संदीप नवले
Fruit Farming : पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील अरुण घुले यांनी फलोत्पादनातून आपल्या शेतीत व घरी समृद्धी आणली आहे.
अंजीर, डाळिंब, पेरू, आंबा, पपई, सीताफळ, जांभूळ आदी १० हून अधिक फळपिकांच्या माध्यमातून व एकूण पाचहजार झाडांच्या माध्यमातून वर्षभर उत्पादन व उत्पन्नाचा स्रोत सुरू ठेवला आहे. गुणवत्ता जपत विविध मॉल क्षेत्रातील कंपन्यांचे ‘मार्केट त्यांनी मिळवले आहे.
पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी हे गाव आहे. येथील अरुण घुले यांची शिंदवणे परिसरात सुमारे २३ एकर शेती आहे. माळरानावर असलेल्या या शेतीत त्यांनी संपूर्ण फळबाग विकसित केली आहे. यामध्ये दहाहून अधिक फळपिकांची विविधता जपली असून सर्व मिळून पाच हजारांच्या दरम्यान एकूण झाडांची संख्या आहे.
अंजीर ६५०, पेरू १२००, डाळिंब, ८००, सीताफळ ३००, शेवगा १००, आंबा ११००, पपई ८००, जांभूळ १००, चिंच २५, बोर १० अशी झाडे आहेत. या शिवाय लिची ३, चिकू ५, खजूर १०, नारळ ३०० अशी झाडे बांधावर आहेत. अरुण यांना दत्तात्रेय आणि नितीन अशी दोन मुले आहेत. पैकी दत्तात्रेय शेती व फळांच्या मार्केटिंगची जबाबदारी पाहतात. तर नितीन कुंजीरवाडी येथील सात एकरांत शोभिवंत पिकांच्या रोपवाटिकेचा व्यवसाय सांभाळतात.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
फळपिकांचे उत्पादन
वर्षभर उत्पादन व उत्पन्नाचा स्रोत सुरू राहिला पाहिजे या दृष्टीने विविध फळपिकांची निवड केलेली दिसून येते. यात प्रातिनिधीक काही पिकांविषयी बोलायचे झाल्यास अंजिराची लागवड पाच वर्षांपूर्वीची आहे. त्याचे पूना फिग हे वाण आहे. लागवडीनंतर साधारण तीन वर्षांनंतर आम्ही व्यावसायिक उत्पादन घेण्यास सुरवात करतो असे नितीन सांगतात. प्रति झाड १५ ते २० किलो उत्पादन मिळते. पेरूचे तीन वाण आहेत. यात लखनौ ४९, जी विलास आणि ललित आदींचा समावेश आहे.सात ते आठ वर्षांपासून या पेरूबागेचे संगोपन केले जात आहे. त्याचे प्रति झाड ५० किलोपर्यंत उत्पादन घेण्यात येते. आंब्यामध्ये केशर हे वाण आहे.
यात पाच ते दहा वर्षे जुनी, पाच वर्षांची व दोन वर्षे जुनी अशी झाडे आहेत. जुन्या बागेमधून प्रति झाड २५० ते ३०० किलो उत्पादन घेतले जात आहे. डाळिंबाचे भगवा वाण असून पाच वर्षांचा या पिकात अनुभव तयार झाला आहे. प्रति झाड ३० ते ४० किलोपर्यंत त्याचे उत्पादन घेतले जाते. सीताफळाच्या बागेसही आठ ते १० वर्षे पूर्ण झाली आहेत. एनएमके गोल्ड असे त्याचे वाण आहे. आकार व वजनानुसार प्रति झाड ७० ते ८० किलो त्याचे उत्पादन घेण्यात येते. पपईचेही प्रति झाड २५ ते ३० किलो उत्पादन घेण्यात येते. नितीन यांचे मोठे बंधू दत्तात्रेय कृषी पदवीधर असल्याने फळबागा विकसित करणे सुकर झाले.
पाण्याची व्यवस्था
दरवर्षी या भागात उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. त्यामुळे पाण्याची शाश्वत सोय करणारे व्यवस्थापन केले आहे. शेताच्या जवळून जात असलेल्या खडकवासला धरणाच्या दोन किलोमीटर अंतरावरील नवीन उजवा मुठा कालव्यावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. याशिवाय २०१० मध्ये दहा लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आहे.
त्यातील पाण्याचा ठिबकद्वारे वापर केला जातो.
फळाच्या गुणवत्तेवर भर
सुमारे ६० टक्के माल हा मॉल क्षेत्रातील कंपन्यांना पुरविला जातो. तर उर्वरित माल
व्यापाऱ्यांना दिला जातो. यातही एका कंपनीला प्रामुख्याने माल देण्यात येतो.
या कंपनीचे संकलन केंद्र कुंजीरवाडी येथे असल्याने वाहतूक खर्च कमी होतो. त्याचबरोबर हंमाली, तोलाई, मध्यस्थ यांच्या खर्चातही कपात होते. शिवाय जेवढे वजन तेवढी अचूक रक्कम मिळत असल्याचाही फायदा मिळतो असे नितीन सांगतात.
मात्र या कंपन्यांना दर्जेदार किंवा ए ग्रेडचा माल पुरवणे बंधनकारक असते. त्यासाठी व्यवस्थापन पण तसेच ठेवावे लागते. यात सेंद्रिय पध्दतीचा अधिकाधिक वापर केला जातो. किरकोळ विक्रेते बागेत आल्यानंतर फळांचा आकार व वजनानुसार प्रतवारी केली जाते. फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी गांडूळखताचा वापर केला जातो. सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ पाच गुंठे क्षेत्रावर त्याची निर्मिती होते. त्यातून रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे. वर्षाला ३० ते ३५ टन खत तयार केले जाते. शिवाय पिकांचे अवशेषही जागेवरच कुजविले जातात. त्यातून जमिनीची प्रत टिकवली आहे.
शेतीतून प्रगती
दरवर्षी सर्व फळपिकांमधून वर्षाला सुमारे ४० लाख रुपयांची उलाढाल होते. या शेतीतून १० ते १२ मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. गरज भासल्यास अधिक मजुरांची मदत घेतली जाते. निवासाची सुविधा देण्याबरोबर फळे, भाजीपालाही त्यांना उपलब्ध करून दिला जातो. शिंदवणे परिसरात २३ एकर शेतीसाठी कर्जाद्वारे रक्कम उभी करावी लागली. साधारण आठ ते नऊ वर्षांनी शेतीतील उत्पन्नातूनच कर्जाची परतफेड करणे शक्य झाले. शिवाय अन्यत्र ५० एकर जमिनीतही गुंतवणूक करता आल्याचे नितीन यांनी सांगितले.
नितीन घुले- ९८५०३११२९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.