Pune News : मराठवाड्यातील पाणी टंचाई भीषण बनली असून अजून मान्सूनच्या आगमनाला अवकाश आहे. यादरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीवसह लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर जलसंपदा विभागाच्या बुधवार (ता.२२) च्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील ४४ धरणांमध्ये सध्या फक्त १०.०८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ४२.८१ टक्के होता. पण गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस आणि यंदा पडलेला दुष्काळ यामुळे धरणांनी लवकर तळ गाठला आहे.
राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली असून १३८ मोठ्या धरणांमध्ये फक्त २१.६३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जो गतवर्षी ३१.७५ टक्के होता. तसेच २६० मध्यम प्रकल्पात देखील पाणीसाठा घटत चालला असून तो ३३.६८ टक्क्यांवर आला आहे. तर एकूण २५९६ लघू प्रकल्पात फक्त २६.८३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून राज्याच्या एकूण २९९४ धरणांमध्ये आज फक्त २४.०३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी ३४.३६ टक्क्यांवर होता.
मात्र यंदा वाढलेल्या उष्णतेच्या झळांमुळे सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला असून येथे फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर आठ जिल्ह्यातील तब्बल १,७३४ गाव-वाड्या तहानलेल्या असून १८१२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक भीषण पाणी टंचाई असून येथील ४३० गावे आणि ६५ वाड्यावस्त्यांना ६९८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीनगर शहराला ५ ते ६ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासियांमध्ये नाराजी आहे. तर येथे आता उजनी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या १२०० मिलीमिटर व्यासाच्या जलवाहिनीला गळतीही लागल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. तसेच येथे आता टँकरचे दरही भडकल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसली आहे. येथे २ हजार लिटर टँकरला ७०० रूपये आणि ५ हजार लिटरसाठी १ हजार रूपये मोजावे लागत आहेत.
बीड जिल्ह्यात पाण्यासाठी पायपीट
बीड जिल्ह्यात देखील सर्वसामान्यांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. येथील ३५० गावे आणि ३२८ वाड्यावस्त्यांवर २ सरकारी आणि ४३२ खासजी अशा ४३४ टँकरने पाणी द्यावे लागत आहे.
जालना आणि लातूरमध्ये टँकर
जालन्यात देखील गंभीर स्थिती असून येथील ३३३ गावे ८१ वाड्यावस्त्यावर १४ सरकारी आणि ४८१ खासजी असे ४९५ टँकर फिरवले जात आहेत. धारागशीवमध्ये सध्या ९२ गावांना १३४ टँकर लागत असून लातूरमध्ये २१ टँकर फिरवले जात आहेत. येथील १८ गावे आणि ४ वाड्यावस्त्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे.
धरणातील पाण्याची स्थिती
यादरम्यान लातूर, धाराशिव आणि परभणीतील धरणांमध्ये सध्या ८ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून जायकवाडीचा पाणीसाठा चिंता वाढणारा आहे. जायकवाडीतील पाणीसाठा ६ टक्क्यांच्या खाली आला आहे. तर गत वर्षी ३६ टक्के पाणीसाठा असणाऱ्या बीडमधील माजलगाव धरणाने तळ गाठला आहे. मांजरा धरणात तर फक्त १ टक्केच जलसाठा शिल्लक असून तो गेल्या वर्षी ४२ टक्क्यांवर होता. अहमदनगरमध्ये देखील असेच चित्र असून येथील मुळा, भंडरदरा आणि निळवंडे धरणात कमालीची घट झाली आहे. मुळा धरणात १०.५, भंडरदरामध्ये १५ आणि निळवंडेतील पाणीसाठा १४ टक्क्यांवर आला आहे.
खडकपूर्णा धरणाने तळ गाठला
तर बुलढाण्याची तहान भागवणाऱ्या खडकपूर्णा धरणाने तळ गाठला असून नळगंगात २५.५ आणि पेनटाकळीत १४ टक्के जलसाठा उरलेला आहे.
हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई
हिंगोलीत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असतानाच टँकरच्या रांगेत देखील तासंतास थांबावे लागत आहे. येथे अनेक गावांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा जात असला तरी सरकारी दरबारी टँकरची नोंदच नाही. येथील लक्ष्मण नाईक, काळीपाणी, सेवादास, पवार अशा तांड्यांवर पाणी पोहचलेलेच नाही. यामुळे येथील महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई पाहता ४१ अधिक ठिकाणी बोअरवेल आणि विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.