्न सुरक्षेच्या दृष्टीने देशासाठी कोरडवाहू शेती अत्यंत महत्त्वाची असून ४० टक्के अन्न उत्पादन (Food Production) याच शेतीतून होते. त्यात ८५ टक्के तृणधान्य, ८३ टक्के कडधान्य, ७० टक्के तेलबिया (Oilseeds) यांचा समावेश आहे.

कोरडवाहू शेतीवर देशातील दोन तृतीयांश पशू व ४० टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणावर या शेतीचे भवितव्य अवलंबून असल्याने पिकांची उत्पादकता घटते व विशेषतः लहान शेतकरी अडचणीत येतो. शेतीची उत्पादकता मागील तीन दशकांपासून गोठत चालली आहे. यामागची महत्त्वाची कारणे म्हणजे हवामान बदलाचे परिणाम, खालावलेले मातीचे आरोग्य व एकाच पिकाची सतत लागवड हे आहेत.

हवामान बदलाचे शेतीवरील प्रतिकूल परिणाम आज आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. ढगफुटी, अतिवृष्टी, थंडीची लाट, उष्णतेची लाट, बर्फाचे वादळ हे शब्दप्रयोग आता नित्याचेच कानावर पडतात. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व नुकसान भरपाईची मागणी ही नियमित होताना दिसते.

हवामान बदलावर मात करून पीक उत्पादनामध्ये स्थैर्य आणण्यासाठी नवनवीन प्रयोग चालू आहेत. नैसर्गिक संसाधनाचे (माती व पाणी) संवर्धन करून प्रतिहेक्टरी पिकांची उत्पादकता वाढवणे हा भविष्यातील शेतीच्या स्थैर्यासाठी अतिमहत्त्वाचा घटक आहे. उत्पादकता वाढीसाठी नवनवीन शेतीच्या पद्धती विकसित होत आहेत.

निविष्ठांचा कार्यक्षम वापर वाढवून उत्पादकता वाढीसाठी ‘काटेकोर शेती’, सूक्ष्म हवामान नियंत्रित करून प्रति एकक उत्पादकता वाढीसाठी ‘संरक्षित शेती’ किंवा हरितगृहातील शेती, मातीतील उपयोगी सूक्ष्म जिवाणू व जंतू संवर्धित करून उत्पादकता स्थिर करण्यासाठी ‘जैविक शेती’ अथवा ‘नैसर्गिक शेती’ असे अनेक प्रकार सध्या चर्चेत आहेत. हवामान बदलावर मात करण्यासाठी मृदा व जल संवर्धन करून उत्पादकता वाढविण्यासाठी ‘संवर्धित शेती’ हा एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नैसर्गिक संसाधन विभागातर्फे मागील दीड दशकापासून यावर संशोधन सुरू असून याचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) अंतर्गत मराठवाडा व विदर्भात यशस्वी प्रयोग सुरू आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील काही प्रगतिशील व तज्ञ शेतकरी चन्द्रशेखर भडसावळे यांचे ‘एसआरटी तंत्रज्ञान’ व प्रतापराव चिपळूणकर यांचे ‘जैविक शेतीचे’ प्रयोग संवर्धित शेतीचाच एक भाग आहेत.

आज ‘जागतिक अन्न व शेती संघटना’ (एफएओ) यांच्या आकडेवारीनुसार जगभरात १५७ दशलक्ष हेक्टर क्षेत्र संवर्धित शेतीखाली आले आहे. भारतात याची वाटचाल संथ गतीने चालू असून साधारणतः तीन दशलक्ष हेक्टर क्षेत्र संवर्धित शेती खाली आले आहे. हरित क्रांतीनंतर सघन पीक पद्धती (Intensive cropping) होत असल्याने त्यासाठी रासायनिक निविष्ठांचा अतिवापर व गरजेपेक्षा जास्त मशागत यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भारतात मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मागील ७० वर्षात १ टक्के वरून ०.३ टक्के इतके कमी झाले असून ही धोक्याची घंटा आहे. त्याचे उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम तर दिसून येत आहेतच पण यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाही तर शेतीचे वाळवंटीकरण होण्याकडे वाटचाल सुरू राहील.

अतिमशागतीमुळे व रसायनाच्या अतिवापरामुळे मातीतील जैविक संपदा नष्ट होत आहे व त्याचाही उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम होत आहे. मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक आरोग्य संवर्धन करण्यासाठी ‘संवर्धित शेती’ ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. हवामान बदलावर मात करण्याची ताकद या पद्धतीमध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वच पिकांसाठी व विशेषतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ७८ टक्के शेतीत याची विशेष उपयुक्तता आहे.

संवर्धित शेतीची पार्श्वभूमी

अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात १९३० मध्ये मोठे धुळीचे वादळ आले. त्यामुळे सुपीक माती उडून गेल्याने ९१ दशलक्ष हेक्टर जमीन खराब झाली. मोठे यंत्र वापरून खूप खोल व गरजेपेक्षा जास्त मशागत केल्याने हे नुकसान झाले, असा निष्कर्ष पुढे आला. मशागत कमी करून मातीचा पृष्ठभाग आच्छादित करणे हा पर्याय माती संवर्धनासाठी संशोधनातून पुढे आला. याला ‘संवर्धित मशागत’ असे संबोधले जाऊ लागले.

पुढे १९४० मध्ये अमेरिकेत मशागत न करता डायरेक्ट पेरणी करण्यासाठी यंत्र विकसित झाले व त्याचा वापर सुरू झाला. १९४५ साली एडवर्ड फौल्कनर यांनी ‘प्लौमन्स फोली’ (Ploughmans folly) हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात नांगर हा शेतीचा दुश्मन आहे व ‘मशागतीशिवाय शेती’ हा विषय त्यांनी प्रामुख्याने मांडला.

१९६० मध्ये ‘बिना मशागत शेती’ (नो टिलेज) यावर अमेरिकेत संशोधन सुरू झाले. त्यानंतर १९७० मध्ये ही संकल्पना ब्राझील मध्ये पोहोचली. त्यावर शेतकरी व शास्त्रज्ञ यांनी मिळून संशोधन केले व ‘संवर्धित शेती’ ही नवीन शेतीची पद्धत विकसित झाली. पुढे ‘जागतिक शेती व अन्न संघटनेने’ त्याचा पुरस्कार केला व जगभरात ही पद्धत अवलंबली जावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

संवर्धित शेतीचा प्रसार

१९९० नंतर ‘संवर्धित शेती’ ही संकल्पना जगातील इतर देशात पसरण्यास सुरुवात झाली. या काळात नवीन प्रकारच्या शेतीसाठी लागणारे यंत्र, अवजारे विकसित झाली व यास जगभरात चांगला प्रतिसाद मिळू लागला. आफ्रिकेत झांबिया, टांझानिया, केनिया व आशिया खंडात चीन व कझाकीस्थान या देशांत याचा अवलंब वाढला. यानंतर एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत ‘संवर्धित मशागत’ यावर अधिक संशोधन झाले व कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्पेन, फिनलंड या देशात याचा प्रसार सुरू झाला.

आज जगातील बहुतांशी देशात ही संकल्पना पोहोचली असून त्यावर संशोधन व प्रसार होत आहे. भारताने २००९ मध्ये चौथ्या जागतिक ‘संवर्धित शेती’ परिषदेचे यजमानपद स्वीकारले व त्यांनंतर संशोधनाला सुरुवात झाली. याचाच भाग म्हणून हरित क्रांती प्रदेशात भात-गहू पीक पद्धतीमध्ये शून्य मशागत पेरणी यंत्र, लेजर लेवलर, हॅप्पी सिडर हे यंत्र वापरास सुरुवात झाली.

(लेखक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

संवर्धित शेतीचा जागतिक प्रसार

विभाग क्षेत्र (दशलक्ष हेक्टर)

दक्षिण अमेरिका ६६.४

उत्तर अमेरिका ५४.

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड १७.९

आशिया १०.३

रशिया व युक्रेन ५.२

युरोप २.०

आफ्रिका १.२

एकूण १५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT