Ajara Ghansal Rice  Agrowon
ॲग्रो विशेष

Ajara Ghansal Rice : आशीष नेहराही `आजरा घनसाळ`चा फॅन

टीम ॲग्रोवन

भारतीय क्रिकेटमधील सगळ्यात भारी माणूस म्हणजे आशीष नेहरा (Ashish Nehra). त्याच्या साधेपणामुळे सगळे त्याला गंमतीने नेहराजी म्हणतात. ना लॅपटॉप ना प्लॅनिंग, फक्त नारळपाणी पिऊन गड्याने गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) आयपीएल जिंकून दिलं. असे हे साधेसुधे नेहराजी गोव्याला जात असताना वाट वाकडी करून आजऱ्याला थांबले होते. कशाला ? तर नेहराजी आपल्या आजरा घनसाळ तांदळाचे फॅन (Ashish Nehra Also Fan Of Ajara Ghansal Rice) आहेत. हा तांदूळ खरेदी करायला त्यांनी आजरा गाठलं होतं. खरं सांगायला गेलं तर या डोंगराळ आजऱ्याला ओळख मिळाली ती घनसाळ या तांदळामुळेच.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला वसलेला आजरा तालुका तसा बघायला गेलं तर निसर्गरम्य. पण तरीही आजरा म्हटलं की सर्वांत प्रथम आठवतो तो आजरा घनसाळ. घन म्हणजे सुवास आणि साळ म्हणजे भात अशी घनसाळची फोड सांगितली जाते.

आजरा म्हणजे कोकणाचे प्रवेशद्वार. १८६९ ला अंबोली घाटाची निर्मिती झाल्यावर कोकणात उतरणाऱ्या या मार्गाला मोठं महत्त्व प्राप्त झाले. आजरा हे व्यापाराचं महत्वाचं ठाणं बनलं. इथून कोकण व घाटाचे संबंध वाढले आणि सोबतच दृढ झाले. कोकणात बंदरावर उतरणारा माल घाट चढून आजरामार्गे देशावर जाऊ लागला तर देशावरचा माल याच मार्गे कोकणातील बंदरातून बाहेरच्या देशांत जाऊ लागला. यामुळे या तालुक्यात पिकणाऱ्या विविध सुगंधी व पौष्टिक भाताच्या जातींची ख्याती अन्य प्रांतात पसरली. आपल्या अनोख्या चवीमुळे प्रसिद्ध झालेला घनसाळ तांदूळ देश-विदेशात निर्यात होऊ लागला. घनसाळने बाजारपेठेत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. डोंगराळ आजऱ्याला घनसाळमुळे ओळख मिळाली.

आजऱ्यातला पावसाळा जोरदार असतो. चार महिने सतत पडणारा पाऊस, पोषक हवामान, दलदलीची जमीन यामुळे या तालुक्यात देशी वाणाच्या सुगंधी तांदळाची लागवड होऊ लागली. इथं देशी तांदळाच्या शेकडो जाती असल्याचे जुनी जाणती माणसं सांगतात. त्यापैकी काहींची आजही लागवड केली जाते. त्यातलाच हा घनसाळ. घनसाळची ओळख आहे ती त्याच्या वासामुळे.

पावसाच्या पाण्याने डोंगर उताराला लागून असलेल्या सपाट जमिनीवर जंगलातून कुजलेला पालापाचोळा वाहून येतो. त्यासोबत मौलिक अन्नघटकही वाहून येतात. ते तांबड्या मातीत म्हणजे जांभा खडकाच्या मातीत साचून राहतात. याचबरोबर या काळात सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून राहते. ही सगळी परिस्थिती घनसाळ तांदळासाठी पोषक आहे. आजरा तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातले घनसाळ उत्पादक शेतकरी गावात डोंगर उताराच्या खाचराच्या जमिनीत उत्पादन घेतात. या भौगोलिक रचनेमुळे भातामध्ये सुगंध वाढायला मदत होते.

घनसाळचं पीक १५० ते १५५ दिवसांच्या कालावधीत परिपक्व होते. या पिकाला सतत गारव्याची गरज असते. त्यामुळे आजरा आणि कोकण हद्दीलगतच्या गावांमध्ये हा तांदूळ पिकतो.

या तांदळाला सुगंध कशामुळे प्राप्त होतो, याबाबत अभ्यास सुरू आहे. येथील मातीत असणाऱ्या विविध मूलद्रव्यांमुळे या घनसाळला सुवास येत असावा असा अंदाज बांधला जातो. आजऱ्याच्या मातीमध्ये असणारे बुरशी व जिवाणू यांचाही यामध्ये वाटा आहे का, याचा अभ्यास सुरू आहे. घनसाळ दुसऱ्या प्रदेशात लावले तर त्याला हा विशिष्ट गंध येणार नाही. कारण आजरा परिसरातील माती, पाऊस, वातावरण वेगळं आहे. तिथं घनसाळ बहरतो, तसं दुसरीकडे होणार नाही. या तांदळाला चार वर्षांपूर्वी जी.आय. मानांकन मिळाल्यामुळे या तांदळाला ग्लॅमर मिळालंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT