Govindraoji Nikam Agriculture College Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education : कोकणभूमीतील शैक्षणिक नंदनवन

Govindraoji Nikam Agriculture College : मांडकी-पालवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे महाराष्ट्रातील पहिले खासगी स्वायत्त गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय २००१ मध्ये सुरू झाले.

Team Agrowon

Agriculture Education System : मांडकी-पालवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे महाराष्ट्रातील पहिले खासगी स्वायत्त गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय २००१ मध्ये सुरू झाले. या महाविद्यालयातून आजवर अडीच हजारांवर कृषी पदवीधर बाहेर पडले आहेत.

स्थापनेपासून या महाविद्यालयाने ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त केला आहे. महाविद्यालयाने उच्च ध्येय आणि जिद्दीच्या बळावर साधलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संस्थेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा धाडसी विचार केला.

कोकणात विना अनुदानित कृषी महाविद्यालय सुरू करणे ही बाबच फारशी न पचणारी. जमीन, इमारती, वसतिगृह, ग्रंथालय, प्रयोगशाळा, पशुसंवर्धन अशा अनेक बाबी खर्चिक. महाविद्यालयासाठी शेकडो एकर जमीन गरजेची असते. अनंत अडचणींचा सामना करत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय राज्य आणि देशात लौकीकप्राप्त ठरले आहे.

डॉ. तानाजीराव चोरगे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्राध्यापक होते. काही वेगळे, समाजपयोगी करावे या विचारातून प्राध्यापक पदाचा राजीनामा देत ते कोकणात येऊन शेती करू लागले.

राजकारण, सहकारातील कामातून त्यांना शेती-समाजासमोरची आव्हाने लक्षात आली. अनेकदा जमीन विकावी आणि पुन्हा मूळ गावी कोल्हापूरला जावं असा विचार मनात यायचा. पण इच्छा असेल तर मार्ग सुचतात. या दरम्यान २००१ मध्ये तत्कालीन शासनाने खासगी विना अनुदानित कृषी महाविद्यालयांचा निर्णय घेतला.

डॉ. तानाजीरावांनी तत्कालीन खासदार गोविंदरावजी निकम (दादा) यांना आपण असे महाविद्यालय काढायला इच्छुक आहोत असा होरा बोलून दाखवला. त्यांनी होकार दिला. हाच विचार डॉ. तानाजीरावांनी शरद पवार साहेबांसमोरही मांडला. त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या अध्यक्षा सूर्यकांता पाटील यांना भेटायला सांगितले. त्यानंतर महाविद्यालय स्थापनेचा प्रवास सुरू झाला.

कृषी महाविद्यालयास सुरुवात

कृषी महाविद्यालय ही संकल्पना नवीन होती. मोठी गुंतवणूक, पसाराही मोठा. तानाजीराव चोरगे जिद्दीने उतरले. जमीन खरेदी, सपाटीकरण, बांधकाम, पाणी उपलब्धता, क्रीडांगण, अन्य सुविधांचा विकास अशी एक ना अनेक कामे झपाट्याने सुरू झाली. प्राचार्य म्हणून डॉ. तानाजीराव चोरगे यांनी स्वत: जबाबदारी घेतली.

शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा अशा दोन्हींची जबाबदारी घेतली. कोणत्याही ठोस आर्थिक आधाराशिवाय त्यांनी हे आव्हान स्वीकारले होते. कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी कै. गोविंदरावजी निकम, डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शरद पवार साहेब यांचे पाठबळ होतेच. मात्र त्यांचा विश्‍वास मिळवणे हे सोपे नव्हते.

त्या वेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शंकरराव मगर होते. त्यांनी डॉ. चोरगे यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा प्रकल्प आराखडा तयार झाला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून चार कोटींचे कर्ज घेतले. प्रारंभी एका हायस्कूलच्या जुन्या इमारती दुरुस्त करून घेतल्या. त्यामध्ये कॉलेज व पोल्ट्री शेड होत्या.

त्यामध्ये वसतिगृह सुरू केले. कृषी विद्यापीठाच्या समितीने पाहणी केल्यानंतर ६४ प्रवेशांना मंजुरी मिळाली. सुरुवातीला चोरगे यांनी महाविद्यालयास स्वत:ची जमीन तात्पुरती दिली होती. पण कायमस्वरूपी संस्थेला १०० एकरांवर जमीन हवी. मग शोध सुरू झाला. मांडकी-पालवण, ढोक्रवली सीमेवरची जमीन पसंत पडली.

मग त्या शेतकऱ्यांसोबत बैठका सुरू झाल्या. लोकांच्या संमतीने खरेदी सुरू झाली. आता जिथं कॉलेज आहे ती पालवणमधील जमीन आहे. बाकीचा फार्म मांडकीच्या हद्दीत आहे. मुलांचे वसतिगृह व फार्म ढोक्रवली गावात आहे. तीन गावांच्या सीमेवर हा संपूर्ण कॅम्पस साकारला आहे. अल्पावधीत प्रयोगशाळा,वर्ग खोल्या, मुख्य इमारत, वसतिगृह अशी बांधकामे उभी राहिली. जमीन सपाटीकरणापासून अवघ्या तीन वर्षांत म्हणजेच २००३ मध्ये नवीन जागेत महाविद्यालय आले.

फुलले कृषी शिक्षणाचे शिवार

आज संपूर्ण परिसर अडीचशे एकरांचा आहे. त्यात ६ हजार नारळ, १५ हजार पोफळी, दोन हजार आंबा, काजू आणि उरलेल्या २५ एकरामध्ये भात, भाजीपाला लागवड आहे. हा सारा व्याप विद्यार्थी पेलतात. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात गायी, म्हशींचे गोठे, पोल्ट्री आहे. पाण्यासाठी दोन मोठ्या उपसा सिंचन योजना आहेत. या शिवारात हायड्रोपोनिक्स, दुग्धजन्य पदार्थ, अळिंबी, भाजीपाला, पोल्ट्री, डेअरी, अझोला अशा विविध कृषी विभागांची प्रात्यक्षिकांची सोय आहे.

सर्वोच्च दर्जाचा ध्यास

एकीकडे भाराभर महाविद्यालयांना परवानगी मिळून दर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. दर्जा तपासण्यासाठी डॉ. पुरी समिती नियुक्त झाली. दर्जाहीन महाविद्यालये बंदच करावी असा शासनाचा कल होता.

डॉ. पुरी समितीने पहिल्याच वर्षी कृषी महाविद्यालयास ‘अ’ दर्जा बहाल केला. डॉ. पुरी समितीने डॉ. चोरगे यांच्या पाठीवर दिलेली ही कौतुकाची थापच होती. जिथे काटेकोर शिस्त आहे तिथे प्रवेशच टाळले जातात. पण चांगला कृषी पदवीधर घडवायचा तर शिस्त हवीच.

पदवीची भेंडोळी घेऊन फिरणारा नव्हे, तर प्रसंगी बांधावर जाऊन काम करणारा शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा पदवीधर घडला पाहिजे हेच ध्येय संस्थेने प्रारंभापासून ठेवले.

कुटुंबाचे भक्कम पाठबळ

डॉ. तानाजीराव चोरगे मुळचे पुष्पनगर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) गावचे. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मणराव बळवंतराव चोरगे यांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगलेला. त्यांच्या करड्या शिस्तीत तानाजीराव घडले. उच्चपदवीधर झाले.

डॉ. तानाजीरावांचे वडील हे वारकरी. गारगोटी भागात त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ सुरू केली. गावागावांत स्वच्छता मोहीम हाती घेतली. समाजसेवेबरोबरच १९६४ मध्ये त्यांनी गावात शिक्षणासाठी हायस्कूल सुरू केले. घराण्याचा हा शैक्षणिक वारसा आता पुढे तितक्याच नेटाने सुरू आहे. डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या पत्नी सौ.अंजली एमए.एमएड पदवीधर असून, संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्या आहेत.

मुलगी डॉ. नेहा दळवी या दापोली येथील कृषी महाविद्यालयात अध्यापन करतात. दुसरी कन्या सौ. मधुरा घाटगे या कोल्हापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. मुलगा डॉ. निखिल हे सध्या शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतात. स्नुषा डॉ. सौ. शमिका यांच्याकडे जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी आहे.

शैक्षणिक विस्तार

कृषी महाविद्यालयानंतर संस्थेचा विस्तार सुरू झाला. २००३ मध्ये डॉ. बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू झाले. मुलींचा कृषी क्षेत्राकडे वाढता कल लक्षात घेऊन त्यांच्यासाठी यंदा भारतातील पहिले विना अनुदानित महिला कृषी महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. याशिवाय अन्य विद्याशाखांच्या विस्ताराचे ध्येय संस्थेने ठेवले आहे.

मांडकी-पालवण कॅम्पस :

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय.

जिजामाता महिला कृषी महाविद्यालय.

डॉ. बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय.

डॉ. तानाजीराव चोरगे बीएड, एमएड कॉलेज.

ज्युनि.आर्टस् कॉमर्स कॉलेज.

डॉ. तानाजीराव चोरगे आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, तळे (ता.खेड)

पूज्य साने गुरुजी ज्युनि. ॲण्ड सीनियर आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज, पालगड.

नांदवळ (जि. कोल्हापूर) कॅम्पस ः

डॉ. तानाजीराव चोरगे ज्युनिअर ॲण्ड सीनियर आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज.

डॉ. तानाजीराव चोरगे आयटीआय महाविद्यालय.

संकेत स्थळ ः www.gncamp.org

- डॉ. निखिल चोरगे, ८९५६९२९८६८/९९६००६४४४६

(उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT