Shrikant Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Shrikant Deshmukh : मराठी मातीचे मुखपत्र

Team Agrowon

श्रीकांत देशमुख

सर्वसाधारणपणे आपल्याकडे पत्रकारिता म्हणजे राजकीय, सामाजिक पत्रकारिता याच अर्थाने पाहण्याची एक परंपरा आहे. भारतासारख्या अतिशय गुंतागुंतीची सामाजिक व्यवस्था असणाऱ्या देशात आधुनिक स्वरूपाची जी साधनं निर्माण झाली, त्यांची पार्श्‍वभूमी प्रामुख्याने ब्रिटिशांची राजवट ही आहे. भारतासारख्या देशांमध्ये पत्रकारितेची सुरुवात ही भारतीय समाजाचे प्रबोधन करण्याच्या भूमिकेतून प्रामुख्याने झालेली आहे. त्याला अनेक सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपाचे संदर्भ देखील आहेत.

विशेषतः भारतासारखा कृषिप्रधान, सर्व प्रकारच्या नैसर्गिक साधनांची संपन्नता असणारा, खंडप्राय देश राजकीय गुलामगिरीमध्ये सातत्याने का अडकत जातो, याचा शोध भारतीय पत्रकारितेच्या परंपरेने सातत्याने घेतला आहे. अगदी गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा जोतीराव फुले, बाळशास्त्री जांभेकर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महनीयांचा यात उल्लेख करावा लागेल.

मधल्या काळामध्ये ब्राह्मणेतर चळवळीची पत्रकारिता आहे. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून देशातील स्त्री, शूद्र आणि शेतकरी यांच्या दुःखाच्या कारणांचा शोध या पत्रकारितेने सातत्याने घेतला आहे. लोकहितवादींचे शतपत्रे सारखे महत्त्वाचे लेखन एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात ‘प्रभाकर’सारख्या तत्कालीन नियतकालिकामधून प्रकाशित झालेले. याच लोकहितवादींनी १८७३ मध्ये ‘देशास दरिद्र येण्याची कारणे’ नावाचा एक छोटासा निबंध लिहिला होता.

या निबंधातून देखील त्यांनी भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवर लखलखीत झोत टाकला होता. शेतीमाल उत्पादन करण्यासाठी किती खर्च येतो आणि उत्पन्न किती मिळते, याची मांडणी शेतकरी संघटनेच्या अगोदर लोकहितवादींनी केल्याचे आपल्याला दिसते. आणि म्हणूनच ज्या वेळी आपण भारतीय पत्रकारितेकडे बघत असतो, त्या वेळेला एकूण पत्रकारितेच्या संदर्भामध्ये भारतीय शेती व्यवस्था कशा स्वरूपाची आहे,

याचा आपण विचार करणे क्रमप्राप्त आहे. दुर्दैवाने हा संबंध फारसा लक्षात घेतला गेला नाही. म्हणूनच पत्रकारिता आणि शेती यांचा काही संबंध असू शकतो, याबद्दलची स्पष्टता आधुनिक काळाम म्हणजे ध्यान द्या.- अगदी २१व्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत- नव्हती, हे नाइलाजाने नमूद करावे लागते.

भारत हा शोषण करण्यासाठी अतिशय उत्तम स्वरूपाचा देश आहे, अशी मांडणी माँटॉमेगरी मार्टिन या ब्रिटिश लेखकाने त्या काळामध्ये केली होती. याचे कारण काय आहे, याचा शोध घेतला तर आपली वसाहतवादाला अनुकूल असणारी एकूणच मानसिकता आणि जीवनशैली त्याला कारणीभूत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे शेती करणारा समाज हा एकूणच जाणिवांच्या आणि व्यवहाराच्या पातळीवर अत्यंत मागासलेला असतो, अशा स्वरूपाचा समज जागतिक पातळीवर सगळीकडेच झालेला आहे.

म्हणूनच शेती आणि शेती करणारे जे जे समूह जगाच्या पातळीवर आहेत, त्या ठिकाणी प्राचीन काळापासून जागतिकीकरणापर्यंत सातत्याने शोषणाची एक अव्याहत परंपरा आपल्याला दिसते. या समूहाकडे, या समूहाच्या जीवनशैली आणि व्यवसायाकडे आधुनिक माध्यमांनी गंभीरपणे कधीच पाहिलेले दिसत नाही. शेतीसमूहाला आणि शेतीला या जगाने आजवर केवळ गृहीत धरलेले आहे. आणि हे ‘गृहीत धरणे’ हेच त्याच्या मूलभूत शोषणाचे कारण आहे.

आधुनिक काळात मुद्रण कलेच्या विकासाबरोबर पत्रकारिता आणि गद्यलेखनाची सुरुवात झाली, त्यात शेती व्यवस्थेला फारसे स्थान नव्हते. तरीही ब्रिटिश काळामध्ये १९ व्या शतकात संकीर्ण स्वरूपात का होईना काही प्रमाणात लेखन झाल्याचे आढळून येते. त्यातल्या काही महत्त्वाच्या नोंदी पुढीलप्रमाणे :

‘दक्षिण देशात तुतीचे झाड करण्याची व रेशमाचे किडे पाळण्याची व रेशीम उत्पन्न करण्याची रीती’, सीनियर जी मरी (१८३८), ‘जागती जोत- शेतपोत रीतभात याविषयी वाद,’ रामचंद्र अमृत दुग्गल (१८३८), ‘शेतकी आणि घरगुती व्यवस्था,’ अलेक्झांडर, (१८४६), ‘वृक्षवर्णन’, गोविंद नारायण (१८५७), ‘खताचे प्रकार’, (१८७३), ‘पुष्पवाटिका’ लक्ष्मण जयदेव गोरे (१८७३), ‘वृक्षविनोद’, वामन शास्त्री बेदरकर (१८७३) ही काही ढोबळ नावे आणि त्यांचे लेखक. हे लेखन फार शास्त्रीय स्वरूपाचा दर्जा असणारे असेलच असे नाही.

तरीही गंमत अशी आहे, की या लेखनातून शेतीचा विचार लेखकांनी व्यावहारिक पातळीवर केला पाहिजे, याचे एक भान या लेखकांना असल्याचे दिसते. अलेक्झांडर नावाचा लेखक एकूण शेती जीवनाविषयी मांडणी करताना एक निरीक्षण नोंदवतो- ‘जी धान्ये पेरावयास सतत ओलावा पाहिजे त्यांची क्षितिजाजवळ वळवांच्या ढगाप्रमाणे चंचल ढग असतील, त्याजवर विश्‍वास ठेवून पेरणी करू नये.

तसेच लहान लहान प्राणी यांच्या कृतीवरून जी लक्षणे दिसून येतात ती ही शुल्लक आहेत असे समजू नये.’ अलेक्झांडरसारख्या लेखकाने निसर्गात असणारे कीटक, निसर्गातले जे काही संकेत आहेत ते संकेत, पक्षी-प्राण्यांचं पाऊस काळातलं वर्तन यासंबंधी जी काही निरीक्षणे मांडली आहेत, त्याची नोंद घेणे खूप महत्त्वाचे ठरते. साधारणपणे शेतीचा व्यवसाय म्हणून विचार हा गद्य लेखनाच्या आणि पत्रकारितेच्या केंद्रस्थानी एकूण लेखनाच्या तुलनेत फारसा नव्हता हे प्रामुख्याने लक्षात येईल.

शेतीबद्दल विचार झाला तो नेमका कशा पद्धतीचा, याचा शोध आपण घेतला तर महात्मा फुले आपल्या साहित्यातून शेतकऱ्यांच्या शोषणाची एक परंपरा, जी प्रामुख्याने राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक अंगाने होती, तिचा विचार मांडताना दिसतात. स्त्री, शूद्रांचे दारिद्र्य जे काही आहे, त्या संदर्भात एक विस्तृत मांडणी आपल्याला फुले, शाहू, आंबेडकरी परंपरेमध्ये दिसते. मुकुंदराव पाटील, दिनकरराव जवळकर आदींच्या लेखनातून आपल्याला शेती समूहाच्या शोषणाबद्दल मांडणी होताना दिसते. हे सगळेच महात्मे पत्रकारितेचा वापर एक शस्त्र म्हणून करत होते. म्हणजे मुळात जी आपल्याकडली तुकोबांची परंपरा आहे ‘शब्दांची शस्त्रे करणं’ तिच्याशी हा सांधा जुळतो.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT