Dr Panjabrao Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Punjabrao Deshmukh : जनसंस्कृतीचा पोशिंदा

Agriculture Minister Dr. Punjabrao Deshmukh : डॉ. पंजाबराव देशमुख हे सर्वांसाठी एक अक्षय चेतना होते. भाऊसाहेब देशमुख या नावाने त्यांना ओळखले जात असे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबर शैक्षणिक व सांस्कृतिक उत्थानासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखे झिजविले.

Team Agrowon

Agriculture Development : डॉ. पंजाबराव देशमुख हे सर्वांसाठी एक अक्षय चेतना होते. भाऊसाहेब देशमुख या नावाने त्यांना ओळखले जात असे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबर शैक्षणिक व सांस्कृतिक उत्थानासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखे झिजविले. भाऊसाहेबांनी प्रत्यक्ष राजकारणात पडूनही राजकीय सत्तेला सुद्धा विधायक कार्यासाठी अक्षरशः वाकविले.

त्यांनी परिश्रमपूर्वक उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्था, उद्योग प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रशिक्षण संस्था, कृषी शिक्षण संस्था तथा कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे या साऱ्यांच्या रूपाने भाऊसाहेबांची स्मारके आज भारतभर विखुरलेली दिसतात.

देशाचे प्रथम कृषिमंत्री म्हणून त्यांनी राबवलेल्या कृषी विकासात्मक उपक्रमामुळे पंजाबचे शेतकरी, ‘‘पंजाब हमारा है’’ म्हणून भाऊसाहेबांना आपले मानत. समाजातील गरीब, अशिक्षित,कृषकांना आपलेपणाची माया देऊन धर्म, पंथ, पक्ष प्रदेशातील मानवधर्मी कणवेतून त्यांचे दुःखमय जीवन सुसह्य करण्याचा व त्यात विकासाची बीजे रोवण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी अखंड यज्ञासारखा आयुष्यभर व्रतस्थपणे केला. राजकीय स्वातंत्र्याहून सामाजिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी शिक्षण व विकास यांना अधिक महत्त्व देणाऱ्या भाऊसाहेबांनी महात्मा फुले यांचा वारसा पुढे नेला.

भाऊसाहेबांनी स्वतःच्या घरापासून समाज परिवर्तनासाठीची लोकचळवळ सुरू केली, हे विशेष मानले पाहिजे. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून १९२४ ला परतल्यानंतर आंतरजातीय विवाह, शेतकऱ्यांकरिता १५ कलमी कार्यक्रम, श्रद्धानंद स्वामी यांच्या नावे गरीब मुलांकरता निःशुल्क छात्रालय, अंबादेवी मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश, वऱ्हाड शेतकरी संघाची स्थापना या सर्व बाबी त्यांनी १९२५ ते १९३० या पाच वर्षांत केल्या.

त्यांच्या या कार्यातून एका बुलंद समाज क्रांतिकारकाची त्यांच्या त्यागमय जीवनाची प्रेरणा देते. त्यांना समाजातील उच्चवर्णीयांचा अहंगंड व नीचवर्णीयांचा न्यूनगंड मुळीच मान्य नव्हता. समाजातील सुज्ञ माणूस हा परिश्रमाद्वारे मोठा व्हायला पाहिजे, यावर त्यांचा विश्‍वास होता. कृतिशीलता हा त्यांच्या जीवनाचा स्थायिभाव होता. जातीपातीचा विचार सार्वजनिक जीवनात जसा त्यांनी केला नाही तसाच त्यांच्या व्यक्तिगत जीवनातही जातीपातींचे स्तोम त्यांनी माजू दिले नाही.

भाऊसाहेबांचा मरणोत्तर विधीसह अनेक कर्मकांडांवर विश्‍वास नव्हता. कर्मकांडावर त्यांनी प्रहार केला. शेतकरी समाजाच्या दारिद्र्याचे मूळ या तथाकथित कर्मकांडात आहे म्हणून त्यांनी त्याचा धिक्कार केला. अस्पृश्यांच्या वापरासाठी त्यांनी अनेक विहिरी खुल्या केल्या, एवढेच नव्हे तर नवीन विहिरी खणून दिल्या. या संदर्भात श्रद्धानंद वसतिगृह हा एक अभूतपूर्व प्रयोग होता. त्या काळात प्रत्येक जाती धर्मांची आपापली छात्रालय होती.

अशा स्थितीत जातिव्यवस्थेला मूठमाती देण्याचे धाडसी पाऊल म्हणजे अमरावती येथील श्रद्धानंद छात्रालय. मातंग महार, माळी, मराठा, मुसलमान अशा अनेक जातिधर्मातील विद्यार्थ्यांना एकत्रित आणून जाती विषमतेची धार बोथट  करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अंबादेवी मंदिरात दलितांना प्रवेश करण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन हे त्यांच्या पुरोगामी कार्याचा कळसच म्हणावा लागेल. त्यावेळी भाऊसाहेबांना तत्कालीन धर्म ठेकेदारांनी देवळे पाडणारे, जातीपाती मोडणारे ठरवले होते. पण भाऊसाहेब आपल्या तत्त्वनिष्ठेपासून ढळले नाहीत.

हिंदू देवस्थान संपत्ती बिल आणून त्यातून देवस्थानाची व्यवस्था सरकारने नीट चालवून उर्वरित संपत्तीचा उपयोग सामान्य जनतेच्या शैक्षणिक कार्यासाठी करून घ्यावा आणि त्यातून हे पटवून द्यावे की मंदिर ही उत्तम संस्कार केंद्र बनू शकतात, असा त्यांचा आग्रह होता. आजही देवाधर्मावर जर रोखठोक बोलले तर समाज माध्यमांवर संबंधित व्यक्तीला नव्या परिभाषेत ‘ट्रोल’ केले जाते.

भाऊसाहेबांनी या तथाकथित धर्म व्यवस्थेवर शंभर वर्षे आधी प्रहार केले. त्यांना बहिष्कृत व्हावे लागले. वर्तमानकाळात भाऊसाहेबांचे क्रांतिकारी विचार आणि दूरदृष्टी स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

शेतकरी समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी हे त्यांचे अंतिम ध्येय होते. शेतकऱ्यांच्या संदर्भातील बिलावर बोलताना भाऊसाहेब म्हणाले होते, की शेतकरी समाज भारतात एक विशाल समाज आहे. केंद्रीय कृषिमंत्रालयात एक विशेष शाखा निर्माण करून शेतकरी व शेतमजूर यांच्याकरिता कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात, शेतकरी कुटुंबाकडे सहानुभूतीने न पाहता त्या कुटुंबाचे भारतात राष्ट्रनिर्मितीत मानाचे स्थान असायला हवे.

भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांची उन्नती तसेच ध्येयपूर्तीकरिता त्यांच्यात शिस्तशौर्य येण्याकरिता विविध संस्था काढून रचनात्मक समाज क्रांतीची बीजे पेरली. या समाज निर्मितीसाठी कालबाह्य झालेल्या रूढीसोडून देण्याचा त्यांचा आग्रह होता. शेती आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी राष्ट्राच्या प्रगतीचा कणा आहेत, हे भाऊसाहेबांनी तेव्हाच ओळखले होते.

त्यांच्या लोकविद्यापीठ आणि भुकेपासून मुक्ती कोष या दोन योजना सफल झाल्या असत्या तर आज भारताचे चित्र वेगळे असते. भाऊसाहेबांच्या डोळ्यापुढे फार पुढचा भारत होता, याचेच नवनिर्माण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. दुर्दैवाने देशाची प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. सर्व स्तरावरील आर्थिक शोषण आणि बेभरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग स्वीकारावा लागत आहे.

त्यावर राज्यकर्ते आपल्या सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. उच्च शिक्षण महाग झाल्याने सर्वसामान्य विद्यार्थी या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. अशा या वास्तवात संघर्ष करायचा असेल, तर भाऊसाहेबांच्या विचारांना स्वीकारणे गरजेचे आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी भाऊसाहेबांचे योगदान प्रत्येक घटकाला प्रेरित केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे यासाठी फक्त वाचाळवीरांची नव्हे तर कृतिशील नागरिकांची आवश्यकता आहे.

भाऊसाहेबांच्या समाज कार्याबद्दल प्रा. भाऊ भालेराव म्हणतात, ‘‘सामाजिक समतेचा, वैचारिकतेचा, बुद्धिवादाचा समाज प्रगतीच्या मुळाशी कारणीभूत असलेल्या शिक्षण प्रसाराचा ध्वज मागच्या शतकातच महाराष्ट्रात उभारला गेला. जोतिबा, आगरकर, न्यायमूर्ती रानडे आदींनी ज्या ध्वजाची उभारणी केली तो ध्वज या शतकात डौलाने फडकवीत ठेवण्याची महनीय कामगिरी महाराष्ट्रात ज्या कर्मवीरांनी केली त्यातले एक कर्मवीर भाऊसाहेब देशमुख आहेत. उद्याचा काळ भाऊसाहेबांचे मूल्यमापन या दृष्टीने करेल.

महाराष्ट्राची नवी तीर्थक्षेत्रे रुजवल्याचा भाऊसाहेबांच्या विधायक कर्तृत्वाला तोड नाही. प्रबळ इच्छा शक्ती, दृढ संकल्प, चिकाटी, विपरीत परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती असलेले भाऊसाहेब भारतीय शेतकरी ज्ञानसंपन्न आणि स्वयंपूर्ण व्हावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते. उपेक्षितांना ज्ञानगंगेचा लाभ करून देणाऱ्या या आधुनिक भगीरथाच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम! कवी सुधाकर गायधनीच्या शब्दात...
हे महानायका,
तूच खरा आमच्या जनसंस्कृतीचा पोशिंदा
तू नेत्यांचा नेता आणि देशभक्त खंदा
(लेखक अमरावती येथील श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात
प्राध्यापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT