Fruit Orchard Management : नगर जिल्ह्यातील राहाता तालुका पेरू पिकासाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील गणेशनगर येथील काले कुटुंब प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे पाच किलोमीटरवर वाकडी येथे त्यांची ४० एकर शेती आहे.
कुटुंबातील युवा सदस्य विक्रांत कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीचे मुख्य व्यवस्थापन पाहतात. ते ‘आयटी’ इंजिनिअर असून, ‘लॅंडस्केप डिझाइन’चे शिक्षण त्यांनी घेतले आहे. पुणे, गुवाहाटी, डेहराडून येथे चार वर्षे खासगी कंपनीत चांगल्या वेतनावर त्यांनी नोकरी केली.
मात्र घरच्या शेतीचा मोठा पसारा व व्याप असल्याने पूर्णवेळ त्यातच लक्ष घालण्याचा विचार होता. बदलती परिस्थिती आणि बाजारपेठेनुसार फळपीक केंद्रित शेतीला प्राधान्य दिले.
एकापेक्षा अधिक फळपिकांची विविधता निर्माण केल्यास उत्पादन साखळी सुरू राहते. नैसर्गिक आपत्ती व दरांची जोखीम त्यातून कमी करता येते हे विक्रांत यांनी जाणले. आज ४० एकरांपैकी सुमारे २८ एकर क्षेत्र त्यांनी फलोत्पादनाखाली आणले आहे.
...अशी आहे फळबाग केंद्रित शेती
-डाळिंब व सीताफळ प्रत्येकी सहा एकर, आंबा व पेरू प्रत्येकी तीन एकर, सफरचंद दोन एकर, जांभूळ दोन एकर, चिकू एक एकर अशी सर्वसाधारण पिके आहेत. चिकूची वीस वर्षे जुनी बाग.
-बहुतांश फळपिकांचे उत्पादन सुरू होऊन तीन- चार वर्षे झाली आहेत. काही पिके उत्पादन सुरू होण्याच्या अवस्थेत.
-रासायनिक अवशेषमुक्त शेतीवर भर. ७५ टक्के सेंद्रिय व २५ टक्के रासायनिक निविष्ठांचा वापर.
-प्रत्येकी आठ टाक्या असे दोन संच आहेत. (एकूण सोळा टाक्या). त्यात स्लरी, सेंद्रिय द्रावणे तयार केली जातात.
-पाखरांचा त्रास टाळण्यासाठी आंबा, सफरचंदाला यंदा फोम, पेपर बॅगेचे आच्छादन केले आहे. त्यामुळे गारपिटीपासूनही फळ वाचवता आले.
-सव्वा एकरांत दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. आठ किलोमीटरवरून शेतापासून नर्सरीपर्यंत पाइपलाइन. तीन विहिरी अशी सिंचन व्यवस्था.
-कुटुंबाचा रोपे निर्मितीतही हातखंडा. संकेत नर्सरी असे नाव. १९८८ पासून हा व्यवसाय. शासन व एनएचबी प्रमाणीकरण. दरवर्षी विविध झाडांची दहा ते बारा लाख रोपांची निर्मिती. ऑनलाइन पद्धतीनेही रोपांचा पुरवठा.
उत्पादन व विक्री
व्यवस्थापन उत्कृष्ट असल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार होते. त्यामुळे बाजारपेठेत फळांना चांगली पसंती मिळून दरही चांगले मिळतात. अनेक फळांची जागेवरच व्यापाऱ्यांकडून खरेदी होते. उदाहरणे सांगायची तर यंदा आंब्याला प्रति झाड १० ते १२ किलो फळे मिळाली. किलोला ८० ते १२० रुपये दर मिळाला.
सीताफळाला प्रति झाड २० ते पंचवीस किलो फळे तर किलोला ५५ ते ६८ रुपये दर मिळाला. जागेवरच दिल्लीच्या व्यापाऱ्यांना विक्री झाली.
तैवान पिंक पेरूच्या प्रति झाडाला २० ते २५ किलो फळे निघून सरासरी ४० रुपये प्रति किलो दर तर लखनौ पेरूच्या प्रति झाडाला १० ते पंधरा किलो फळे व सरासरी ३० रुपये दर मिळाला आहे. प्रति झाडाला यंदा १२० ते १४० किलो चिकू मिळाली. किलोस २० रुपये विक्री जागेवरच केली.
वेगळी तसेच परदेशी फळे
-सफरचंदाचे दोन वाण. हिमाचल प्रदेशातून रोपे आणली. यंदा एका वाणाचे पहिले उत्पादन प्रति झाड १५ फळे याप्रमाणे मिळाले. लाल, गोलाकार फळांना किलोस ९० रुपये दर श्रीरामपूर बाजारात मिळाला.
- वेगवेगळ्या फळपिकांच्या प्रयोगांची आवड जपताना थायलंडहून आणलेल्या पांढऱ्या जांभळाची (थायी व्हाइट) लागवड. सोबत सीडलेस जांभळाच्या शंभर झाडांचा प्रयोग. पांढरी जांभळे चवीला गोड असून, यंदा १५० ते २०० रुपये प्रति किलो दराने शिर्डी, श्रीरामपूर, मुंबई, वाशी बाजारात विक्री.
-पांढऱ्या जांभळाचे वैशिष्ट्य म्हणजे झाड आठ ते दहा फुटांपर्यंत वाढते. त्यामुळे फळे तोडणी सोपी होते. लागवडीनंतर तीन वर्षांत उत्पादन सुरू होते. कमी पाण्यात येते.
-पीच, प्लम, पिअर, ॲव्होकॅडो, नाशापती, अलुबुखार, किवी, जरदाळू, अक्रोड, थायलंड आंबा, रत्ना, सोनपरी, जांभळा- निळा आंबा आदींचीही जपली विविधता. नारळाची २०० झाडे. सीडलेस पेरूचाही अर्ध्या एकरावर प्रयोगाचा मानस.
एकत्रित कुटुंबाचा आदर्श
काले कुटुंबात २४ सदस्य आहेत. शेतीनिष्ठ शेतकरी विजयचंद (विक्रांत यांचे आजोबा) यांना जयेंद्र, रूपेंद्र (विक्रांत यांचे वडील), कैलास व आनंद अशी चार मुले आहेत. सर्वांनी आपले व्यवसाय व जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.
विक्रांत यांचे वडील शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. तेही शेतीच पाहतात. शेतकरी प्रश्नांवर त्यांचा लढा सुरू असतो. नगर जिल्ह्यात साठ वर्षांपासून चर्चेत असलेल्या निळवंडे धरणाच्या पाणी सोडण्याची चाचणी नुकतीच झाली. कामाची अंमलबजावणी, निधी, न्यायालयीन याचिकांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. विक्रांत यांना चुलतभाऊ संकेत यांचीही मोठी मदत होते.
संपर्क - विक्रांत काले, ९८२२७८०५६९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.