Nashik News : मागील आठवड्यात रविवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास तुफान गारपीट सुरू झाली. पडणाऱ्या गारांचा आवाज ऐकवत नव्हता; तर होणारे नुकसानही पाहवत नव्हते. त्या वेळी घराजवळ असलेल्या वायनरी प्रकल्पाशेजारच्या खोलीत आसरा घेतला होतो.
त्या वेळी समोर असलेल्या चिंचेचे झाड खोलीवर पडणार तोच, तिथून मार्ग काढत कसेबसे घरी पोहोचलो. सायंकाळी पाचच्या सुमारासच अंधार झाला. त्यामुळे सुरुवातीला अंगावर गोधडी घेऊन पडलो होतो. सारं काही हातातून गेलं. पुढे कसं करायचं, असा विचार मनात आला.
रात्री गावात वीज नसणे आमच्यासाठी नवीन नाही. मात्र गारपीट झाल्यानंतर रातकिड्यांचा कुठंही किऽर्र ऐकू येत नव्हता. नियमित वर्दळ आणि माणसं स्तब्ध झाली होती. पण ही आपत्ती कोण रोखणार? त्यामुळे तोंड बडवून घेण्यापेक्षा संकटाला सामोरे जावून नव्याने सुरुवात करणे हाच पर्याय आता समोर आहे, असा भयाण अनुभव पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथील वाइन उत्पादक अशोक सुरवाडे सांगत होते.
अशोक व पत्नी ज्योत्स्ना या सुरवाडे दांपत्याने द्राक्ष वाइन निर्मिती व्यवसाय नावरूपाला आणला आहे. मात्र झालेल्या गारपिटीने तीन एकरांवर शार्डने, मस्कत, कॅबरनेट अशा वाणांच्या वाइन द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. २१ सप्टेंबर रोजी बहर छाटणी केली होती.
यंदा पीकही जोमात होते. मात्र गारांच्या फटक्यात मेहनत मातीत गेली. आम्ही वाइन तयार करण्याची खरी प्रक्रिया वायनरीत नव्हे तर द्राक्ष बागेतच करतो. आता आमच्या हाताची किमया होणार कशी?
वायनरी उद्योगात वाइन द्राक्ष हा मुख्य स्रोत आहे. यंदाचं पीक हातातून गेलं; मात्र पुढील दोन वर्षं व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. मात्र झालेले नुकसान दुसरीकडून भरून काढू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लढाई आता शेतकऱ्यालाच लढायची आहे. मदत आली तर ठीक, नाहीतर थांबून कसे चालेल, अशी आतल्या आवाजातील भावना अशोक मांडत होते.
गारपिटीने परिसरात आर्थिकच नाही तर जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे. गारांच्या तडाख्यात पक्ष्याची घरटी तुटून पडली. गारांचा मार लागून अनेक पक्षी मरण पावले, लहानपणापासून त्या झाडांच्या सावलीत वाढलो, ती झाडे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे दररोज ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आता शांत झाला आहे. त्यामुळे मनुष्यहानीसह जैवविविधतेचे नुकसान या गारपिटीने केले आहे.
‘मानसिकदृष्ट्या स्वतःला. कुटुंबाला सावरलं’
वाइन निर्मितीच्या अगोदर द्राक्ष उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करणे ही आमच्या व्यवसायाची मुख्य बाजू असते. छोट्या व्यावसायिकांकडे मोठे भांडवल नसते. त्यामुळे जाहिरातीवर खर्च नसतो.
गुणवत्ता निर्माण करणे आणि त्यातूनच मौखिक प्रसिद्धीतून ग्राहक मिळवणे हीच व्यवसायाची जमेची बाजू असते. मात्र आता कच्चा माल हातातून गेला. त्यामुळे यंदाचे वर्ष कुटुंबचलित वाइन उत्पादनासाठी आव्हानात्मक असेल. गारपिटीच्या दिवशी घरात वीज नव्हती. घराजवळील रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता बंद होता, तो खुला केला.
नुकसान भीषण आल्याने या संकटात मानसिकदृष्ट्या स्वतःला आणि कुटुंबाला सावरलं. आयुष्यात अशी चढ उतार येते, सार काही कोलमडत. मात्र जिद्दीने या संकटातून पुन्हा उभे राहू असा विश्वास व्यक्त केला.
लेकींनी दिला बाबाला आधार
दिवाळीच्या दरम्यान शेती कामे सुरू असताना शहरात खरेदीसाठी जाता आलं नाही, त्यामुळे कपडे वस्तू काही खरेदी करण्यासाठी सोमवारी जायचं होतं. मात्र रविवारीच गारपीट झाल्यानं सारं नियोजन कोलमडलं.
आपत्तीमुळे शांतता झाली होती. त्या वेळी घरातील सदस्य एकत्र येऊन दिलासा देत होते. त्याच वेळी ‘बाबा, आता खरेदीला जायचं नाही, आम्हाला काहीच नको. आमच्याकडे बचतीचे जे पैसे आहेत ते शेतीला वापर, खरेदी नको. यातून आता पुन्हा वायनरी द्राक्ष उत्पादन घे; पण खचू नको’ हे थोरली लेक जानकीचे बोल सावरण्यासाठी आधार ठरले.
तर लहान लेक शरयू पैशांचा गल्ला घेऊन आली. ‘बाबा, हे पैसे तुला राहू दे आणि तुझ्या कामासाठी वापर. आपण पुढच्या वर्षी दिवाळीला कपडे घेऊ’ असा धीर देत होती. त्यामुळे संकट मोठे असले, तरी संकटात या दोन्ही लेकींचा धीर आधार ठरल्याचे, अशोक यांनी सांगितले.
अशोक यांनी सांगितली भयाण परिस्थिती...
घटना घडल्यानंतर पुढचे तीन दिवस पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता.
गारपिटीपर्यंत केली जाणारी सर्व हंगामी काम आमच्या लक्षात होती; पण आता नुकसानच इतकं झालं, की आता कोणती कामं सुरू होती, हे लक्षात राहिलं नाही
वेली फक्त बागेत नावालाच उभ्या, गारपीट होऊन वेलींना जखमा आहेत, त्याला सावरायला वर्ष लागेल.
गारपिटीने फक्त शेतीची नाही तर मनुष्यहानीही केली जैवविविधताही धोक्यात आणली आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.