Assam Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Assam आसाम: उपनद्यांचे पूरही ठरताहेत धोकादायक

आसामचे सरासरी तापमान (Average Temperature) प्रतिवर्षी १.७ ते २.२ अंश सेल्सिअसने वाढत आहे. पाऊस सरासरीने कमी होणार असला, तरी ढगफुटीचे प्रकार जास्त वाढतील. ब्रह्मपुत्रा, बराक आणि त्यांच्या उपनद्यांच्या महापुरात (Flood)वाढ होऊ शकते. आसामचा खरीप हंगामच धोक्यात येऊन स्थानिक आदिवासींच्या अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो.

Team Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

जूनच्या चौथ्या आठवड्यापर्यंत पूर्ण देश (तळकोकणाचा अपवाद वगळता) मॉन्सूनच्या पहिल्या मनमोकळ्या दमदार सरींच्या आगमनासाठी व्याकूळ झाला आहे. या स्थितीत आज संपूर्ण आसामच (Assam) पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. हे का होत असावे, जाणून घेण्यासाठी आपण आसामने केंद्र शासनाला सादर केलेला वातावरण बदल अहवाल पाहू.

इंग्लंडच्या ‘ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंट’ या संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या या अहवालाचा कालावधी २०१५ ते २०२० हा आहे. त्यानुसार आसामचे (Assam) सरासरी तापमान प्रतिवर्षी १.७ ते २.२ अंश सेल्सिअसने वाढत आहे, तर पाऊस सरासरीने कमी होत आहे. मात्र ढगफुटीचे प्रकार जास्त वाढण्याचा धोका आहे. विशेषतः भूतानलगतच्या जिल्ह्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

ब्रह्मपुत्रा, बराक आणि त्यांच्या उपनद्यांना महापुराचे प्रमाण वाढू शकते. त्यातून आसामचा खरीप हंगामच धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे स्थानिक आदिवासींसाठी अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो. जागतिक तापमान वाढीच्या (Global Warming) समस्येमुळे आसामच्या भात आणि चहा मळ्यावरही परिणाम अपेक्षित आहे.

या अहवालामध्ये सुचविलेल्या काही उपाययोजना निश्चितच चांगल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या उपाययोजना :

१. शासनाच्या मोकळ्या जमिनी म्हणजेच गायरानावर मोठ्या प्रमाणावर चारा निर्मिती करणे.

२. डोंगर उतारावरील मातीची धूप कमी करण्यासाठी तेथेही वृक्षांऐवजी विविध गवताच्या प्रजाती लावणे.

३. जंगलामधील मोकळ्या जागेवर आदिवासींच्या सहकार्याने स्थानिक वृक्षांची लागवड करणे.

४. पुराला सामोरे जाणारी भाताची वाणे विकसित करणे.

५. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांमधील जलवाहतुकीस प्रोत्साहन देणे. त्यातून रस्ते वाहतुकीतून होणारे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे.

६. बांबू लागवडीस प्रोत्साहन.

७. ‘जूम’ (Jhum) पद्धतीवर बंदी घालणे.

८. ‘जूम’ भागाची पाहणी करून त्या ठिकाणी आदिवासींच्या विचाराने योग्य त्या वृक्षांची, फळ झाडे, बांबू, औषधी वनस्पतींची लागवड करणे. त्यांच्या खरेदीसाठी योजना राबवणे.

९. पूर्ण वाढलेल्या वृक्ष अवैध तस्करी रोखणे.

१०. चहाच्या मळ्यांचे आक्रमण थांबवणे.

११. उघडे पडलेले डोंगर, पर्वतांचे वरील भाग वृक्ष लागवडीने भरून टाकणे.

१२. जास्तीत जास्त शेत तळ्यांची निर्मिती करून, त्यात मत्स्य पालनास प्रोत्साहन.

१३. नद्यांमधील अवैध मासेमारी पद्धतींना पूर्ण बंदी.

१४. वातावरण बदल आणि वाढत्या तापमानाचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून शासनातर्फे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचे गोठे आणि चारा व्यवस्थापनामध्ये मदत करणे.

१५. २०५० पर्यंत चहा उत्पादनात ४० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे क्षेत्र टिकून राहावे, या उद्देशाने लहान उत्पादकांना आर्थिक सवलती, ठिबक सिंचन, नॅनो युरिया यासाठी विशेष मदत.

१६. फळ उत्पादनास विशेष सवलती. आसाम हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथे तब्बल २० प्रकारच्या केळी जातींचे उत्पादन होते. या वाणांच्या जपणुकीसाठी शासनाचे विशेष लक्ष आहे. तसेच केळी प्रक्रियेसाठी गरीब शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करणे. आसाममधील गोपालपुरा जिल्ह्यामधील दारानगिरी (Darrangiri) ही आशिया खंडातील मोठी केळीची बाजारपेठ आहे.

मॉन्सूनचा पहिलाच पाऊस ठरतोय धोकादायक

उत्तर आसामसाठी २४ जूनची रात्र काळरात्रच ठरावी. २५ तारखेच्या सकाळीच या भागामधील डारंग (Darrang) जिल्ह्यामधील सर्व शेती, गावे, घरे पुरुषभर पाण्याखाली गेली होती. अहवालानुसार हा जिल्हा यापुढे वातावरण बदलास जास्त संवेदनशील असणार आहे. याच जिल्ह्यात भूतानमधून येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या अनेक उपनद्या वाहत असतात. स्थानिक म्हणतात, ‘‘पहिल्या पावसात या नद्यांच्या पात्रात पावसाचे पाणी जिरून त्या वाहत्या होतात, पण गेल्या अनेक वर्षांत त्यांचे असे उग्ररूप आम्ही पाहिले नव्हते.

सर्वच पाण्यात वाहून गेले. आतापर्यंत या भागात फक्त ब्रह्मपुत्रेचा (Bramhaputra) अथांग पूर पाहिला असला तरी उपनद्यांना एवढा पूर कधी पाहिला नव्हता. आज या राज्यामधील ३२ जिल्ह्यामधील साडेतीन दशलक्ष लोकांना याची झळ बसली आहे. १९ जून रोजी ५३ मिमी पाऊस पडला. पुढील १२ दिवसांत ते प्रमाण ५२९ मिमीवर पोहोचले म्हणजे १०९ टक्के पाऊस झाला. जगामधील सर्वांत जास्त ओल्या मानल्या जाणाऱ्या शेजारच्या मेघालयात हाच पाऊस १२१६ मिमी (म्हणजे १८५ पट जास्त) होता.

आसामच्या वातावरण बदलाच्या (Climate Change) अहवालानुसार, यापुढे पहिला पाऊसच शेत आणि शेतकरी यांच्या मुळावर उठणार आहे. म्हणूनच या काळात शेतकरी, त्यांची पाळीव जनावरे, चारा आणि धान्य, बी बियाणे यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे, की बर्फ वितळत असल्यामुळे भूतान या राष्ट्रामधील शेकडो बर्फाचे कालवे जागृत होत आहेत. भविष्यात ते फुटून नद्यांमध्ये मिसळले जातील.

त्याचा परिणाम भूतानमधून वाहणाऱ्या आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रेस मिळणाऱ्या नद्यांवर (Rivers) होणार आहे. आताही तसेच घडत आहे. या सर्वांची माहिती असूनही आसामचे सरकार सावध झाले नाही. उपग्रहाची छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासामधून ही सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्यानुसार वेळीच निर्णय झाले असते तर कोट्यवधी रुपयांची हानी व शंभरापेक्षा अधिक सामान्यांचा जीव तरी वाचला असता.

वेळीच तात्पुरत्या स्थलांतराचा पर्याय

भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणतात, की यापुढे बंगालच्या उपसागरावर मॉन्सूनच्या ढगांची प्रचंड गर्दी होणार आहे. यास कारण ठरणार वैश्‍विक उष्णतेमुळे तापलेला तो उपसागर, त्याच्या पाण्याची झालेली वाफ आणि त्यातून झालेली ढग निर्मिती. वाऱ्यांचा प्रवाह याच ढगांना सोबत घेत उत्तरपूर्व राज्याबरोबरच बांगलादेशालाही झोडपून काढत आहे. पहिल्या मॉन्सूनच्या (Monsoon) येणाऱ्या या धुवाधार पावसापासून राज्याचे रक्षण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने पूर नियंत्रण करणारे तटबंद जवळपास २० जिल्ह्यामध्ये बांधले होते.

त्यांची संख्या २९७ होती. त्यापैकी ३३ एकट्या डारंग जिल्ह्यामध्ये होती. ते सर्व वाहून गेले. भविष्यात या राज्यावर अशा तटबंधी असाव्यात का, याचाही विचार करावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. तिबेटचे बर्फाच्छादित पठार, त्यास जोडलेला भूतान, हिमालयाची सावली आणि या सर्वांवर होणारा वैश्‍विक उष्णतामानाचा परिणाम यातून आसामची सुटका नाही. पूर आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाला कामाला लावण्यापेक्षा उन्हाळ्यामध्येच या पुराचा संभाव्य धोका ओळखण्याची गरज आहे. आवश्यक तिथे शेतकऱ्यांचे तात्पुरते स्थलांतर केल्यास जीवितहानी तरी वाचू शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT