Vitthal Kamat : माझी ‘ॲग्रोवन’ दैनिकासोबत ओळख झाली ती पुण्यामध्ये आयोजित ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात. खरं म्हणजे माझी शेती नाही, परंतु मला शेतीमधील नवीन बदल जाणून घेण्याची पहिल्यापासून आवड आहे.
मी हॉटेल व्यावसायिक असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीतून धान्य पिकते, त्यावर माझा व्यवसाय चालतो, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. गुणवत्तापूर्ण अन्नधान्य असेल, तर दर्जेदार पदार्थांची निर्मिती होते, यातून ग्राहक समाधानी होतो, अर्थकारणाला गती मिळते. शेतकऱ्यांशिवाय जगाचे पोट कोणीही भरू शकणार नाही, हे सत्य आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतीचे चित्र झपाट्याने बदलत आहे. त्यामध्ये निश्चितपणे ‘ॲग्रोवन’चा मोठा वाटा आहे. माझ्या कार्यालयात रोज ॲग्रोवन येतो, मी उत्सुकतेने त्यातील माहिती घेतो, काही प्रकल्पांना भेट देतो. तज्ज्ञ तसेच शेतकऱ्यांना संपर्क करून मला आवश्यक असणारी माहिती घेतो, भेटीदेखील देतो.
त्यांच्याकडून बदलती शेती, ग्रामीण भागाचे चित्र समोर येते. मी बऱ्याच वेळा परदेशात जात असतो. तेथेदेखील आवर्जून शेतकऱ्यांना भेटी देतो. मला असे दिसून आलंय, की हवामान बदलाचा परिणाम आणि प्रशिक्षित मजूरटंचाईचा प्रश्न जगभरातील शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे नवीन यंत्र आणि तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही.
माझे स्पष्ट म्हणणे आहे, की एकत्र आल्याशिवाय शेती परवडणार नाही. प्रत्येकाने नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासाठीच ॲग्रोवन महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या अठरा वर्षांत ॲग्रोवनच्या माध्यमातून बऱ्याच भागात प्रयोगशील शेतकरी एकत्र आले, विचारांची देवाण-घेवाण वाढली, शिवारफेऱ्या होऊ लागल्या. त्याचा सर्वांनाच उपयोग होत आहे. हा तंत्रज्ञान विस्ताराचा फायदा म्हणावा लागेल.
आता केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. प्रत्येकाला पूरक व्यवसायाची जोड द्यावी लागणार आहे. तरच ग्रामीण अर्थकारणाला गती येईल. पशुपालन, प्रक्रिया, वनौषधी उत्पादन, त्याचबरोबरीने साठवणूक,ऑनलाइन मार्केटिंग आणि थेट शेतीमाल विक्री व्यवसायामध्ये देखील शेतकऱ्यांची युवा पिढी दिसली पाहिजे. प्रत्येक शहरात स्वतःची ‘फार्मर्स मार्केट’ उभी करावीत. बाजार व्यवस्था आपल्या हातात असली पाहिजे. जेथे चांगली स्पर्धा आहे, तेथे शिकण्यासारखे भरपूर आहे, त्यामध्ये सर्वांचा फायदा आहे.
एका बाजूला शेतीमध्ये नवीन पिढी येण्यास तयार नाही, असे सांगितले जाते. परंतु परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ज्याच्याकडे कृषी, माहिती तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास आहे, असा शहरातील युवा वर्ग पुन्हा शेतीकडे वळतो आहे. आई, वडिलांनी या युवा पिढीच्या विचारांना प्रोत्साहन द्यावे, त्यांना शेतीमध्ये नाऊमेद करू नये, असे माझे सांगणे आहे. शेतीमध्ये नवनवीन ‘स्टार्ट अप’ तयार होत आहेत. ज्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, तो चांगल्या प्रकारे शेती करू शकतो.
राज्य- परराज्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अभ्यास करा, अभ्यास दौरे करा. जग पाहायला शिका. तंत्रज्ञानाने समृद्ध होणे ही शेती आणि शेतकऱ्यांची गरज आहे. आज जागतिक बाजारपेठ आपल्याला उपलब्ध आहे, ती मिळवायची कशी याचा मात्र सर्वांनी मिळून विचार करायला हवा आणि यासाठी ॲग्रोवन आपल्या सर्वांना दिशादर्शनाचे काम करत आहे.
(शब्दांकन : अमित गद्रे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.