Orchard Management : वादळी पाऊस, गारपिटीच्या परिस्थितीतील बागेचे नियोजन

Hailstrom Condition : तीन ते चार दिवसांपूर्वी नाशिकसह अन्य द्राक्ष लागवड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस व गारपीट झाली. बागेमध्ये वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमध्यो उद्‍भविणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.
Hailstrom Condition
Hailstrom ConditionAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रशांत निकुंभे, डॉ. शर्मिष्ठा नाईक, डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. दीपेंद्रसिंह यादव, डॉ. सुजोय साहा, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. कौशिक बॅनर्जीपूर्ण

Hail conditions Information about the problem and its Solutions :

नुकसान झालेली बाग

काही भागांमध्ये गारपीट, वादली पावसामुळे बागेचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे दिसून येते. गारांचा मार जास्त बसल्याने पुढील हंगामात खरड छाटणीनंतर डोळे फुटण्याकरिता अडचणी येऊ शकतात. एकसारख्या फुटी निघणे कठीण होऊ शकते.

गारांचा माराने आतपर्यंत जखम झालेल्या काडी किंवा खोडामध्ये अन्नद्रव्ये साठवण्याची क्षमता कमी झालेली असते. यामुळेच अशक्त झालेल्या काडीवर बोट्रीडिप्लोडियाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. पुढील हंगामात वेलीची उत्पादन क्षमता कमी होते. पुढील काळात उत्पादन कमी होणे हे वेलीवर झालेल्या जखमांच्या प्रमाणावर उत्पादनातील संभाव्य घट ठरेल.

काही परिस्थितीमध्ये काडीवर फक्त द्राक्षघड शिल्लक असतील. मात्र या घडांच्या विकासासाठी आवश्यक पाने नसल्याने मण्यात साखर तयार होणार नाही. उलट असे द्राक्षघड वेलीवर राखल्यास वेलीचे नुकसान होईल. काही घडामध्ये कमी प्रमाणात जखम झाली असल्यास मणी तडकण्याची समस्या निर्माण होईल.

...अशा बागेत करावयाच्या उपाययोजना

ओलांड्यावर एक किंवा दोन डोळे राखून खरड छाटणी करावी.

बागेतील काही वेलीची खरड छाटणी करून कशाप्रकारे फुटी निघतात हे आधी पडताळून पाहावे. पुढील छाटणी करण्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल.

सध्या काही दिवसांपर्यंत बागेत पाणी देण्याचे टाळावे.

या वेळी जमिनीत मुळांच्या कक्षेत पाणी साचल्यामुळे वेलीमध्ये आधीच जिबरेलिन्स जास्त वाढले असेल. त्यामुळे सध्या बागेत स्फुरद आणि नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

बागेत वाफसा येत नाही, तोपर्यंत जमिनीतून किंवा ठिबक सिंचनद्वारे खते देण्याचे टाळावे. शक्यतो पुढील एक आठवडा खते द्यायची गरज नसेल. अत्यंत तातडीच्या स्थितीत तोपर्यंत फवारणीद्वारे खतांचा पुरवठा करता येईल.

सध्या जरी पाणी असले, तरी पुढील काळात बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

बागेत कॉपरयुक्त बुरशीनाशकांची त्वरित फवारणी घेऊन, खोड, ओलांडा व्यवस्थितरीत्या धुऊन घ्यावेत.

या बागेत अन्नद्रव्य व पाण्याचे वेगळे नियोजन करावे लागेल.

Hailstrom Condition
Hailstrom Crop Damage : द्राक्ष, रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा

फुलोरा गळ आणि फळकुज कमी करण्यासाठी उपाय

बागेमध्ये सध्या प्रीब्लूम किंवा फुलोरा अवस्थेच्या जवळ किंवा मणी सेटिंग ते ४-८ मिमी मण्याची अवस्था आहे. अशा बागेमध्ये अवकाळी पावसामुळे फुलोरा गळ आणि मणी तडकून सडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ते थांबविण्यासाठी चिरलेले मणी काढून टाकावेत. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी वेली कोरड्या ठेवण्याचा प्रयत्न करा. संसर्ग कमी करण्यासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी.

काही दिवस सिंचन व नायट्रोजनयुक्त खतांचा वापर थांबवावा.

मणी क्रॅकिंग रोखण्यासाठी कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. वेलीचा जोम नियंत्रित करण्यासाठी पोटॅशिअमयुक्त खताचा वापर करावा.

ज्या शेतकऱ्यांनी घड कागदी पिशव्यांनी झाकले होते, त्यांनी पिन काढून घड खालून उघडे ठेवावेत. त्यामुळे घडातील आर्द्रता कमी होऊन घड सडणे व अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव कमी होईल.

काही प्रमाणात पाने व घड खराब झाले असल्यास, वादळी पावसामुळे पाने काही प्रमाणात पाने फाटली असून, द्राक्ष मणीही तडकले आहेत. अशा बागेत मण्यांचा विकास आणि साखर निर्मितीमध्ये अडचणी येतील. काही काळातच मणी सडायला सुरुवात होऊन खराब वास येईल. यामुळे चांगले घड खराब होण्याची शक्यता असेल.

...अशा करावयाच्या उपाययोजना

प्रत्येक द्राक्ष घडातील खराब झालेले मणी कात्रीच्या साह्याने त्वरित काढून टाकावेत. ही कार्यवाही मणी सडण्यापूर्वी पूर्ण करावी.

द्राक्ष मणी साफ केल्यानंतर ट्रायकोडर्मा (मांजरी ट्रायकोशक्ती) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

या पुढे मणी तडकू नये म्हणून कायटोसॅनची दोन मि.लि. प्रति लिटर या फवारणी करावी.

बागेत मणी सडण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यास जमिनीवर कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. त्यामुळे माश्यांचे प्रमाण कमी राहते.

बाग व वेलीतील अतिरिक्त पाण्याचे व्यवस्थापन

बागेत पाणी साचल्यामुळे वेलीची मुळे अतिरिक्त पाणी शोषून घेतात. त्यामुळे फुलोरा आणि मणी गळ जास्त प्रमाणात होते. वेलीमधील अतिरिक्त पाणी कमी करण्यासाठी ओलांड्याखाली बऱ्याच ठिकाणी टोचा मारून घ्याव्यात. त्यामुळे पाणी निघून जाऊन वेलीच्या पानांमधील व मण्यातील अंतर्गत (टर्गर) दाब कमी करता येतो.

बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित काढून द्यावे. त्यासाठी वेलीच्या ओळींमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस सेंटिमीटर रुंद आणि १०-१५ सेंटिमीटर खोल अशी चारी घ्यावी. पाऊस कमी झाल्यानंतर येथील मुळे कार्यरत होतील.

संजीवकांचे व्यवस्थापन

आवश्यकता नसताना संजीवकांची फवारणी घेऊ नये किंवा ड्रीपमधून देऊ नये.

खूप आवश्यक असल्यासच संजीवकांची फवारणी करावी. ज्या बागेत पाकळ्यांची वाढ अपेक्षित आहे, अशा ठिकाणीच वाफसा स्थितीत बाग आल्यानंतर फवारणी करावी.

संजीवकांची वेगळी फवारणी करण्याऐवजी पूरक असणाऱ्या बुरशीनाशक किंवा कीटकनाशकासोबत फवारणी घेता येईल.

Hailstrom Condition
Unseasonal Rain : ९९ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा, नाशिक, बुलढाण्यात सर्वाधित नुकसान

प्लॅस्टिक किंवा नेट आच्छादनाचा वापर

हवामान बदल हे वास्तव बनले आहे. तापमानात होणारा बदल, पर्जन्यवृष्टी आणि अवेळी पाऊस, गारपीट, दव इ. सारख्या हवामानाच्या बदलत्या घटनांमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक वेळा पिकाचे नुकसान १०० टक्क्यांपर्यंत होत असते. अशा बदलत्या हवामान स्थितीमध्ये प्लॅस्टिक आच्छादन नुकसान कमी करण्यास मदत करू शकते.

प्लॅस्टिक आच्छादन हे असेच एक तंत्रज्ञान आहे, ज्याचा उपयोग बदलत्या हवामान परिस्थितीत फायदेशीर द्राक्ष लागवडीसाठी केला जाऊ शकतो. सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक किंवा नेटचाही वापर करणे शक्य आहे. असे नेट तात्पुरते वापरून काढून ठेवता येईल. पुढील अवेळी पावसाच्या अंदाजानुसार योग्य वेळी त्याचा वापर करता येईल.

तसेच लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने छाटणीच्या तारखांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. बाजारपेठेतील एकाच वेळी आवक वाढून होणारी दरातील घट टाळता येईल.

द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन

पावसामुळे फलधारणा झालेल्या बागेतील द्राक्षांमध्ये पाणी जाऊन क्रॅकिंगची व सडण्याची समस्या उद्‍भवू शकते. त्याचा फटका स्थानिक व निर्यातक्षम द्राक्षालाही बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना (विशेषतः रंगीत जातीमध्ये) तडे जाण्याची शक्यता असते. यामुळे घड सडण्यासारख्या मोठ्या समस्या उद्‍भवू शकतात. पावसाची स्थिती पुढील २-३ दिवस अशीच राहिल्यास द्राक्ष बागा अडचणीत येऊ शकतात.

उपाययोजना

पावसाने ओली झालेली पाने व द्राक्षमणी नैसर्गिकरीत्या सुकू देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

पाऊस चालू असल्यास कोणतीही फवारणी करू नये.

पाऊस झाल्यानंतर बागेला पाणी देणे टाळावे. अतिरिक्त पाणी शोषले जाऊन पेशींमधील दाब वाढल्याने होणारे मणी तडकण्याचे प्रमाण कमी होईल.

पावसामुळे द्राक्षामध्ये साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी तारेला झटका द्यावा.

१२ तासांपेक्षा जास्त वेळ पानांवरील ओलावा टिकून राहत असल्यास, मणी क्रॅकिंग टाळण्यासाठी कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. याचबरोबर पाणी काढून टाकण्यासाठी ‘फलोत्पादन ग्रेड’च्या खनिज तेलाचा (मिनरल ऑइल) २ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे वापर करावा. हा वापर दाट कॅनॉपी असलेल्या आणि शिफारशीपेक्षा जास्त घडांचा भार असलेल्या घडांच्या बाबतीत करता येईल. या वातावरणात कोणत्याही टॉनिकचा वापर करू नये.

या अवकाळी पावसामुळे वातावरणातील तापमानात अचानक घट होऊन मण्यांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळू शकतो. असा प्रादुर्भाव दिसल्यास द्राक्षघड सिलिकॉनयुक्त सरफॅक्टंट १ ते २ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे धुऊन काढावेत.

डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा, अँपिलोमायसिस क्विसक्वालीस व बॅसिलस सबटिलिस यांसारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर द्राक्ष बागेत सुरू ठेवावा.

कीड व्यवस्थापन

मणी क्रॅकिंग झालेल्या बागेमध्ये ‘स्कॅव्हेंजर ड्रोसोफिलिड व्हिनेगर’ माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तडकलेल्या मण्यातून कुजण्याच्या वासाकडे माश्या आकर्षित होतात. या समस्येवर मात करण्यासाठी द्राक्ष बागेतील सर्व तडकलेले मणी काढून टाकण्याची शिफारस केली जाते. कारण द्राक्षावर कीडनाशकाच्या वापराची शिफारस करता येत नाही. त्यामुळे या माश्यांना आकर्षित करून मारण्यासाठी तडकलेले मणी द्राक्ष बागेपासून दूर एका कंटेनरमध्ये ठेवून त्यावर वेळोवेळी स्पिनोसॅडची फवारणी करत राहिल्यास अल्प प्रमाणात फायदा होऊ शकतो.

- डॉ. प्रशांत निकुंभे, ७०७३००६५६४

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com