Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Changes : बदलत्या हवामानात लागवड तंत्रही बदला

Indian Agriculture : या वर्षी अधिक पाऊसमानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अधिक पाऊसमान काळात पारंपरिक पद्धतीनेच पिके घेतली तर अधिक नुकसान संभवते. अशावेळी शून्य मशागत आणि पिकांच्या लागवडीसाठी बीबीएफ, अर्थात रुंद वाफा सरी तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरू शकतो.

विजय कोळेकर

विजय कोळेकर

Planting Technique Changes in Agriculture : अतिमशागतीने मातीचे फूल (सुपीक मातीचा थर) वाहून जात असल्यामुळे दिवसेंदिवस घटत जाणारी उत्पादकता ही शेतकऱ्यांना सतावणारी एक मोठी चिंता आहे. यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न जगभरातून होत आहेत. त्यातूनच संवर्धित शेती पद्धतीची संकल्पना पुढे आली आहे. आजमितीस जगभरामध्ये लाखो शेतकरी जवळपास दीड कोटी हेक्टर क्षेत्रावर संवर्धित शेतीकडे वळले आहेत. त्यांपैकी १० ते १२ टक्के शेतकरी कायमस्वरूपी विनामशागत शेती करीत आहेत.

अशा शेतकऱ्यांची संख्या दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असून आपल्या देशात अगदी नगण्य आहे. आपल्या राज्यात साधारणतः सहा हजार शेतकरी विनामाशागत शेती करतात. पूर्णतः संवर्धित शेतीकडे वळण्यासाठी आणि आपल्या शेतातील शेकडो टन माती वाहून जाण्यापासून वाचवायची असेल तर आम्हाला शेतीमध्ये काही आमूलाग्र बदल करावे लागतील, यात काही शंका नाही.

याच दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आणि यांत्रिकीकरण योजनांतर्गत बीबीएफ तंत्राचा आणि शून्य मशागत पद्धतीचा प्रसार सुरू केला आहे. त्यास हजारो गावांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही पद्धती पिकांचे उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे.

पण त्यांपैकी शून्य मशागत शेतीमध्ये मातीचे संवर्धन होत आहे. सूक्ष्म जीव आणि गांडुळे वाढल्यामुळे माती जिवंत होताना दिसून येत आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये ‘रुंद वाफ्यावर (बेडवर) पिकांची लागवड’ हे तंत्र समान असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपली शेती सपाट जमिनीवरून गादीवाफ्यावर आणणे सहज शक्य आहे.

रुंद वाफ्यावर पिकांची लागवड

राज्यातील विविध भागांतील जमिनीची रचना, शेतकऱ्यांची जमीनधारणा आणि पावसातील लहरीपणा लक्षात घेऊन सपाट जमिनीवरील लागवडीपेक्षा गादीवाफ्यावरील लागवड अधिक हवामान अनुकूल असल्याचे दिसून आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र, हैदराबाद आणि राज्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी रुंद वाफ्यावर पिकांच्या लागवडीच्या शिफारशी केलेल्या आहेत.

रुंद वाफ्यावर लागवडीचे फायदे

कमी पावसाच्या कालखंडात किंवा पावसाचा खंड पडल्यास सरीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. जास्त पावसाच्या कालखंडात अतिरिक्त पाणी सरीमध्ये अडवून मूलस्थानी जलसंवर्धन होते तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो. एकरी रोपांची संख्या नियंत्रित राखता येते. त्यामुळे बियाण्याची बचत होते. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी हवा आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते, मातीचे तापमान नियंत्रित राहते. बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो. पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते. जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीची धूप कमी होते.

रुंद वाफा (बेड) तयार करण्याचे काम एकदाच करण्याचे असल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने बेड मेकर किंवा रिजर किंवा बीबीएफ यंत्राद्वारे किंवा लाकडी नांगरला फळी लावून किंवा मजुरांकडून चार ते साडे तीन फूट रुंदीचे आणि अर्धा फूट उंचीचे बेड तयार करून घ्यावेत. कृषी विद्यापीठाने पिकांची बेडवर लागवड करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार विविध पिकांसाठी बेडचा आकार आणि ओळींची संख्या याबाबत खालीलप्रमाणे तंत्रज्ञान अवलंब करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत बेडवर मजुरांकरवी किंवा मनुष्यचलित टोकन यंत्राद्वारे बियाण्यांची टोकन करावी.

सोयाबीन पिकासाठी जर १२० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार केल्यास प्रत्येक वाफ्यावर ३० सेंमी अंतरावर सोयाबीन पिकाच्या तीन ओळी घ्याव्यात. दोन रोपांतील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाच ते आठ सेंमी ठेवावे. आणि जर १५० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार केला तर प्रत्येक वाफ्यावर ३० सेंमी अंतरावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी घ्याव्यात. दोन रोपांतील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाच ते आठ सेंमी ठेवावे.

कापूस पिकासाठी जर १२० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार केल्यास प्रत्येक वाफ्यावर मध्यभागी एक ओळ घ्यावी. दोन रोपांतील अंतर ४५ सेंमी ठेवावे. आणि जर १५० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार केला तर प्रत्येक वाफ्यावर कापूस पिकाच्या दोन ओळी घ्याव्यात. दोन ओळीतील अंतर १२० सेंमी ठेवावे व दोन रोपातील अंतर ४५ सेंमी ठेवावे. या पद्धतीमध्ये १२०-६०-१२० सेंमी प्रमाणे जोडओळ पद्धतीने लागवड होईल.

मका पिकासाठी जर १२० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार केला तर प्रत्येक वाफ्यावर ६० सेंमी अंतरावर मका पिकाच्या दोन ओळी घ्याव्यात. दोन रोपातील अंतर २० सेंमी ठेवावे. आणि जर १५० सेंमी रुंदीचा वाफा तयार केला तर प्रत्येक वाफ्यावर ६० सेंमी अंतरावर मका पिकाच्या दोन ओळी घ्याव्यात. दोन रोपांतील अंतर २० सेंमी ठेवावे. सध्या बाजारात मनुष्यचलित टोकन यंत्र उपलब्ध असून, त्याची उपयुक्तता चांगली असल्याचे दिसून आले आहे.

पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीने दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर बरोबरच उत्पादन वाढ २५-३०टक्के होईल. खरीप, रब्बी किंवा उन्हाळी हंगामात पिके घेण्यासाठी सिंचनाची सोय आवश्यक आहे. सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास रुंद वाफ्यावर (बेड) पिकाची लागवड केल्यानंतर पाणी देण्याच्या काही पद्धती आहेत. खरीप हंगामातील कापूस पिकासारख्या जास्त कालावधीच्या पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.

तसेच सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, गहू इ. पिकांना सुद्धा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे शक्य आहे. कापूस, मका, ज्वारी या पिकामध्ये एका बेडवर एक ठिबकची नळी वापरावी. तसेच सोयाबीन, हरभरा, गहू या पिकांसाठी एका बेडवर एकदोन ठिबकच्या नळ्या वापराव्यात. कापूस पिकांकरिता तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे शक्य होत नाही. सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, गहू इ. पिकांना तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे शक्य आहे. त्यामुळे खरीप व रबी हंगामात पिकांना गरज असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

ज्या शेतकऱ्यांनी मागील ३ ते ५ वर्षांपासून कायमस्वरूपी तयार केलेल्या बेडवर लागवड केली आहे त्यांचे अनुभवावरून त्या प्रत्येक शेतकऱ्याचे एकरी ५ ते ८ हजार रुपयांची बचत होऊन उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ झालेली असून असाच फायदा जे शेतकरी या खरिपात बेडवर पिकांची लागवड करून नंतर ते बेड न मोडता पुढील पिके घेतील त्यांना होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT