Vineyard Damage : गारपीटग्रस्त शेतकऱ्याला कृषी आयुक्तांसमोर कोसळले रडू

Unseasonal Rain Crop Damage : अकरा लाखांच्या नुकसानीचा पंचनामा होऊनही एक रुपयाही मिळाला नाही.
Vineyard Damage
Vineyard DamageAgrowon

Nashik News : ‘‘आमचं दुःख जाणून घ्यायला कुणीच नाही. परिस्थिती इतकी वाईट आहे की कुणीच सोबत नाही. २०१६ मध्ये माझी द्राक्ष ४ एकर बाग वाया गेली. त्यानंतर आमदार, खासदार आले, कृषी अधिकारी आले. त्या वेळी ११ लाख रुपयांचा पंचनामा करून गेले. पण अजून एक रुपया दिला नाही, काय करायचं साहेब आम्ही? जमीन विकावी लागली साहेब.

छोट्या जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं. शेतकऱ्यांना दुसरं कोणतंच उत्पन्न नाही. टोमॅटोची पण तीच परिस्थिती. ४ आणि ५ रुपये किलोने टोमॅटो विकला. आता आम्ही नेमके काय करू?’’ ही नैसर्गिक संकटांची मालिका मांडताना रसलपूर (ता. निफाड) येथील शेतकरी निवृत्ती भोसले यांना कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर रडू कोसळले.

रविवारी (ता. २६) गारपिटीमुळे निफाड तालुक्यातील जवळपास २५ ते ३० गावे पाऊस व गारपिटीच्या भक्ष्यस्थानी सापडले. ज्यामध्ये द्राक्ष बागांचे कोट्यवधी रुपयांची नुकसान झालेले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी कृषी आयुक्त गेडाम हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.

त्यावेळी या नैसर्गिक आपत्तीची कैफियत मांडताना भोसले यांना रडू कोसळले होते. या वेळी शेतकरी पुंडलिक बुटे यांनीही आपले नुकसान मांडले. या वेळी द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. मोगल, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Vineyard Damage
Crop Damage : नांदेडला ‘मॉन्सुनोत्तर’ने पिकांची दाणादाण

व्यथा मांडताना भोसले म्हणाले, की २०१५ पासून अनेक कृषी अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी आले, राजकीय नेते आले, पण काही नाही. ते फक्त येतात आणि आमच्या पाठीवरून हात फिरवून निघून जातात. सरकार तर आमच्यासोबत नाही पण निसर्गसुद्धा आम्हाला साथ देत नाही साहेब. आम्ही पूर्णपणे कोसळलोय. सारं गेलं आता हातात काही शिल्लक राहिले नाही, खिशात पैसे नसले, की कीडनाशके घ्यायला गेल्यावर दुकानदारसुद्धा दारात उभा करत नाही.

त्यांना आता पैसे रोख लागतात. शरीराने वरून आम्ही तुम्हाला दिसतोय पण आम्ही आतून कोसळलोय साहेब... आमच्या व्यथा ऐकायलाच कुणी नाही. आपलं दुःख सांगताना वेदनादायी अनुभव ते आपल्या शब्दातून व्यक्त करीत होते. हे पाहून श्री. गेडाम गहिवरले. त्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडणार असण्याचे देखील आश्‍वासित केले.

Vineyard Damage
Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ७५ हेक्टर क्षेत्र बाधित

दीर्घकालीन उपाययोजना महत्त्वाच्या : गेडाम

शेतकऱ्यांचे दुःख हे कठीण आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून ते कृषी विभागातर्फे शासनाकडे सादर केले जातील. नुकसान मोठे आहे, त्यामुळे लगेच त्यावर काही करता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान हा दशकानुदशकांचा विषय आहे. मात्र अडचणी समजून घेऊन त्यावर दीर्घकाळ उपाययोजना करण्यासाठी काम करण्याची गरज आहे.

जिल्हा दौऱ्यात सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. त्यावेळी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे सर्वच सह्याद्री होणार नाहीत; मात्र त्यातील चांगल्या गोष्टी विचारात घेऊन व्यावसायिक पद्धतीने कामकाज करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्यासाठी कृषी योजनांच्या माध्यमातून व शेतकऱ्यांना संघटित करून लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे डॉ. गेडाम ‘ॲग्रोवन’शी बोलताना म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com