Agriculture University  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : कृषी विद्यापीठे खरंच ज्ञान मंदीरे आहेत का?

Agri Education : कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी मंदिरे आहेत. या मंदिरात येण्यासाठी प्रत्येकास मुक्त दार हवे, तेही कधीही आणि केव्हाही! फक्त आरतीला मोठा घंटानाद करून जमणारी गर्दी नको.

डॉ. नागेश टेकाळे

Indian Agriculture : भारतामधील २८ राज्यांपैकी सर्वांत जास्त म्हणजे सात कृषी विद्यापीठे उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि त्याखाली नंबर येतो महाराष्ट्राचा! आज आपल्या राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. प्रत्येक कृषी विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी त्याची ध्येय आणि उद्दिष्टे जाहीर केली जातात.

या उद्दिष्टांत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे कृषी, फलोद्यान, वनशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान यांचे शिक्षण तसेच शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण बदलास अनुरूप संकरित वाण निर्मिती करणे, नवीन शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे.

विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील जंगल, परिसंस्था, जैवविविधता यांचे रक्षण, त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करणे, शेतकरी तसेच आदिवासींचे कृषी क्षेत्रामधील पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे, शासनाची शेतकरी कल्याणार्थी धोरणे प्रत्यक्ष राबवून त्यांची उपयुक्तता पटवून देणे या सर्वांबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधन करून त्यांना मार्गदर्शन करणे हा सुद्धा एक मुख्य उद्देश आहे. आता यातील किती उद्दिष्टांची पूर्तता कृषी विद्यापीठांतर्फे होते हा संशोधनाचा आणि आत्मचिंतनाचा विषय ठरावा.

कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन होते, त्यासाठी त्यांना मोठा निधीही उपलब्ध होतो पण खरंच हे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचते का? तांदूळ आणि गव्हाच्या काडाचा त्यांना जाळण्यापेक्षा त्याचा योग्य उपयोग करून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळविण्याचे तंत्रज्ञान पंजाब कृषी विद्यापीठाने पाच-सहा वर्षापूर्वीच विकसित केले पण आजही पंजाब, हरियाणात हजारो टन काड शेतकऱ्यांकडून जाळले जाते.

राजधानी दिल्ली प्रतिवर्षी काळ्या धुराने काळवंडून जाते आणि हजारो कोटी रुपयांचे नुकसान होते. संशोधनाचा उपयोग गरीब शेतकऱ्यांना होत नसेल तर असे संशोधन वाया जाते. महाराष्ट्रात हापूसचे उत्पादन यावर्षी जेमतेम १५ ते २० टक्केच झाले आहे. उत्पादन कमी म्हणून भाव जास्त त्यामुळे हापूस आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर तर आहेच पण येत्या काही वर्षांत त्याचे उत्पादन अजून घटून तो दुर्मीळ होणार की काय? याची भीती वाटत आहे.

फादर अल्फान्सो यांनी रायवळ आंब्यावर अनेक संकर करून हापूसची निर्मिती केली. पुन्हा असेच हापूससारखे नवीन वाण तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावयास हवेत.

ध्येय आणि उद्दिष्टे समोर ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पंजाब कृषी विद्यापीठ, चंद्रशेखर आझाद विद्यापीठ, राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठ, कोइम्बतूर कृषी विद्यापीठ, धारवाड कृषी विद्यापीठ यांत मला जाण्याची, तेथील काम जवळून पाहण्याची संधी मिळाली.

कृषी विद्यापीठांचे विस्तार केंद्र (विस्तार विभाग) हा त्या विद्यापीठांमधील संशोधनाचा आरसा असतो. प्रत्येक आठवड्यात या विभागात काहीतरी नवीन संशोधन कसे दाखविले जाते, हे मी टेक्सास कृषी विद्यापीठात अतिशय जवळून पाहिले. तीनशे ते चारशे किलोमीटर परिसरामधील शेतकरी विद्यापीठ आवारात प्रवेश करताच सर्व प्रथम या दालनास भेट देतात.

आपले अभिप्राय लिहितात आणि त्यांच्या अभिप्रायावर आधारित विद्यापीठ परिसरात शेतकरी मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन तर होतेच पण शास्त्रज्ञ त्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. पंजाब कृषी विद्यापीठामधील एका भाषणात नोबेल पारितोषिक विजेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी म्हटले होते की, ‘‘कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी त्यांची मंदिरे आहेत, येथे येण्यासाठी प्रत्येकास मुक्त दार हवे, तेही कधीही आणि केव्हाही! फक्त आरतीला मोठा घंटानाद करून जमणारी गर्दी नको.’’

खरंच आपली कृषी विद्यापीठे आपल्या शेतकऱ्यांसाठी ज्ञान मंदिरे आहेत का? विचार करावयास हवा. वातावरण बदलाचा प्रभाव वाढत आहे, पाऊस अनियंत्रित होत आहे, संपूर्ण उन्हाळा अकाळीच संपत आहे, जोडीला गारा त्यात भर घालत आहेत, शेतकरी उध्वस्त झाला आहे.

अशा वेळी शासानापेक्षाही कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बदलत्या हवामानाचा अभ्यास करून त्यावर थोड्याबहूत प्रमाणात का होईना मात करणाचे ज्ञान-तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यायला हवे. गावगावांमध्ये लहान-मोठ्या बैठका घेऊन भविष्यामधील संकटाची शेतकऱ्यांना कल्पना द्यावयास हवी.

त्याचबरोबर रासायनिक खतांचा कमी वापर, बांधावर वृक्ष लागवड, आंतरपिकांचे महत्त्व, भरडधान्य घेणे कसे फायद्याचे आहे, त्यास जोडून त्यामधील व्यवसाय संधी याची माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

आजही आम्ही कापूस, सोयाबीन आणि उसास सोडण्यास तयार नाही कारण कृषी विद्यापीठांकडून यासाठी सतत नवीन वाण निर्मिती चालू असते. शेकडो हजारो पारंपरिक बियांनी समृद्ध असलेली आमची भूमी आज याच पाच-सहा मुख्य पिकांभोवतीच फिरत आहे. रासायनिक खतांचा, कीटकनाशकाचा पूर वाढतच आहे.

भेसळीतून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक पुन्हा वेगळीच आहे. वाढते जल प्रदूषण, भूगर्भातील पाण्याचा उपसा, शेतीचे वाळवंटीकरण, मुसळधार पावसात वाहून जाणारे उभे शेत हे वेदनादायी चित्र सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून निश्चितच कमी होऊ शकते, हे शेजारच्या कर्नाटक राज्याने प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे. आणि या यशोगाथेत तेथील तीनही विद्यापीठांचा मोलाचा वाटा आहे.

या यशोगाथेची पाने उलटताना आपल्या राज्याने सुद्धा पुढील पाच वर्षात २५ लाख हेक्टर शेती क्षेत्र संपूर्ण सेंद्रिय करण्याचे ठरविले आहे. सध्याच्या वातावरण बदलावर प्रभावी उपाय असलेल्या पारंपरिक तंत्रज्ञानाचे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेले अवलंबन, त्यावरील संशोधन तेथील दालनात नक्षीकाम करून न ठेवता विद्यापीठाबाहेर आणून या आपल्या मायभूमीच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सेंद्रिय तंत्रज्ञानास यापुढे कसा सुवर्णकाळ असणार आहे,

हे प्रत्यक्ष दाखवून शेतकऱ्यांना फक्त चकितच केले नाही तर नवीन दिशा सुद्धा दाखवली आहे. विद्यापीठाच्या १८ हेक्टरवर उभारलेली ही सेंद्रिय प्रयोगशाळा आणि तेथील मातीचा सुगंध मला या कृषी मंदिरामधील कापूर आरतीसारखाच भासतो. या प्रयोगशाळेत सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, कांदा, ऊस, आवळा, केळी, अंजीर, डाळिंब, बोर, द्राक्षे, मोसंबी, पेरू, सीताफळ, आले,

हळद तर आहेच पण शेतकऱ्यासाठी या सेंद्रिय उत्पादनाचे दर्जेदार बियाणे सुद्धा उपलब्ध आहेत. या १८ एकरमध्ये फक्त सेंद्रिय शेती नाही तर गांडूळ खत, शेणखत, जीवामृत त्याचबरोबर गोपालन, शेळी, कुक्कुटपालन, बायोगॅस सुद्धा आहे.

येथील केसर आंब्याची २६० झाडे आणि त्यांच्या गोड, मधुर आंब्याची विक्री विद्यापीठाने प्रस्थापित व्यापारी आणि दलालांना दूर सारून शिर्डी नगर रस्त्यावर केली हे जास्त कौतुकास्पद आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अठरा हेक्टरमधील सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग मला दक्षिणमधील गोपुराप्रमाणे वाटला. गोपुर हे अनेक मंदिराचा समूह असते आणि यात एक मंदिर मुख्य असते. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हीच भूमिका निभावत आहे.

अशा या गोपुरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने जायला हवे पण फक्त बघण्यासाठी नव्हे तर हातात वही-पेन घेऊन टिपणे काढून त्यांची प्रतिकृती आपल्या शेतावर प्रत्यक्ष करण्यासाठी! वातावरण बदलामध्ये भर घालणारे कृषी संशोधन करण्यापेक्षा त्याचा प्रभाव कमी करणारी राहुरी कृषी विद्यापीठाची ही प्रयोगशाळा इतर कृषी विद्यापीठांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

SCROLL FOR NEXT