Protest
Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : रोह्यातील शेती ओलिताखाली

Team Agrowon

Roha News : दुरुस्तीच्या नावाखाली १० वर्षांपासून बंद केलेल्या कुंडलिका नदीवरील कालव्याला अखेर पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या दणक्यानंतर पाटबंधारे विभागाने १० मेपासून कालव्याचे पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे रोहे तालुक्यातील ४० हून अधिक गावांमधील हजारो एकर शेती ओलिताखाली येणार असून दुबार भातशेतीसह, कलिंगड, कडधान्यांच्या लागवडीसह पालेभाज्‍यांची शेती बहरण्याची शक्‍यता आहे.

पाटबंधारे विभागाने ५० वर्षांपूर्वी कुंडलिका नदीवर डोलवहाळ धरण बांधले आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी उजवा तीर व डावा तीर कालवा तयार केल्याने तालुक्यातील हजारो एकर शेतीत दुबार पिके डोलू लागली. पिण्याच्या पाण्याची समस्‍याही दूर झाली.

मातीने बांधलेल्या या कालव्यातून जागोजागी शिवारात नियंत्रित पाणी जावे, याकरिता नियोजनबद्ध झडपा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मजबुतीकरणाच्या नावाखाली २०११-१२ मध्ये काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तेव्हापासून कालव्याचा पाणीपुरवठा बंद आहे.

दहा वर्षे उलटूनही हिच स्‍थिती असल्‍याने शेती अक्षरशः ओसाड झाली. याशिवाय फुलशेती, कडधान्य लागवडीवरही परिणाम होत आहे. त्‍यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्‍पन्नावर परिणाम होउन आर्थिक विकास खुंटला आहे.

कुंडलिका नदीतील कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते व कालवा समन्वय समितीचे राजेंद्र जाधव, विठ्ठल मोरे, तुकाराम भगत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले.

या उपोषणास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्‍या पाटबंधारे विभागाने १० मेपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नायब तहसीलदार राजेश थोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, सुरेश मगर, उस्मान रोहेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख समीर शेडगे, सिटीझन फोरम अध्यक्ष नितीन परब आदींनी उपोषणास पाठिंबा दर्शविला.

अनिकेत तटकरेंचे आश्‍वासन

पाण्यासाठी उपोषण करणारे नागरिक व शेतकऱ्यांची आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट घेतली. रोहा तालुक्‍यातील सर्व समस्या जाणून घेतल्या व लवकरच सर्व समस्या दूर केल्या जातील व पाण्यावाचून शेतकरी व नागरिकांचे हाल थांबतील, अशी ग्वाही आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली. पिण्याच्या पाण्याची समस्‍याही सोडवणार असल्‍याचे त्‍यांनी या वेळी सांगितले.

कालवा दुरुस्तीचे ८५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम आठ दिवसांत पूर्ण होईल. १० मेपासून कालव्याला पाणी सोडले जाईल.
मिलिंद महामुनी, उपअभियंता, पाटबंधारे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

Nutrients Use : अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर

Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

Fertilizer Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

SCROLL FOR NEXT