Agriculture Technology : पशुपालकांनो, माहिती तंत्रज्ञानाची साथ मोलाची...

Animal Husbandry : प्रत्येक गोठ्यामध्ये ईआरपी प्रणालीचा वापर आवश्यक असणार आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे पशुपालकांच्या सोबत ग्रामपंचायतीला गावातील सर्व जनावरांच्या नोंदी एकाच ठिकाणी ठेवणे सोपे जाणार आहे.
Technology
Technology Agrowon

अमित गद्रे

Animal Care : पुण्यामध्ये राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली, हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (कास्ट प्रकल्प) आणि पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘माहिती तंत्रज्ञानाचा (आयओटी) भारतीय परिस्थितीत पशूपालनात अवलंब’ यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दैनंदिन पशू व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा कुशलपणे वापर आणि भविष्यातील संधीबाबत कृषी विद्यापीठ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांनी बदलत्या पशुपालनाची दिशा स्पष्ट केली.

कृषी विद्यापीठाचे ॲप

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, की सध्या पशुपालकांसमोर गाई, म्हशींचे आरोग्य, आहारातील त्रुटी, कुशल मजुरांचा अभाव, जनावरांच्या व्यवस्थापनाच्या अयोग्य नोंदी या समस्या दिसतात. मात्र पशुपालन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी व्यवस्थापनात बदल आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. याबाबत संशोधन झालेले आहे. राज्यातील काही प्रयोगशील पशुपालक याचा अवलंब करीत आहेत. विद्यापीठाच्या माध्यमातून जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल याचे संशोधनात्मक प्रयोग हाती घेतले आहेत. यातून लहान पशुपालकांसाठी ॲप विकसित होत आहे.

संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले, की आयओटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती आणि पशुपालनातील महत्त्वाच्या नोंदी ठेवणे सोपे आहे. याचा व्यवस्थापनासाठी फायदा होत आहे. यासाठीच कृषी विद्यापीठामध्ये कास्ट प्रकल्प कार्यरत आहे.

देशी गोवंश संशोधनाला फायदा

महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, की देशी गोवंश संवर्धन आणि संशोधनासाठी आयोगाने माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे. गोशाळा तसेच जातिवंत देशी गोवंश संगोपन करणाऱ्या पशुपालकांसाठी मोबाईल ॲप विकसित होत आहे. जातिवंत दुधाळ गाय आणि पैदासक्षम वळूंना टॅगिंग करून जीपीएस नोंद ठेवणार आहोत. आम्ही गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमूल्यवर्धन, गोशाळा विकास, गोरक्षक आणि गोआधारित शेती या संकल्पनेवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, माफसू, स्वयंसेवी संस्था आणि पशुसंवर्धन विभागासोबत धोरणात्मक आराखडा होत आहे.

पैदास धोरणासाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त

बाएफ संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत काकडे म्हणाले, की जातिवंत दुधाळ गाय, म्हैस विकसित करण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. संस्थेच्या प्रक्षेत्रावर अद्ययावत प्रयोगशाळेत जनुकीय तपासणी सोबत लिंग आधारित रेतमात्रांची निर्मिती होते. आम्ही उच्च प्रजनन क्षमता असणारे विविध जातीचे वळू, जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन करीत आहोत. यांचे आरोग्य, आहार, प्रजनन नोंदी ठेवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरले आहे. यातून उच्च गुणवत्ता असणारी जनावरे शोधणे सोपे जाते. संशोधनासाठी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलियामधील विद्यापीठांशी करार झाला आहे. त्यातून निश्चितपणे लहान पशुपालकांना उपयोगी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित होत आहे.

Technology
Gram Panchayat Election : नांदेडला कॉँग्रेस, भाजपला संमिश्र यश

संयुक्त प्रणालीचा वापर

अरिट बिझनेस सोल्यूशन्स कंपनीचे संचालक व्ही. एस. श्रीधर म्हणाले, की परदेशातील पशुपालकांनी रोबो, सेन्सर आणि माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करत मजूरटंचाईवर मात करून उच्च गुणवत्तेच्या जातिवंत दुधाळ गाई, वळूंचे संवर्धन केले आहे. आरोग्य, आहार, प्रजनन आणि दूध उत्पादनाची शास्त्रशुद्ध माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे. आपल्याकडील गोठ्यात जनावरांची संख्या दोनपासून ते पन्नासपर्यंत असते. हे लक्षात घेऊन सेन्सरवर आधारित पशू व्यवस्थापन प्रणाली विकसित झाली आहे. गावातील पशुपालकांचा गट संयुक्तपणे एकाच प्रणालीचा वापर करू शकतो. याद्वारे जनावरांचे दैनंदिन तापमान, आहाराचे पचन, आरोग्यातील चढउतार तसेच माजावर आलेली गाय, दूध उत्पादनाच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यानुसार तातडीने व्यवस्थापनात बदल करून नुकसान टाळता येते. पशुपालकांना ॲपद्वारे तांत्रिक माहिती पाठविली जाते. गावातील सर्व जनावरांच्या नोंदी एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीनेदेखील माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा.

तंत्रज्ञानाने अद्ययावत गोठा

शौर्य टेक सोल्यूशन्स कंपनीचे संस्थापक अभयसिंह जगताप म्हणाले, की प्रयोगशील पशुपालकांनी जनावरांचे आरोग्य, खाद्य व्यवस्थापन, मजूर व्यवस्थापन, दूध गुणवत्ता आणि विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत खर्चात बचत केली. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनास चालना दिली आहे. या गोठ्यांमध्ये डेटा लॉगर, इंटरनेट मोडेम, नेक बेल्ट, आरएफआयडी इअर टॅग, मिल्किंग मशिन फ्लो मीटर सेन्सर, तापमान, आर्द्रता मोजणारा सेन्सर, दूध उत्पादन मोजणारा सेन्सर आणि ईआरपी प्रणालीचा वापर होतो. येत्या काळात प्रत्येक गोठ्यामध्ये ही यंत्रणा आवश्यक असेल. यातून जनावरांची आरोग्य आणि दूध उत्पादन क्षमता कळते. त्यानुसार व्यवस्थापनात बदल करून जनावरांचा ताण कमी करू शकता,तसेच वर्षभर दूध उत्पादनात सातत्य ठेवणे सोपे जाते.

टीएचआय तंत्रज्ञानाची साथ ‘हेव टेक्नॉलॉजी‘चे उत्पादन व्यवस्थापक श्रीकृष्ण मुळे म्हणाले, की हवामान बदलामुळे दुधाळ जनावरांच्यामध्ये ताण येतो, त्याचा थेट परिणाम आरोग्य आणि दूध उत्पादनावर दिसतो. हे लक्षात घेता प्रत्येक गोठ्यामध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवणारी यंत्रणा आवश्यक आहे. आम्ही पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये कमी खर्चाची सेन्सर प्रणाली विकसित करीत आहोत.

Technology
Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांना लवकरच फळ पीकविमा योजनेचे परतावे मिळणार

अधिक दूध उत्पादन क्षमता हाच निकष

अलिवीरा ॲनिमल हेल्थ लि.चे विक्री व्यवस्थापक डॉ. शैलेश मदने म्हणाले, की गोठ्यामध्ये संख्या महत्त्वाची नसून अधिक दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई,म्हशींचे संगोपन फायदेशीर ठरते. माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेत प्रत्येक जनावराची क्षमता तपासावी. मुक्त संचार गोठा, वेळेवर आजारांचे नियंत्रण, मूरघास, जातिवंत पैदास आणि जमा-खर्चाचा तपशील यावर जो पशुपालक लक्ष देतो,तोच यशस्वी होतो. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन आणि मजूर बचतीसाठी मिल्किंग मशिन, बीसीएस सेन्सर, टिएमआर मिक्सर,कुट्टी यंत्र आणि पशू खाद्य निर्मिती यंत्रणा गोठ्यामध्ये असली पाहिजे.

आयओटी सेन्सर प्रणाली

पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातील प्रकल्प प्रमुख डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे म्हणाले, की आमच्या केंद्रामध्ये बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये आयओटी सेन्सर आधारित गाईंवरील ताण कमी करणाऱ्या ॲपवर संशोधन सुरू आहे. या माध्यमातून पशुपालकांना तापमान-आर्द्रता निर्देशांक (टीएचआय) आधारित सल्ला दिला जाईल. तापमानवाढीची पूर्वसूचना मिळाल्याने जनावरांचे उष्माघाताच्या ताणापासून संरक्षण होण्यास मदत होईल.

पशुपालनाचे तंत्र बदलणार...

ड लवाल कंपनीचे व्यवसाय प्रमुख (डेअरी फार्म) विशाल वशिष्ठ म्हणाले, की परदेशात ६० टक्क्यांहून अधिक गोठ्यांमध्ये पशू व्यवस्थापन, दूध काढणी, गोठा स्वच्छता, दूध साठवण आणि वाहतुकीसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर होतो. यंत्रणेच्या माध्यमातून जनावरांची दैनंदिन वर्तणूक, तापमान तपासले जाते. यामध्ये थोडाजरी बदल दिसला, की लगेच पशुपालकास मोबाइलवर संपूर्ण माहिती मिळते. त्यानुसार पशुतज्ज्ञांकडून उपचार केले जातात. परदेशातील पशुपालकांनी जातिवंत पैदास आणि माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालत दूध उत्पादनात आघाडी घेतली आहे. अमेरिकेतील एक गाय प्रति वेत ११,६०० लिटर, कॅनडामध्ये ९,००० लिटर, ऑस्ट्रेलियामध्ये ८,००० लिटर आणि न्यूझीलंडमध्ये ४,९०० लिटर दूध उत्पादन देते. भारतात हेच प्रमाण १,००० ते २,००० लिटर आहे. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन वाढविण्यासाठी भारतातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि उच्च वंशावळीचा वापर करत ‘कम्युनिटी डेअरी फार्म' उभारावेत किंवा सध्याच्या काळात प्रयोगशील पशुपालकांनी एकत्र येत मोबाइल,सेन्सर, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करावा. हे सर्व तंत्रज्ञान देशात उपलब्ध आहे. दूध उत्पादनाच्या बरोबरीने जमा खर्चाचा तपशील नोंद ठेवणारी प्रणाली ही काळाची गरज आहे. तरच आपला व्यवसाय किफायतशीर होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com